कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलण्याची भाविकांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |

 

 

 
 
 
कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरातील करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती बदलण्यात यावी, अशी मागणी काही भक्तांकडून करण्यात आली आहे. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात ही मूर्तीबदलण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे. भक्तांनी अशी मागणी करण्यामागचे कारण म्हणजे अंबाबाईची ही मूर्ती पाच ठिकाणी भंगली आहे. गेल्या १२ वर्षांत देवीच्या मूर्तीला मस्तकाभिषेक घालण्यात आलेला नाही. धर्मशास्त्राप्रमाणे ही भंगलेली मूर्ती बदलून त्याजागी नवीन मूर्ती बसवून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी. अशी मागणी भक्तांकडून करण्यात आली आहे.
 

१९१७ पासून आजपर्यंत शंभर वर्षांमध्ये अंबाबाईच्या मूर्ती पाच ठिकाणी भंगली आहे. देवीची ही मूर्ती कोणत्या ठिकाणी भंगली आहे याचे फोटोही उपलब्ध आहेत. मूर्तीची ही अवस्था पाहवत नाही, असे भक्तांचे म्हणणे आहे. २०१६ मध्ये देवीच्या मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देवीच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणावर झीज झाली असल्यामुळे संवर्धनाची शाश्वती देता येणार नाही. असे पुरातत्व खात्याकडून जाहीर करण्यात आले होते. अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन करतानाच्या प्रक्रियेचे प्रशासनाकडून चित्रिकरण करण्यात आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी हे चित्रिकरण पाहिले होते. त्यावेळी “हे चित्रिकरण म्हणजे जिवंत बॉम्ब आहे” अशी प्रतिक्रिया अमित सैनी यांनी दिली होती. हे चित्रिकरण भक्तांना दाखविण्यात आलेले नाही.

 

हिंदू शास्त्राप्रमाणे कोणत्याही मंदिरातील मूळ मूर्तीचे नित्य पूजन, अभिषेक, स्नान, आरती, मंत्रपठण होणे आवश्यक असते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील देवी अंबाबाई हे एक जागृत स्थान मानले जाते. हे स्थान असेच जागृत राहावे, म्हणून या मूर्तीचे नित्य पूजन अभिषेक, स्नान आणि आरती, मंत्रपठण होणे गरजेचे आहे. गेली १२ वर्षे या मूर्तीला मस्तकाभिषेक घालण्यात आलेला नाही. नित्य स्नान, अभिषेक मूर्तीवर झालेल्या नाहीत. देवस्थळांचे तसेच देवांच्या मूर्तींचे पावित्र्य आणि देवत्व अबाधित राखण्यासाठी या गोष्टी नित्यनियमाने होणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना असूनही प्रशासन आणि मंदिराचे पुजारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप काही भक्तांनी केला आहे.

 

अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखोंच्या संख्येने भक्त कोल्हापूरमध्ये येत असतात. शिर्डीचे साईबाबा मंदिर आणि तिरुपती बालाजीच्या मंदिराप्रमाणेच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही देवीच्या मूर्तीला मस्तकाभिषेक करण्यात यावा. हा मस्तकाभिषेक भक्तांना पाहता येईल अशी सोय करण्यात यावी. अशी मागणी भक्तांकडून करण्यात येत आहे. २०१४ साली देवीची ही भंगलेली मूर्ती बदलण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. दरम्यान, या महालक्ष्मी मंदिराचे पुजारी बदलण्यासाठी आंदोलन करण्यात आले. तसेच इतर काही आंदोलनांमुळे देवीची मूर्ती बदलण्याच्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष झाले. याप्रकरणी मूर्तीचे पुजारी आणि देवस्थानाने मूर्ती बदलण्यासाठी पुढाकार घेतला. तर मूर्ती बदलून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता येऊ शकते. परंतु अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान असल्यामुळे कोणीही या प्रकरणात हात घालायला तयार होत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@