
नवी दिल्ली : “डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे भारत पुढील दोन ते तीन वर्षांत ट्रिलियन डॉलर्सची डिजिटल अर्थव्यवस्था होईल. ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रम राजकीय, केंद्र-राज्य आणि विचारसरणी या पातळ्यांवर कोणत्याही विशिष्ट वर्गाकडे झुकणारा नव्हता. यामुळे देश मोठी डिजिटल अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,” असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ते एफआयसीसीआयच्या ९१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, “डिजिटल इंडिया’ हा कार्यक्रम नागरिकांना सक्षम बनविण्यासाठी, त्यांचा डिजिटल सहभाग वाढविण्यासाठी आणि ग्रामीण-शहरादरम्यानची दरी दूर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने राबविलेल्या ‘न्यू इंडिया’ संकल्पनेने मोठा वैचारिक बदल घडवून आणला. ही मोठा विचार करण्याची प्रेरणा आहे. आपण मोठा विचार केल्याशिवाय घवघवीत यश मिळवू शकत नाही,” असे मत प्रसाद यांनी व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, “स्मार्टफोन्स, त्यातील वेगवेगळ्या पार्ट्सचे उत्पादन, ऑप्टिकल फायबर नेटवर्क हे देशात डिजिटल तंत्रज्ञान अवलंबल्याची उदाहरणे होती. ऐतिहासिक कारणांमुळे देशात औद्योगिक क्रांती होऊ शकली नाही. ‘परवाना-परमिट-कोटा राज’मुळे उद्योजक क्रांती हातून निसटली. मात्र, आता आम्ही भारताला रूपांतरित करण्यासाठी तयार केलेली डिजिटल क्रांती चुकवू इच्छित नाही,” असेही त्यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/