चिरदाह वेदनेचा शाप...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018   
Total Views |



‘काटा रूते कुणाला’ हे शांता शेळके यांनी लिहिलेले आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले अप्रतिम नाट्यपद ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकात आहे. याच पदाचा थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला असता, हे पद महाराष्ट्राच्या विद्यमान राजकीय परिस्थितीत चपखलपणे लागू पडत असल्याचं लक्षात येतं. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांच्या बाबतीत ‘सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जीवाची’ या ओळी तर अगदी तंतोतंत लागू पडतात. आता धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकांचंच उदाहरण घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रभाव असलेली आणि भारतीय जनता पक्षाचं फारसं अस्तित्व नसलेली ही शहरं. मात्र, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत राज्यातील आणखी एक महापालिका आपल्या खिशात टाकली. दुसरीकडे अहमदनगरमध्ये कोणताही पक्ष स्पष्ट बहुमत मिळवता न आल्याने त्रिशंकू परिस्थिती उद्भवली आहे. शिवसेनेला नगरमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. या दोन निवडणुकांत भाजपचं यश किती, त्यामागील कारणं वगैरे कवित्व पुढील काही दिवस सुरू राहील. मात्र, या सगळ्यात ठळकपणे जाणवून येणारी गोष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कुठल्याच चर्चेच्या केंद्रस्थानी नसणं. महाराष्ट्रात भाजपप्रणित सरकार सत्तेत आल्यापासून आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपने एकामागोमाग एक निवडणूक जिंकण्याचा सपाटा लावला आहे. मग ती महापालिका असो वा नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक. प्रत्येक ठिकाणी भाजप हा क्रमांक एकचा पक्ष म्हणून उदयाला आला आहे आणि या प्रत्येक निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, पक्षावरील पकड आणि जनमानसातील प्रतिमा अधिकच ठळक होत गेली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, सोलापूर, मीरा-भाईंदर, अमरावती, उल्हासनगर, अकोला, पनवेल, चंद्रपूर, लातूर इथपासून ते अलीकडेच झालेल्या जळगाव आणि सांगलीच्या निवडणुका. नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची यादी तर आणखी मोठी आहे. या मालिकेत आता धुळ्याची भर पडली आहे. प्रत्येकवेळी राजकीय पंडित आणि विश्लेषक वगैरे मंडळी ‘आता भाजपला गाशा गुंडाळावा लागणार’ वगैरे भाकितं करतात परंतु, प्रत्येकवेळी भाजपच दणदणीत मुसंडी मारतो, हे कोडं सोडवणं आज भल्याभल्यांना अवघड होऊन बसलं आहे.

 

‘कपाळमोक्ष’ निश्चित?

 

एकीकडे भाजपने विजयाचा सपाटा लावलेला असताना दुसरीकडे विरोधी पक्षांची जागाही भाजप आणि भाजपचा सरकारमधील सहयोगी पक्ष शिवसेनाच भरून काढत आहे, हे विशेष. काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येक निवडणुकीत पराभूत होतात, यापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येक निवडणुकीत कोणत्याच चर्चेत नसतात, हे वास्तव अधिक प्रकर्षाने जाणवणारं आहे. हेच वास्तव काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी भविष्यकालीन धोक्याची घंटा गेली चार वर्षे वाजवत आहे, परंतु दोन्ही पक्षांच्या नेत्यांना काही केल्या शहाणपण येताना दिसत नाही. महापालिका असो किंवा अन्य कोणतीही निवडणूक, भाजप पहिल्या स्थानी असो वा नसो, पहिल्या दोन स्थानांवर भाजप आणि शिवसेना हेच दोन पक्ष आलटून-पालटून आलेले दिसतात. विरोधी पक्ष म्हणून जे काही अस्तित्व असायला हवं आणि विद्यमान परिस्थितीत ती ‘स्पेस’ काँग्रेस-राष्ट्रवादीकडे असायला हवी, ती स्पेसही भाजप-शिवसेनाच भरून काढत आहेत. अपवाद घ्यायचाच झाला तर नांदेड, मालेगाव, भिवंडी वगैरे निवडणुकांचा घेता येईल. अशी दोनचार ठिकाणं वगळता बाकी बहुतेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. अहमदनगरचंच उदाहरण घ्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात याच जिल्ह्याचे. असं असतानाही नगरच्या निवडणुकीत काँग्रेसला जागा किती? तर ६८ पैकी केवळ ४! एवढे वजनदार नेते या जिल्ह्यातून येतात परंतु, हे काँग्रेसचं बलस्थान नसून ती डोकेदुखी बनली आहे. कारण या दोघांमध्ये असलेला परंपरागत वाद. या अशा भानगडी जवळपास प्रत्येक ठिकाणी आढळून येतात आणि याच गोष्टी काँग्रेस-राष्ट्रवादीला पोखरत चालल्या आहेत. एकीकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील, थोरात दुसरीकडे अजित पवार, जयंत पाटील, तटकरे, वळसे-पाटील वगैरे एकेक दिग्गज नेत्यांची मांदियाळी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आहे. परंतु, नाव मोठं आणि लक्षण खोटं अशीच परिस्थिती या सर्व नेत्यांची आहे. याउलट, भाजप तर केवळ देवेंद्र फडणवीस या एका नावावर निवडणुकांमागून निवडणुका जिंकत चालला आहे. हा वारू कसा रोखायचा याचं उत्तर शोधण्याऐवजी हे दिग्गज नेते एकमेकांचे पाय खेचण्यात व्यस्त आहेत. पायाखाली अंधार असताना आकाशात झेपावण्याची स्वप्नं पाहत राहणं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दररोज महागात पडत आहे आणि हे असंच जर चालू राहिलं तर पुढच्या वर्षभरात ‘कपाळमोक्षा’ची वेळ ओढवणार, हे निश्चित आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@