तामिळनाडूतील उगवता सूर्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018   
Total Views |



 
 
तामिळ सिनेसृष्टीचा आजवरचा प्रवास सूर्याशिवाय पूर्ण होतच नाहीअभिनयातून मिळणारा पैसा सत्कारणी कसा लावावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘सूर्या!’
 

सरावनन शिवकुमार उर्फ सूर्या हा तामिळ सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता! सूर्याचे वडील अभिनेते शिवकुमार यांच्याकडून त्यालाही अभिनयकला वारसा हक्कातूनच मिळाली. आजवर सूर्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर तामिळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘गजनी,’ ‘सिंघम,’ ‘युवा’ हे बॉलीवूडमध्ये प्रचंड गाजलेले चित्रपट सूर्याच्या मूळ तामिळ चित्रपटांवर आधारित होते. सूर्याचा सुपरहिट चित्रपट आणि बॉक्स ऑफीसवर होणारी बक्कळ कमाई हे समीकरण आजवर टिकून आहे. त्यामुळे तामिळ सिनेसृष्टीचा आजवरचा प्रवास या ‘सूर्या’शिवाय पूर्ण होतच नाही.

 

अभिनयातून मिळणारा पैसा सत्कारणी कसा लावावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सूर्या! २००६ साली सूर्याने ‘अग्रम’ या संस्थेची स्थापना केली. ‘अग्रम’च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशीही पाठविले जाते. शिक्षणाला प्रोत्साहन देणारी ही संस्था विद्यार्थ्यांसाठी तर कार्य करतेच, पण त्याचबरोबर काळाच्या ओघात कौटुंबिक जबाबादाऱ्यांमुळे ज्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले, अशा अनेकजणांना ‘अग्रम’ने पुन्हा शिक्षणाचा मार्ग दाखवला. ‘डिस्टन्स एज्युकेशन’ हा ‘अग्रम’कडून चालवला जाणारा एक उल्लेखनीय उपक्रम. ‘समाजातील दुष्ट प्रवृत्तींना थोपवायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही,’ हे सत्य सूर्याने ‘अग्रम’च्या माध्यामातून लोकांना पटवून दिले. ‘आज जातीपातीच्या नावावर समाजात जी विषण्णता माजली आहे, ती आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होऊ नये,’ असे सूर्याला मनापासून वाटते. सूर्याला देव आणि दिया अशी दोन अपत्ये असून आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करताना सूर्या त्यांच्याच वयाच्या इतर मुलांबद्दलही तितकाच विचार करतो. आपल्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, असे त्याला वाटते. समाजातील इतर मुलांनी दर्जेदार शिक्षण घेण्याच्या आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित राहून नये, अशी सूर्याची इच्छा आहे.

 

आज उत्तम बी पेरले की, उद्या त्याला चांगली फळे येतात. त्या फळांचा लाभ सर्वांना एकसारखा घेता येतो. त्याचप्रमाणे आज ‘अग्रम’ ही संस्था जे कार्य करत आहे, त्याची उत्तम फळे ही उद्याच्या पिढीला मिळणार आहेत. ‘अग्रम’ने हाती घेतलेल्या कार्यामुळे कौटुंबिक स्तरावर सकारात्मक बदल होईल, त्यानंतर हळूहळू सामाजिक पातळीवरही हा सकारात्मक बदल घडून येईल, असा ठाम विश्वास सूर्या व्यक्त करतो. २०१३ मध्ये उत्तराखंड येथील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तेथील आपतग्रस्तांना सूर्याने ‘अग्रम’च्या माध्यमातून १० लाखांची मदत दिली होती. ‘अग्रम’ ही संस्था चालविण्यासाठी जो पैसा वापरला जातो, ज्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात, त्यापैकी बहुतांश पैसे हे सूर्याच्या स्व:कमाईतून आलेले असतात.

 

आजवर चित्रपटांमधील आपल्या भूमिकांमधून सूर्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहेच. पण, त्याने हाती घेतलेल्या या शैक्षणिक कार्यामुळे तो इतर तामिळ कलाकारांपेक्षा कायम वेगळा ठरतो. वयाच्या ४३ व्या वर्षीदेखील सूर्याने आपला चार्म कायम राखला आहे. सूर्याचा स्वत:चा असा एक विशिष्ट चाहतावर्ग आहे, जो स्वत:ला ‘सूर्या ब्लड’ असे म्हणवतो. सूर्याच्या अभिनय कौशल्यामुळे आणि समाजकार्यामुळे त्याचे चाहते स्वत:ला सूर्याचाच एक भाग समजतात. चाहत्यांच्या रोमारोमांतून सूर्याचेच रक्त वाहते, अशी या ‘सूर्या ब्लड’ संकल्पनेची व्याख्या. पण, चाहत्यांनी त्याला इतके का उचलून धरावे? त्याचा एवढा उदोउदो का करावा? यामागे एक विशिष्ट कारण आहे. सूर्याचे बहुतांश चित्रपट हे विज्ञानावर आधारित असतात. नव्या संकल्पना, नवनवीन शोधांचे ज्ञान तामिळ प्रेक्षकांना त्याच्या चित्रपटांमधून होते. त्याच्या चित्रपटाच्या कथाही विलक्षण असतात. पृथ्वीवरील या सूर्यामधील माणुसकी जपणारा माणूस त्याच्या चाहत्यांना बहुदा गवसला असावा.

 

सूर्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका त्याच्या स्वभावाचे अनेकदा कौतुक करते. “सूर्या एक उत्कृष्ट मुलगा, एक उत्कृष्ट बाप आणि एक उत्कृष्ट पती आहे. पण, सर्वात आधी एक माणूस म्हणून तो खूप चांगला आहे,” हे ती वारंवार नमूद करते. शिक्षणाला आपण नेहमीच आपल्या मूलभूत गरजांच्या, आपल्या विचारांच्या अग्रस्थानी ठेवले पाहिजे, या उद्देशामुळेच सूर्याने आपल्या संस्थेचे नाव ‘अग्रम’ ठेवले. अनेक नवोदित कलाकारांनी सूर्यासोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सूर्याच्या सहवासात येण्याचा सर्वांनाच मोह होतो. परंतु, आपल्यासारखे समाजकार्य करणारे अनेक सूर्या निर्माण व्हावेत, यावर सूर्या भर देतो. चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या सूर्याच्या स्टाईलचे अनुकरण तामिळनाडूतील अनेक तरुण करतात. त्यांनी ‘अग्रम’साठी स्वयंसेवक म्हणून काम करावे, हीच सूर्याला चाहत्यांकडून खरी पोचपावती ठरेल.

 

 

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@