ग्रामकल्याणाचा ‘आयकीगाय’ आदर्श

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018   
Total Views |
 
 

चांगल्या पगाराची नोकरी सोडून कल्याण अक्कीपेडीची पावलं थेट गावाकडे वळली. एका शेतकर्‍यासोबत चक्क इंटर्नशीप करून त्याने आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागात चक्क एक ‘प्रोटो व्हिलेज’ उभे केले. त्याची ही कहाणी...

 

भारतीय अर्थव्यवस्था ही कृषिधारित असल्याचे पुस्तकी ज्ञान लहानपणापासून रुजवले जाते. पण, मग याच कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकर्‍यांवर कर्ज घेण्याची, आत्महत्येची वेळ का येते? बहुतांश वेळा दुष्काळ, गारपीट, अतिपर्जन्यमान यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनाच दोष देऊन सरकारी व्यवस्थाही शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत देत वेळ मारून नेतात. पण, एकूणच कृषिक्षेत्रातील समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. अशाच बिकट परिस्थितीत आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात शहरातील नोकरी सोडून दाखल झालेल्या कल्याण अक्कीपेडीने एका गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. ज्या गावची जमीन खडकाळ, पाण्याचा मागमूसही नाही, वीजपुरवठा नाही की वनराजीची संपन्नताही नाही, तेच गाव आज त्यांच्या सर्व गरजांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. ‘आयकीगाय’ या जपानी मूल्यावर आधारित ही ग्रामरचना. ‘आयकीगाय’ म्हणजे ‘आपल्या जन्माचे, अस्तित्वाचे एक निश्चित कारण आहे, त्यासाठी जगा.’ अशी ही यशोगाथा आहे, कल्याण अक्कीपेडीची आणि त्याने उभारलेल्या ‘प्रोटो व्हिलेज’ची.

 

३९ वर्षीय कल्याणने जनरल इलेक्ट्रिक कंपनीतून नोकरीला सोडचिठ्ठी दिली. कामातील कंटाळा, असमाधान, कमी पगार यापैकी काहीएक नोकरीला लाथ मारण्याचे त्याचे कारण नाही. तर खरे कारण आहे, ज्ञानाची भूक आणि याच भुकेच्या शोधात कल्याण आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील तेकूलोडू गावात पोहोचला. इतर गावांसारखे अगदी साधे, मागास गाव. दैव आणि सरकारला दोष देणारे शेतकरी पाहून कल्याणला अतीव दु:ख झाले. त्याने चक्क एका शेतकर्‍याच्या घरात राहून त्याला शेतीमध्ये सर्व प्रकारची मदत केली. शेतीमधील काही आधुनिक पद्धती, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि मेहनतीच्या जोरावर या शेतकर्‍याचे सात हजार रुपयाचे वार्षिक कृषी उत्पन्न चक्क दुप्पट म्हणजे १४ हजारांवर पोहोचले. शेतीला सौरऊर्जा आणि पवनऊर्जेचीही कल्याणने जोड दिली. एका शेतकर्‍याचे सर्वार्थाने ‘कल्याण’ झाले. पण, कृषिक्षेत्राला खरोखरीच ‘अच्छे दिन’ अनुभवायचे असतील, तर इथवर थांबून चालणार नाही, हे कल्याणने मनोमन पक्क केले. त्याने याच गावाच्या नजीक आणि त्याचे मूळ गाव असलेल्या हिंदूपूरजवळ २०१३ साली साडेबारा एकरची जंगलानजीकची जमीन विकत घेतली आणि आज याच जमिनीवर उभे आहे, कल्याणच्या कल्पनेतून साकारलेले ‘प्रोटो व्हिलेज.’ कल्याणने स्थानिक शेतकर्‍यांच्या मदतीने चार वर्षांत या माळरानाचे रूपांतर सुपीक जमिनीत केले, तेही अगदी नैसर्गिक आणि अपांरपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरातून. पंचक्रोशीतले शेतकरीही मग हळूहळू या आदर्श गावात स्थलांतरित झाले. या गावात शेततळ्यांमुळे कृषिसंपन्नता आली. दुष्काळी परिस्थितीवरही या गावचा शेतकरी आज सक्षमपणे मात करू शकतो. जलसंचय आणि जलनियोजनाची ही कमाल.

 

शेतीच्या आधुनिक पण केवळ जैविक पद्धतींचा वापर पिकांच्या उत्पादनासाठी केला जातो. या गावाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, इथे फक्त शेतकरीच कार्यरत नाहीत, तर साबण बनवणारा, मडकी बनवणारा असे गावातील छोटा-मोठा कामधंदा करणारा वर्गही सामील आहेच. अगदी बारा बलुतेदार ग्रामरचनेप्रमाणे. पण, कल्याणने फक्त शेतकर्‍यांचाच नाही, तर त्यांच्या मुलांचाही समग्र विचार केला. त्यांनाही शेती किंवा इतर हस्तगत कौशल्य प्राप्त व्हावे, याचीही काळजी शाळेत घेतली जाते. कल्याणची पत्नी ही शाळा आणि शाळेचा अभ्यासक्रम अगदी समर्थपणे सांभाळते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण संपूर्ण गावात आज वाय-फाय कनेक्शन आहे. चोवीस तास वीज आणि स्वच्छ पाण्याची सोय. रुग्णालयही अगदी गावाच्या हद्दीत. कल्याणचा भर फक्त कृषिसुधारणेवर नाही, तर विज्ञानाची कास धरून नवनवीन प्रयोग करण्यासाठी गावकर्‍यांना प्रोत्साहित केले जाते. त्याचबरोबर संपूर्ण गावाचे दोन वेळचे जेवण एकत्रितरित्या ‘कम्युनिटी किचन’मध्येच बनवले जाते. तिथे कुठल्याही प्रकारे स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही. महिलांबरोबरच पुरुषही लहान मुलांची कुठलाही कमीपणा न मानता उत्तम काळजी घेतात. इतकेच काय तर जाती, धर्म यांच्या आधारावरही ग्रामस्थांच्या जबाबदार्‍यांचे वर्गीकरण नाही. सार्वत्रिक मेहनत आणि एकीचे बळ या तत्त्वावरच या गावाची संपूर्ण व्यवस्था आधारभूत आहे. ‘प्रोटो व्हिलेज’ मागच्या संकल्पनेमागची भूमिका विशद करताना कल्याण सांगतो की, “वनवासी, शेतकर्‍यांच्या जीवनमानातूनच मला खरी प्रेरणा मिळाली. कारण, ते त्यांच्या सभोवतालशी पूर्णपणे जोडलेले असतात. मी ही मग त्यांच्याच आयुष्यातील तीन प्रमुख तत्त्वांनुसार काम करण्याचे ठरविले. ती तत्त्वे म्हणजे, आपल्या मातीचा अभिमान, हवा-पाण्यावरील अवलंबित्व आणि त्याचा परिणाम साधणारी स्वयंपूर्णता.” खरंच कल्याणच्या या त्रिसूत्रीमुळे हजारो शेतकर्‍यांना विकासाचा मार्ग गवसला. आज आंध्र प्रदेशातील या ‘प्रोटो व्हिलेज’ला भेट देण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून लोक दाखल होतात. एकाच आशेपोटी, या गावचे झाले, तसे आमचेही ‘कल्याण’ व्हावे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@