एकच ध्यास, देशाच्या सीमाभागाचा विकास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018   
Total Views |



देशाच्या सीमाभागातील विकासया विषयावरील संशोधनासाठी डोंबिवलीच्या सोहम वैद्यला युरोपियन कमिशनने नुकतीच शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. अशा या सोहम वैद्यचे माणूसपण ध्येयशील आहे.


सोहम सध्या दिल्लीच्या ‘जिंदाल स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’मध्ये शिक्षण घेतोय. तरुण व सर्वच बाबतीत ‘आहे रे’ गटातला सोहम वैद्य. देश, समाज आणि एकंदरच सर्वच बाबतीत प्रगल्भ मानवतावादी दृष्टिकोन बाळगणाऱ्या सोहमचे आयुष्य उलगडताना संस्कार माणसाला घडवत असतात हे जाणवते. घरचे वातावरण, सामाजिक जाणिवा या माणसाच्या अंतरंगात मानवी मूल्यांचे विश्व जागृत करत असतात. आर्थिक क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय असलेल्या संदीप आणि मेधा या सुविद्य दाम्पत्याचा सोहम हा एकलुता एक मुलगा. लहानपणी शाळेमध्ये पुण्याच्या ज्ञानविद्या प्रबोधिनीचे शिबीर होते. तो त्या शिबिराला गेला. पहिल्यांदा जाणीव झाली की, महाराष्ट्राबाहेर दूर उत्तर-पूर्वेलाराज्येही आहेत. त्यांची संस्कृती, राहणीमान आपल्यापेक्षा वेगळे असले तरीही ती आपलीच आहेत. तिथे राहताना तेथील लोकांना समस्या येतात, ज्या आपण भारतीय म्हणून सोडवायला हव्यात. अर्थात, ते लहानपण होते. लहान मुलांच्या मनात अशा अनेक इच्छा निर्माण होत असतात. त्याचवेळी सोहम बास्केटबॉलही उत्तम खेळायचा. स्पर्धांमधून त्याने चांगले यशही मिळवले होते. आयुष्य सुस्थिरच होते. संघर्ष, कष्ट वगैरे गोष्टी दूर दूरपर्यंत नव्हत्या. तरीसुद्धा सोहम नेहमी विचार करे की, आपण काही तरी केले पाहिजे. का? कारण, त्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग वाचले होते, ऐकले होते. स्वा. सावरकर इतके बुद्धिमान आणि कर्तृत्ववान. देशासाठी त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. बुद्धीचा उपयोग देशासाठी केला. या सर्व गोष्टींचा प्रभाव सोहमवर पडला. त्याचे अध्ययन तर सुरू होतेच. त्याने वाणिज्य शाखा निवडली. सीएसाठी परीक्षाही दिली. त्याचवेळी देशात वेगवेगळी स्थित्यंतरे घडत होती. दिल्लीच्या जेएनयु ते हैद्राबादच्या रोहित वेमुलापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात एक वेगळेच वातावरण तयार केले जात होते. आपली विचारधारा ती काय खरी, बाकी कुणाला जुमानायचेच नाही, असे वातावरण. या सगळ्या वातावरणाचा संवेदनशील मनाच्या सोहमवर वेगळाच परिणाम होत होता. त्याने ठरवले की, आपण नीतिमत्ता आणि राजकारण यातील संघर्ष यावर अभ्यास करायला हवा.

 

जराही विलंब करता सोहमने वाणिज्य शाखेतून कला शाखेत प्रवेश घेतला. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन तो शिकू लागला. इंटर्नशिप करताना त्याला दोन महिन्यांसाठी नागालँडमध्ये जावे लागले. हाच त्याच्या युवा आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता, असे म्हणावे लागेल. त्याने पाहिले की, या भागात १६ जनजाती आहेत. सगळ्यांचीं भौगोलिकता एकच. समस्याही सारख्याच. मात्र, या जमातींची एकमेकांशी पराकोटीची शत्रुता. शांतात नावलाही नव्हती. ‘शांती’ या एका सदिच्छेसाठी सोहम तिथे संशोधन आणि कामही करू लागला. तेव्हाच त्याला जाणवले की, सरकारचे सीमा भागातील गावांसाठी धोरण आहे. ते जर पूर्णत: उपयोगात आणले, तर भारताच्या ईशान्य सीमाभागातील बरेचसे प्रश्न सुटण्यासारखे आहेत. पण, तसे होत नाही. त्याचाच फायदा राष्ट्रद्रोही शक्ती घेत आहेत. ही धोरणं आपल्या देशाच्या सीमाभागात उत्कृष्टपणे काम कशी करतील? यासाठी काय करावे लागेल? या विचारांनी सोहम अस्वस्थ झाला. त्यातच त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण साहित्य वाचले. देश स्वतंत्र झाल्यानंतर एक राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी बाबासाहेबांनी आणि सर्वच स्वातंत्र्यसैनिकांनी, समाजसुधारकांनी केलेल्या संघर्षाने त्याला झपाटून टाकले. विविधतेतील एकता जपण्यासाठी देशाच्या सीमाभागात राहणाऱ्या समाजबांधवांचे ऐक्य आणि सामंजस्य घडवणे आवश्यक आहे, असे त्याला वाटले. त्यातूनच त्याने अभ्यासाला सुरुवात केली. समता, बंधुता, ऐक्य अगदी सहिष्णुता वगैरे भावना आपल्यामध्ये निर्माण झाल्या तरी, जोपर्यंत दुसऱ्याचे दु:ख समजण्याची जाणीव आपल्यात निर्माण होत नाही तोपर्यंत विविधतेत एकता जपणे, या ध्येयामध्ये अडचणीच निर्माण होणार असा निष्कर्ष त्याने काढला.

 

२०-२१ वर्षांच्या सोहमने देशात एकता निर्माण करण्याचे ध्येय ठरवले. तो सगळीकडेच पोहोचू शकत नाही. पण, जिथे धोक्याची पातळी जास्त आहे तिथे तर पोहोचायलाच हवे, असे त्याने ठरवले. त्या दिशेने सोहम मार्गक्रमण करत आहे. सोहम सांगतो, “२८ डिसेंबरपासून पुढे सहा महिने मी युकेमध्येच संशोधनासाठी असेन. सीमाभागात सैनिकी कारवाया करण्याऐवजी त्या भागाचा लोकसहभागातून विकास करण्याच्या अनेक संकल्पनांचे संशोधन पाश्चिमात्त्य देशांत केले गेले. त्या संकल्पनांचा अभ्यास करून आपल्या देशाच्या संस्कृती आणि भौगोलिकतेच्या दृष्टीने कसा उपयोग होईल, या दृष्टिकोनातून मी या शिष्यवृत्तीकडे पाहत आहे.” आपला देश खऱ्या अर्थाने युवकांचा देश आहे. सोहमसारखा ध्येयशील युवक या देशातील तरुणांचे प्रतिनिधीत्व करत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@