राहुल गांधी यांना ‘शॅडो पीएम’ करण्याची घाई!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018   
Total Views |


 


स्टालिन यांनी राहुल गांधी यांच्या नावाची जी एकतर्फी घोषणा केली, ती मात्र अनेक विरोधी नेत्यांना आवडली नाही. राहुल गांधी यांची ‘शॅडो पीएम’ म्हणून जी घोषणा केली, त्यामुळे विरोधी ऐक्याच्या प्रक्रियेत बाधा येईल, तसेच अन्य भाजपविरोधी पक्षही असाच दावा करतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. स्टालिन यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे मत एका विरोधी नेत्याने व्यक्त केले.


पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता आपले चांगले दिवस जवळ आले, असे देशातील समस्त भाजपविरोधी पक्षांना वाटू लागले आहे. ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, त्यातील तीन राज्ये अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होती. त्या तीन ठिकाणी भाजपचा जो पराभव झाला, त्याची कारणे शोधण्यास भाजपने या आधीच प्रारंभ केला आहे. नेमके कोठे, कशामुळे आणि कोणामुळे चुकले याचा विचार भाजपकडून केला जात आहे. पण, ज्या तीन राज्यांत सत्ता हातात होती, तेथील सत्ता गेल्याने भाजपसाठी तो अत्यंत काळजीचा विषय ठरला आहे. भाजपला मध्य प्रदेश, राजस्थानात जागा चांगल्या मिळाल्या. अनेक जागा तर अल्प मतांनी हुकल्या. छत्तीसगढमध्ये रमणसिंह यांच्या कारभाराचे कौतुक होत होते, पण तेथे भाजपला चांगलाच फटका बसला. या धक्क्यातून सावरून लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जोमाने उतरणार असला तरी या पराभवाने विरोधकांना जरा बळ मिळाले आहे. त्यांची घोडी दिल्ली सर करण्यासाठी आतापासून फुरफुरू लागली आहेत. तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी विरोधी ऐक्याचे जे प्रयत्न चालविले आहेत, त्यास भाजपविरोधी पक्ष साथ देत असले तरी काही पक्ष मात्र हातचा राखून वागताना दिसत आहेत. काल मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्या समारंभांना विरोधी नेत्यांनी गर्दी केली होती. पण, भाजपच्या विरुद्ध आघाडी निर्माण करण्यात विरोधक यशस्वी होतील का, हा खरा प्रश्न आहे.

 

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, यावर या आघाडीत मतैक्य होण्याची चिन्हे दिसत नाहीत. राहुल गांधी हे स्वत: जरी, आपणच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे म्हणत असले तरी त्यांच्या नावास अनेकांचा विरोध आहे. काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे मिळाले, त्यामुळे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असायला हवेत, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असले तरी अन्य पक्षांनाही तसे वाटायला हवे ना! पण, द्रमुक पक्षास मात्र राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असले पाहिजेत, असे वाटत आहे. द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन यांनी चेन्नई येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव सुचविले. द्रमुक नेते एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात बोलताना स्टालिन यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. राहुल गांधी यांचे नाव घोषित करताना स्टालिन यांनी, आपले वडील एम. करुणानिधी यांनी १९८० मध्ये, नेहरूंच्या कन्येचे स्वागत केले. आम्हाला स्थिर सरकार द्या, असे म्हटले होते. २००४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या सुनेचे स्वागत केले. भारताची कन्या जिंकली पाहिजे, असे म्हटले होते. आता २०१८ साली या व्यासपीठावरून मी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतो,” असे घोषित करून विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडवून दिली. या कार्यक्रमास राहुल गांधी, सोनिया गांधी, चंद्राबाबू नायडू, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आदी उपस्थित होते.

