हम साथ साथ है

    18-Dec-2018   
Total Views |
 
 
 
 
 
कामाच्या ठिकाणी दुपारी एकत्र जेवण करताना होणाऱ्या अगदी वरवरच्या गप्पांमधूनही कधी कधी एखादी विलक्षण गोष्ट समोर येते. गोष्ट साधीच पण विचार करायला लावणारी असते. अशाच गप्पा चाललेल्या असताना एक जणाने नुकत्याच एका रक्तदान शिबिर-संयोजकांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. जनकल्याण रक्तपेढीसोबत झालेल्या रक्तदान शिबिरानंतर या शिबिराचा अनुभव सांगताना हा शिबिरसंयोजक म्हणाला, ’या शिबिराच्या आयोजनादरम्यान मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे तुमच्या रक्तपेढीचे डॉक्टर्स असोत किंवा मावशी, तंत्रज्ज्ञ असो किंवा ड्रायव्हर – हे सर्व जण एकच भाषा बोलतात.’ इथे ’भाषा’ हा शब्द त्याने विचारसरणी या अर्थाने वापरला होता. रक्तदान शिबिरातील अद्ययावत साहित्य, ते मांडण्याची विशिष्ट पद्धत, संकलित झालेल्या रक्तपिशव्या वेळोवेळी रक्तपेढीत पोहोचविण्याची तत्परता आणि मुख्य म्हणजे रक्तदात्यांप्रती सर्वांची आत्मीयता या सर्व बाबींचा त्याने कौतुकाने उल्लेख केला. आपण जेव्हा एक टीम म्हणून काम करतो आणि मुख्य म्हणजे समोरच्या व्यक्तीलाही ते जाणवते, तेव्हा अशा प्रकारचे प्रतिसाद स्वाभाविकपणे येतात. सहज म्हणून सांगितला गेलेला हा अभिप्राय स्वयंमूल्यांकनाच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण होता.
 
 
प्रत्येक शिबिर-संयोजक अगदी याच शब्दांत प्रतिसाद देत नसेलही, परंतु रक्तदान शिबिर ’जनकल्याण’नेच घ्यावे असा अनेक शिबिर-संयोजकांचा आग्रह मात्र आम्हाला नवीन नाही. त्यामुळेच कदाचित वरील अभिप्रायाची चर्चा ’फ़ार मोठा विषय’ म्हणून झाली नाही. पण ’तुमचे सर्व कर्मचारी एकच भाषा बोलतात’ हे वाक्य मात्र एका बाजुला आनंद देणारेही होते तर दुसऱ्या बाजुला आपल्या जबाबदारीची नकळत जाणिव करुन देणारेही होते. कारण या वाक्याची दुसरी बाजु - ’जेव्हा सर्वांची भाषा वेगवेगळी ऐकायला मिळेल तेव्हा मात्र सुधारणा आवश्यक आहे’ – अशी आहे. सर्वांची भाषा एकसारखी होणे म्हणजे संघटन आणि उलट झाले तर मात्र साराच विस्कळितपणा. पण मुळात सर्वांची भाषा एक होते, ती का ? इथे म्हणजे जनकल्याण रक्तपेढीत अत्यंत जाणिवपूर्वक रुजविल्या गेलेल्या संस्कृतीत याची उत्तरे दडलेली असावीत.
 
 
१९८३ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक कै. बाळासाहेब देवरस यांच्या हस्ते जनकल्याण रक्तपेढीची स्थापना झाली. या प्रसंगी त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. ’इथे येणाऱ्या समाजाच्या शेवटच्या स्तरातील व्यक्तीचा विचार प्राधान्याने व्हायला हवा’ ही ती गोष्ट. सुमारे पस्तीस वर्षांनंतर आजही रक्तपेढीच्या स्वागतकक्षात काम करणारा कोणताही कर्मचारी हे सांगु शकेल की, पैसे कमी आहेत अथवा पैसे नाहीत या कारणास्तव आजवर कोणालाही सेवा नाकारली गेलेली नाही. किंबहुना आर्थिक कारणास्तव कुणीही येथून रिकाम्या हाताने परत जाणार नाही हे जनकल्याण रक्तपेढीचे ब्रीदच आहे. त्यामुळे गरीब आणि गरजूंना भरभरुन सवलती दिल्या गेल्याचे या कर्मचाऱ्यांना रोजच इथे पहायला मिळते. स्वाभाविकच रक्तपेढीचे सवलतीबाबतचे निकष या सर्वांना पाठ झाले आहेत आणि सवलत देतानाचे सोपस्कारही अंगवळणी पडले आहेत. भाषा एक होते, ती इथे.
 
