राममंदिरासाठी लवकर निघावा सर्वमान्य तोडगा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018   
Total Views |

 
 
 
अयोध्या ही प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी आहे आणि जन्मस्थळी श्रीरामांचे भव्य मंदिर उभे झाले पाहिजे, ही समस्त हिंदू बांधवांची कामना आहे. सध्या प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालय त्यावर काहीच निवाडा देत नसल्याने जनभावना तीव्र आहेत. या तीव्र जनभावनांची दखल मुस्लिम बांधवांनी घेतली आणि मंदिर उभारणीसाठी सहमती दर्शविली, तर अधिक चांगले होईल. आधी त्या ठिकाणी श्रीरामाचे मंदिरच होते आणि बाबर नावाच्या आक्रमकाने ते पाडून तिथे मशीद बांधली होती, याचे सगळे पुरावे न्यायालयाला सादर करण्यात येऊनही रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्याबाबतचा निवाडा न्यायालय देत नाही, ही बाब रुचणारी नाही. हिंदूंनी गेली कित्येक वर्षे संयम पाळला आहे. त्यामुळे आणखी संयम पाळण्याचा सल्ला कुणीही न दिलेलाच बरा!
 
भारतात विविधता आहे आणि या विविधतेत सौंदर्यही दडले आहे. विविधता सगळ्यांनीच स्वीकारली आहे आणि त्यावर प्रत्येक भारतीयाला गर्वही आहे. भारताची संस्कृती ही हजारो वर्षे जुनी आहे. अशा या प्राचीन संस्कृतीवर अनेकदा आक्रमणे झालीत. पण, सगळी आक्रमणे परतावून लावत भारतीय प्राचीन परंपरा आजही मजबुतीने टिकून आहे. आपली ही जी प्राचीन संस्कृती आहे, ती संपूर्ण जगाला एक कुटुंब मानणारी आहे. हे भारतीय संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. भारतात अनेक धर्म आहेत, त्या धर्माची मतं आहेत. या सगळ्यांना भारतीय संस्कृतीने मान्यताही दिली आहे. सर्व प्रकारच्या विचारांना मान्यता देऊन भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला सहिष्णुतेचा पुरावाच दिला आहे. शांततापूर्ण सहजीवन हे भारतीय संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. या पृष्ठभूमीवर राममंदिर बांधण्याबाबत सर्वमान्य तोडगा लवकरात लवकर निघाला, तर जगासमोर भारताच्या आंतरिक शक्तीचे प्रदर्शन घडेल आणि यातून भारतीय संस्कृती आणखी उजळून निघेल.
 
राममंदिराच्या मुद्यावर सर्वमान्य तोडगा काढणे तसे कठीण नाही. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत आणि अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत जन्मभूमीवरील दावा सोडायला पाहिजे. त्याबदल्यात त्यांना मशिदीसाठी सर्व प्रकारची मदत हिंदू बांधव करतील, यात शंका नाही. आपले हित कशात आहे, हे मुस्लिम बांधवांनी लक्षात घ्यायला हवे. या मुद्यावर सकारात्मक सर्वमान्य तोडगा काढण्यात आपल्याला यश आले, तर अनेक जागतिक समस्यांवर तोडगा काढण्याची आपली क्षमताही मान्य केली जाईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमाही अधिक उजळून निघेल. विविध धर्म, प्रांत, भाषा असूनही भारतात सगळे लोक हजारो वर्षांपासून सामंजस्याने राहतात, हे सत्य जगाने आधीच स्वीकारले आहे. त्यामुळे राममंदिरासाख्या मुद्यावर सर्वमान्य तोडगा शांततामय मार्गाने निघाला आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले गेले, तर जगभर भारतीय ऐक्याचा आणखी मजबूत संदेश जाईल, हे लक्षात घेतले पाहिजे. जगात सगळीकडेच सध्या अस्थिर वातावरण आहे आणि या अस्थिरतेचा फटका मनुष्यमात्राला बसतो आहे. अशा परिस्थितीत जगाचा मार्गदर्शक म्हणून भूमिका घेण्याचा अधिकार भारताला प्राप्त होऊ शकतो आणि त्यातून जागतिक शांततेचा मार्गही मोकळा होऊ शकतो.
 
विज्ञान आणि तंत्रज्ञानात अफाट प्रगती झाली आहे. संपूर्ण जग जवळ आले आहे असे म्हटले जात असताना, माणसं एकमेकांपासून का दूर जात आहेत आणि हिंसेचा मार्ग अवलंबत आहेत, ही बाब चिंता वाढवणारी आहे. संपूर्ण जगातच लोकसंख्या वाढत आहे, गरिबी वाढत आहे, हिंसाचार वाढत आहे, दहशतवाद फोफावत आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता, आज जगातील प्रत्येक मोठ्या आणि प्रगत देशात विविध धर्म, पंथ, भाषेच्या लोकांना गुण्यागोविंदाने शांततामय मार्गाने सहजीवन जगणे क्रमप्राप्त झाले आहे. बाहेरून आलेल्यांना सहज स्वीकारणे ही सोपी गोष्ट नाही. पण, जे मूळ निवासी आहेत, त्यांना अशी स्वीकारार्हता दाखवावीच लागणार आहे. ही काळाची गरज आहे. आज युरोपातल्या अनेक प्रगत देशांमध्ये जे मुस्लिम स्थलांतरित आले आहेत, त्यांच्यामुळे अनेक देशांमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. पण, अशा घटना घडू नयेत यासाठी मूळ निवासी नागरिकांना पुढाकार घेऊन समस्येवर तोडगा काढावा लागणार आहे.
 