 

स्टालिन यांनी राहुल गांधी यांच्या नावाची जी एकतर्फी घोषणा केली, ती मात्र अनेक विरोधी नेत्यांना आवडली नाही. या घोषणेबद्दल चंद्राबाबू नायडू यांच्या एका निकटच्या सहकाऱ्याने नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांची ‘शॅडो पीएम’ म्हणून जी घोषणा केली, त्यामुळे विरोधी ऐक्याच्या प्रक्रियेत बाधा येईल, तसेच अन्य भाजपविरोधी पक्षही असाच दावा करतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. स्टालिन यांच्या मताशी आपण सहमत नाही. पंतप्रधानपदाची निवड ही निवडणुकांच्या नंतरच केली जाईल, असे मत एका विरोधी नेत्याने व्यक्त केले. तेलुगू देसम, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, बसप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचीही अशीच भावना असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले. अण्णाद्रमुकचे मुख्यमंत्री इ. के. पलानीस्वामी यांनी स्टालिन यांच्या या वक्तव्यावर बोलताना, “राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याची स्टालिन यांची इच्छा असू शकते. पण, त्या पदावर कोण बसणार हे निवडणूक निकालांवरूनच ठरेल,” असे स्पष्टपणे सांगितले, तर तामिळनाडू भाजप अध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन यांनी, “नरेंद्र मोदी हे लोकशाही मार्गाने पंतप्रधानपदी निवडले गेले आहेत. स्टालिन यांनी राहुल गांधी यांचे नाव आताच पुढे केले आहे. ही घराणेशाही झाली. ‘लोकशाही विरुद्ध घराणेशाही’ यांच्यातील युद्ध लढण्यास आम्ही सिद्ध आहोत. लोकशाही असलेल्या या देशात केवळ लोकशाहीच जिंकेल,” असे त्यांनी म्हटले आहे.

 

विरोधकांना बरोबर घेतल्याशिवाय राहुल गांधी यांचे सत्तेवर येण्याचे स्वप्न साकार होऊ शकणार नाही, याची काँग्रेसला पुरेपूर जाणीव असल्याने विरोधकांशी संधान बांधण्याचे त्या पक्षाचे प्रयत्न चाललेले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील शपथविधी समारंभांना विरोधी नेत्यांना निमंत्रित करण्याचा उपक्रम हा त्या प्रयत्नांचाच भाग आहे, असे म्हणता येईल. मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आणली असल्याची टीका राहुल गांधी करीत असले तरी मोदी सरकारने लोकशाहीविरोधी अशी कोणतीही कृती केलेली नाही, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे हा अपप्रचार फार काळ टिकणार नाही. काँग्रेसकडून होत असलेल्या अपप्रचारास पंतप्रधान मोदी हे सडेतोड उत्तर देत आहेत. काँग्रेसने देशाच्या संरक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा, तसेच न्यायपालिकेविरुद्ध अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहेभाजपच्या विरोधात काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष आघाडी करण्याचा प्रयत्न करीत असताना सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने काँग्रेस पक्षाला चांगलाच फटका बसणार आहे. १९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलीतील एक आरोपी आणि काँग्रेसचे नेते सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खालच्या न्यायालयाने सज्जनकुमार यांची सुटका केली होती, पण त्या सुटकेस आव्हान देण्यात आले होते. हत्या करण्यासाठी कटकारस्थान केल्याचा आरोप सज्जनकुमार यांच्यावर ठेवण्यात आला होता. तो आरोप सिद्ध झाल्याने त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्याचे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. या निकालाने काँग्रेस पक्षाची अब्रू चव्हाट्यावर टांगली गेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल पाहून, मोदी सरकारने न्यायालयावर दबाव आणल्याचा आरोप राहुल गांधी करणार नाहीत, अशी माफक अपेक्षा करायला हरकत नाही. मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आणल्याचे, सर्व महत्त्वाच्या संस्थांची गळचेपी केल्याचे आरोप काँग्रेसकडून होत असले तरी त्यावर विश्वास ठेवून लोकसभा निवडणुकीत जनता आपल्यामागे उभी राहील, या भ्रमात काँग्रेसने राहू नये. भाजप हा तात्कालिक पराभवाने खचून जाणारा पक्ष नाही. एकेकाळी लोकसभेत ज्या पक्षाच्या फक्त दोन जागा होत्या, त्या पक्षाने पूर्ण बहुमत मिळविल्याचा इतिहास आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@