 
रुग्णालयात रक्त नेऊन पोहोचविणाऱ्या रक्तदूत सेवेतील कर्मचाऱ्यांनाही सवलत धोरणाबाबत अर्थातच पूर्ण कल्पना आहे. एकदा एका रुग्णाची दयनीय आर्थिक स्थिती बघून आमच्या एका रक्तदूताने आपण होऊनच मला फ़ोन करुन ’यांना सवलत देऊ या’ असे सुचवले होते. योग्य ती शहानिशा करुन या रुग्णास सवलतही दिली गेली होती. सर्व गरीब आणि गरजूंना मदत करण्याचे उत्तरदायित्व आपले आहे आणि आपण ते पार पाडायचे आहे, याचा नकळत संस्कार या रक्तदूतावरही काम करता करताच झाला आणि त्याप्रमाणे त्याने आपली भूमिकाही बजावली. सर्वांची भाषा एक वाटण्याचे हेही एक कारण असावे.
 
 
सवलतींबाबत जे आहे तेच रक्तप्रक्रियेबाबतही. रक्तसंकलन कमी झाले तरी चालेल पण रक्तदाते निवडायचे ते योग्य वैद्यकीय निकषांच्या आधारावरच, हा नियम रक्तदान शिबिरातही पाळला जातो आणि रक्तपेढीतही. याबरोबरच इथे काम करणाऱ्या सर्व तंत्रज्ज्ञांना हे नक्की माहिती आहे की रक्तप्रक्रियेच्या सर्व पायऱ्यांवर रक्तसुरक्षितता सांभाळण्यासाठी उत्तम गुणवत्तेची यंत्रणा आणि साहित्य इथे विनातडजोड वापरले जाते. केवळ काम उरकण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट्स इथे घेतले जात नाहीत, हेही इथे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना कळत असतेच. शिवाय जी महागडी यंत्रसामुग्री इथे वापरली जाते ती बहुतेक विविध देणग्यांतूनच इथे आलेली आहे, हेही सर्वांसमोर असतेच. असे आर्थिक योगदान देणाऱ्या दात्यांना सन्मानपूर्वक येथे बोलावून त्यांना रक्तपेढी दाखविणे ही बाबही कर्मचाऱ्यांकरिता मुळीच नवीन नाही. याखेरीज पुण्यातील आणि पुण्याबाहेरीलही अनेक रक्तपेढ्यांना त्यांच्या गरजेनुसार अनेकदा रक्तघटकांचा पुरवठा येथून केला जातो. हा रक्तपुरवठा प्रत्यक्षात करतो तो रक्तपेढीचा वाहन-चालक. कुठल्याही वेळेला कुठेही जाण्याची तत्परता तर चालक मंडळींकडे असतेच. पण हे करत असताना ’आपण अत्यंत महत्वाचे असे रक्तघटक घेऊन चाललो आहोत’ याचीही जाणिव त्यांना असते, नव्हे ती असावीच लागते. एकंदरीतच रक्तपेढीत काम करणाऱ्या सर्वांना ’आपल्या कामाचा संबंध कुणाच्या तरी जगण्या-मरण्याशी आहे’ याचे भान असतेच. सर्वांची भाषा एक होण्यातला हा एक महत्वाचा दुवा म्हणता येईल.
 
