घर सोडल्यावरही यायचा आईचा फोन : कंगना

    11-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : अभिनेत्री कंगना रनोट म्हणजे बॉलिवुडमधील एका बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्व! बॉलिवुडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी कंगनाने आजवर खूप संघर्ष केला. असे ती वारंवार सांगत असते. नुकतीच तिने आपल्या आईविषयी एक गोष्ट शेअर केली आहे.
 

काही वर्षांपूर्वी कंगना अभिनेत्री बनण्यासाठी घरातून मुंबईला पळून आली होती. त्यावेळी कंगनाशी घरातल्या कोणीही संपर्क करायचा नाही. अशी सक्त ताकिद तिच्या कुटंबातील एका सदस्याने घरातल्या सर्वांना दिली होती. तरीदेखील कंगनाला तिची आई रोज न चुकता फोन करायची. फोनवर बोलताना तिची आई दबक्या आवाजात बोलायची आणि जेवलीस का?” हा प्रश्न ती कंगनाला नेहमी विचारत असे. या प्रश्नाशिवाय आईने कंगनाला कधीच इतर काही विचारले नाही. असे म्हणत कंगना आईच्या आठवणीने भावूक झाली.

 

कंगना बॉलिवुडचे दार ठोठावण्यासाठी मुंबईला पळून आली होती. घरच्यांचा तिला विरोध होता. परंतु या विरोधाला न जुमानता कंगनाने मुंबई गाठली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला खूप संघर्ष करावा लागला होता. घर नसल्याने कंगनाला फुटपाथवर राहावे लागले होते. आधी कंगनाला इंग्रजी बोलता येत नव्हते. तिच्या रुपावरुनही अनेकजण तिची खिल्ली उडवत असत. असे कंगनाने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. आज कंगना रनोटचे नाव बॉलिवुडमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक कंगना आहे.

 

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी हा कंगनाचा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कंगनाने ही गोष्ट सांगितली. तसेच तिचा ‘मेंटल है क्या?’ हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/