 
भारताने वैचारिक स्तरावर विविधतेचा जो स्वीकार केला, त्यासदर्ंभात महात्मा गांधी असे म्हणाले होते की, माझे घर हे चारही बाजूंनी भिंतींनी घेरलेले असावे आणि त्याला असलेली दारे-खिडक्या बंद असावीत, असे मला अजीबात आवडणार नाही. पण, मला असे वाटते की, माझ्या घराच्या आसपास देशी-विदेशी संस्कृतीचे वारे वाहिले पाहिजे, मात्र त्या वार्यांमुळे माझे जमिनीवर असलेले पायही घट्टच राहिले पाहिजेत. ते उखडले जाऊन मी तोंडावर आपटायला नको. माझा धर्म हा संकुचित आणि अनुदार निश्चितच नाही. महात्मा गांधींनी अतिशय सारगर्भित असे वर्णन केले होते. आज जगातील जे देश विविधतेत एकता स्वीकारू शकत नाहीत, त्यांनी महात्मा गांधींचे हे सारगर्भित वर्णन जरूर अंगीकारले पाहिजे.
 
 
 
त्या काळी महात्मा गांधी यांनी जे विचार व्यक्त केले होते, ते संपूर्ण जगाने अंमलात आणण्याची आवश्यकता असताना त्या विपरीत घडत आहे. सगळे धर्म दुसर्या धर्माला आपल्या बरोबरीचे आणि योग्य मानत नाही. भेदभाव केला जात आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण आहे. हिंसाचार बोकाळला आहे. दहशतवाद फोफावला आहे. लोकांमध्ये अविश्वास आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक धर्माने दुसर्या धर्माला योग्य मानले, समकक्ष मानले, त्या धर्माच्या भावभावनांचा आदर केला, तर आज सीमांच्या सुरक्षेसाठी आणि शस्त्रास्त्र खरेदीसाठी जो अवाढव्य खर्च केला जात आहे तो करावा लागणार नाही, शिवाय शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जो तणाव निर्माण झाला आहे, तो नष्ट होऊन शांतताही प्रस्थापित होऊ शकेल.
 
 
ईश्वरापर्यंत जाण्याचा सगळ्यांचा मार्ग एकच आहे, फक्त जीवन जगण्याची प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे, हे जरी मान्य केले, तरी जागतिक शांततेच्या दिशेने मोठे पाऊल पडू शकते. शिवाय, सैन्यशक्ती आणि शस्त्रास्त्रे यावर जो अवाढव्य आणि अनावश्यक खर्च होत आहे, तो खर्च वाचेल, त्या पैशातून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढीस लागेल आणि सरतेशेवटी संपूर्ण जगातील दारिद्र्य दूर करण्यास मदत होईल, हे लक्षात घेतल्यास फार मोठे काम फत्ते होईल. आज जगात कोट्यवधी लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत, कोट्यवधी लोकांना आरोग्याच्या सोईसुविधा उपलब्ध नाहीत, असुरक्षिततेची भावना मनात घर करून आहे. जगाने प्राचीन भारतीय संस्कृती समजूनच घेतलेली नाही. ज्या भारतीय संस्कृतीत विश्वबंधुत्वाची कल्पना सांगितली आहे, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही धारणा आहे, त्या भारतीय संस्कृतीला समजून घेण्यात जागतिक समुदाय कमी पडला, हेच शेवटी खरे!
 
 
 
कोणतीही संस्कृती असो, सभ्यता असो, भाषा असो, विज्ञान असो, गतिशीलता हे प्रत्येकाचे आवश्यक असे अंग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कालौघात जे परिवर्तन स्वीकारणे आवश्यक होते, ते भारतीयांनी स्वीकारल्याने आधीच प्रगल्भ असलेली आपली संस्कृती अधिकच समग्र झाली, हे मान्य करावे लागेल. जो मार्ग भारताने अवलंबला तो जगातल्या इतर देशांनी आणि धर्मांनीही अवलंबला, तर आज जी प्रचंड उलथापालथ होताना दिसते आहे, ती कमीकमी होत जाऊन शांतता प्रस्थापित होईल, हे निश्चित! भारतीय संस्कृतीचे भांडार जगात सर्वात श्रीमंत असे आहे. संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीच्या समृद्ध भांडाराएवढे भांडार अन्य कुठल्याही संस्कृतीचे नाही, असे महात्मा गांधी यांनी फार पूर्वी म्हटले होते, ते खरेच आहे. संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणार्या भारतात आज शांतता, सद्भाव अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे. मुस्लिम बांधवांनी न्यायालयीन खटला मागे घेत जन्मभूमीवर प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर बांधण्यास सहकार्य केले, तर आज राष्ट्रीय ऊर्जेचा जो अपव्यय होत आहे, तो थांबेल आणि संपूर्ण जगात एकतेचा संदेश जाऊन मानवकल्याणाच्या दिशेने पुढचे पाऊल पडेल...
 
 
- गजानन निमदेव
@@AUTHORINFO_V1@@