 
’सर्वांची भाषा एक कशी होते’ यावर भाष्य करणारा हा एक अलिकडेच घडलेला प्रसंग. मानाचा दुसरा गणपती आणि पुण्याची ग्रामदेवता असा लौकिक असलेल्या तांबडी जोगेश्वरी देवीच्या नावाने दिला जाणारा ’ग्रामदेवता पुरस्कार’ याच वर्षामध्ये जनकल्याण रक्तपेढीला मिळाला. ही शुभवार्ता सांगण्यासाठी या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रक्तपेढीमध्ये आले होते. पुरस्कारप्रदान सोहळ्याचं निमंत्रणही त्यांनी यावेळी दिलं. या पुरस्कारप्रदान सोहळ्यात रक्तपेढी विश्वस्त आणि कार्यकारी संचालक यांनी हा पुरस्कार स्वीकारणे अभिप्रेत होते. तेच उचितही होते. परंतु या कार्यक्रमाच्या पुरेशा आधी कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांचा मला फ़ोन आला आणि आम्ही यात काही बदल केले. त्यानुसार अत्यंत देखण्या अशा या कार्यक्रमात रक्तपेढीच्या वतीने स्वत: डॉ. अतुल कुलकर्णी, विश्वस्त श्री. शरदराव भिडे यांच्यासह आमच्या रक्तपेढीतील सर्वात ज्येष्ठ मदतनीस सौ. सुनंदाताई पवार, तांत्रिक विभागाच्या प्रमुख सौ. अमृता मेटे आणि सेवाव्रती श्री. रवींद्र कुलकर्णी या पाच जणांनी रक्तपेढीचे प्रतिनिधी म्हणून एकत्रितरित्या व्यासपीठावर जाऊन ग्रामदेवता पुरस्कार स्वीकारला. बदल छोटासाच होता, पण त्यातील सार सर्वांच्या लक्षात आले. ’हा पुरस्कार आपल्या सर्वांचा आहे’ असे सर्वांना वाटणे, ही व्यापकता या छोट्याशा बदलाने सहज साधली गेली. आमच्या सुनंदामावशींनी तर ’आज आयुष्याचे सार्थक झाले’ असे नंतर बोलुनही दाखविले. मोठ्या व्यासपीठावर जाऊन असा पुरस्कार स्वीकारण्याचा त्यांच्या जीवनातील बहुधा हा पहिलाच प्रसंग. त्यांच्या या भावना अगदी आतून आल्या होत्या. कारण रक्तपेढी ही त्यांना घरापेक्षा वेगळी कधी वाटलीच नाही. रक्तपेढीबद्दल अशीच आत्मीयता इथल्या कर्मचारी वर्गाने ठेवलेली आहे. स्वाभाविकच रक्तपेढीची स्थापना करताना तत्कालीन कार्यकर्त्यांच्या धारणा या निरंतर संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून अत्यंत शुद्ध स्वरुपात झिरपत खालपर्यंत आल्या आहेत.
 
 
’संत तुकाराम’ या नवीन मराठी चित्रपटातील एक प्रसंग मला आठवतो. छोट्या तुकारामाचे वडील- बोल्होबा - पंढरीच्या वारीहून परत येतात आणि घरी आलेल्या गावकऱ्यांना विठ्ठलाचा प्रसाद देतात. ’एकीकडे सावकारीसारखा व्यवसायही करायचा आणि दुसरीकडे वारीदेखील करायची, हे दोन्ही कसं जमतं ?’ असं यातील एक गावकरी यावेळी बोल्होबांना विचारतो. यावर हसून बोल्होबा म्हणतात, ’काय विकायचं आणि काय विकायचं नाही, हे पक्कं ठाऊक असलं म्हणजे सगळं जमतं. उद्या कुणी थैलीभर मोहरा आणून दिल्या तरी देवाचा प्रसाद विकु का आम्ही ?’ त्याचप्रमाणे रक्तपेढीसारख्या सेवासंस्थांचंही आहे. ’काय करायचं आणि काय करायचं नाही’ याबद्दल स्पष्टता असली की आपोआप ती सर्वांकडुन या ना त्या रुपाने प्रकटतेच.
 
 
शब्द वेगवेगळे, पण भाषा एकच !
 
 
 
- महेंद्र वाघ  

महेंद्र वाघ

अभियांत्रिकी पदविका, इतिहास व सामाजिक कार्य विषयांतील पदव्युत्तर शिक्षण. ललित लेखनाची आवड. सध्या 'जनकल्याण रक्तपेढी, पुणे' चे व्यवस्थापक म्हणून कार्यरत.