प्रेरणादायी कांचनमाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018   
Total Views |



जन्मांध असूनही आंतराष्ट्रीय स्तरावर एक सर्वोत्कृष्ट जलतरणपटू म्हणून अमरावतीच्या कांचनमालाचा प्रवास जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं.

 

कोणतेही शारीरिक व्यंग असले तरी, मनात जिद्द असेल, तर कशावरही मात करता येते. फक्त मनात जिद्द आणि जिंकण्याची इच्छाशक्ती असायला हवी. मग परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीवर मात करता येते. अशीच प्रेरणादायी कहाणी कांचनमाला पांडे हिची. तिला नुकताच केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कांचनमाला जन्मांध असून तिने जलतरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. जन्मांध असूनही आंतराष्ट्रीय स्तरावरील एक सर्वोत्कृष्ट जलतरणपटू म्हणून तिचा हा प्रवास जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं. कांचनमाला ही मूळची अमरावतीची... कांचनमाला जन्मापासूनच अंध आहे. मात्र, जगाला हेवा वाटावा अशी कामगिरी तिने करून दाखवली. तिचे वडील पेशाने हॉकी खेळाडू असल्याने घरात खेळाविषयीचे वातावरण होतेच. आपली मुलगी अंध जन्मली म्हणून काय झालं, ती खेळाडू झालीच पाहिजेच, असा तिच्या वडिलांचा अट्टाहास होता. अंध असल्यामुळे इतर कोणत्या खेळात पारंगत होण्यास वेळ गेला असता आणि सांघिक खेळ प्रकारात आपण तिला प्रशिक्षण देऊ शकत नाही, म्हणून तिच्या वडिलांनी जलतरणाचा पर्याय निवडला. वयाच्या अवघ्या १०व्या वर्षापासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात तिने पोहायला सुरुवात केली. डोळस व्यक्तीलाही पोहणे शिकण्यासाठी बऱ्यापैकी कालावधी लागतो. मात्र, कांचनमाला अवघ्या आठ दिवसांत व्यवस्थित पोहायला शिकली. यावरूनच तिच्या क्षमतेचा अंदाज घेऊन वडिलांनी तिचा सराव सुरू ठेवला.

 

सराव चालू असताना किंवा एखाद्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर इतर स्पर्धक एका दिशेने पोहतात. मात्र, कांचन अंध असल्याने ती वाकडी-तिकडी पोहत अंतर पार करायची. यानंतर मात्र तिच्या वडिलांनी आणि प्रशिक्षकांनी २००२ साली ’सी स्विमिंग’ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी मुंबई महानगरपालिकेने हा मृत्यूशी खेळ आहे, म्हणत त्यांना परवानगी नाकारली. मुंबई महानगरपालिकेचा नकार साहजिकच होता. कारण, यापूर्वी असं धाडस भारतात कोणीही केलं नव्हतं. शेवटी कांचनमालाच्या पालकांनी ‘सरावादरम्यान काही झालं, तर ती आमची जबाबदारी असेल,’ अशा आशयाचा बॉण्ड महापालिकेला लिहून दिला. शेवटी कांचनची इच्छाशक्ती पाहून महापालिकेने तिला ‘सी स्विमिंग’ची परवानगी दिली. परवानगी मिळाल्यानंतर कांचनने सन रॉक ते गेट वे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या १ तास १४ मिनिटांमध्ये पूर्ण करत लिम्का बुकमध्ये नोंद केलीडोळस व्यक्तीपेक्षा कमी वेळेत सन रॉक ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर पार केल्यानंतर कांचनमाला देशभरात चर्चेत आली. विशेष म्हणजे, कांचन अंध असूनदेखील आतापर्यंत सर्वसामान्य गटातून स्पर्धा लढत होती. ऐतिहासिक वेळेत हे अंतर पार केल्यानंतर तिला कळलं की, अंध व्यक्तींसाठीदेखील स्वतंत्र स्पर्धा असते. त्यानंतर तिने याकडे करिअर म्हणून पाहिले. त्यानंतर आतापर्यंत तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकीकडे पोहण्याचा सराव सुरू असला तरी, अभ्यासाकडे तिने कधीच दुर्लक्ष केलं नाही. म्हणूनच ती दहावी व बारावीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झाली. अभ्यास व सराव करत असताना ती बँकिंगची तयारीदेखील करत होती. प्रचंड इच्छाशक्ती असणारी कांचन हार मानणारी नव्हती. जे काम करेल त्यात आपलं १०० टक्के द्यायचं. कारण, आजपर्यंत तिला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळाली नव्हती. प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला होता. म्हणूनच ती म्हणते, “संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि सहजासहजी मिळालेल्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते. म्हणूनच आयुष्यात संघर्ष हवाच...”

 

कांचनमालाने अंधांच्याराष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक सुवर्णपदकांची कमाई केली आहे. दहांहून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले. यामध्ये तिने अनेक पुरस्कारांवर व पदकांवर आपली मोहर उमटवली आहे. मेक्सिको येथे पार पडलेल्या ‘पॅरा वर्ल्ड स्वीमिंग चॅम्पियनशिप-२०१७’ स्पर्धेत कांचनमालाने भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. या स्पर्धेतसुवर्णपदक मिळवणारी ती भारताची पहिली जलतरणपटू ठरली होती. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिला १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. सराव व महाविद्यालयाचा अभ्यास करत असताना २०१५ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. तेव्हापासून ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेत साहाय्यक पदावर कार्यरत आहे. ते म्हणतात ना, मनावर घेतले, तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असेच कांचनमालाने शिक्षण, खेळ आणि बँकिंग परीक्षेचा हा प्रवास अगदी थक्क करणारा... जन्मांध असूनही तिचा हा प्रेरणादायी प्रवास डोळस व्यक्तींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@