वृत्तनिवेदनाचा यंत्रमानवी थाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2018   
Total Views |
 
 

बातमीच्या स्वरूपानुरूप चेहर्‍यावर गांभीर्य किंवा मंद स्मित, आवाजाचेही तसेच प्रसंगानुरूप चढउतार, ‘ब्रेकिंग न्यूज’ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा हातखंडा... एका उत्तम, कुशल, प्रशिक्षित वृत्तनिवेदकाची ही काही प्रमुख लक्षणे... वृत्तनिवेदकाचा टापटीपपणा आणि त्याच्या आवाजातील जादू हीच त्यांची खरी खासियत.

 
 

प्रेक्षकांनाही एखाद्या खास वृत्तनिवेदकाने प्रस्तुत केलेल्या बातम्या अगदी स्मरणात राहतात. हे वृत्तनिवेदक म्हणजे त्या वृत्तवाहिन्यांचा चेहराच. प्रेक्षकांसाठी ते फक्त पत्रकार, वृत्तनिवेदक नाहीत, तर अगदी सेलिब्रिटीच. मराठी असो वा हिंदी, अशा बर्‍याच सुप्रसिद्ध वृत्तनिवेदकांची नावे अगदी लोकांच्या तोंडावर रुळलेली. कारण, हे वृत्तनिवेदक शेवटी रोज एका ठराविक वाजता, ठराविक वाहिनीवर हजेरी लावतात. त्यांच्याऐवजी दुसर्‍या वृत्तनिवेदकाला बघून बरेचदा बातम्या ‘ऐकाव्याशा’ही वाटत नाहीत... तर असा हा वृत्तनिवेदकांचा महिमा. म्हणजेच, कोसो दूर असले तरी टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांची वृत्तनिवेदकांशीही नाळ जोडलेली असतेच. एक अदृश्य मानवी एकतर्फी संबंध. तरी हल्ली सोशल मीडियामुळे आपल्या आवडीच्या वृत्तनिवेदकाशीही आपण अगदी सहज संवाद साधू शकतोच. पण, कदाचित काही वर्षांनी हे संपूर्ण चित्रच पालटू शकते. म्हणा, त्याची सुरुवात चीनमध्ये झाली आहेच. कारण, वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत एका यंत्रमानवाला अर्थात, रोबोला चक्क ही जबाबदारी देण्यात आली, जी साहजिकच त्याने अचूकपणे निभावली. ‘झिंक्वा’ या चिनी वृत्तसंस्थेने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेला झँग झाओ नामक हा पहिला वृत्तनिवेदक रोबो...

 
 

या रोबोच्या वृत्तनिवेदनाचा पहिला व्हिडिओही बराच व्हायरल झाला आहे. खरं तर जोपर्यंत तो सांगत नाही की, मी रोबो आहे तोपर्यंत त्याच्या ‘कृत्रिम’ अस्तित्वाची जाणीव आपल्याला होत नाही. अगदी नैसर्गिक दिसणारा मानवी चेहरा, चेहर्‍यावरच्या हालचाली आणि एकूणच ‘स्क्रिन हायजिन.’ साहजिकच, या रोबोमुळे वृत्तनिवेदनाचे काम अधिक चोखपणे, बिनचूक आणि महत्त्वाचे म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेजिन्स’च्या जोरावर पार पडेल. या रोबोला केलेल्या सूचनांनुसार तो आपली जबाबदारी तर निभावेल. पण, त्याचबरोबर आसपासच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज याचाही इंटरनेटच्या माध्यमातून त्याला थेट आढावा घेता येईल. न दमता, न चुकता कितीही तास सलग काम करू शकणारा, आजारी न पडणारा असा हा रोबोरुपी वृत्तनिवेदक. यामुळे वृत्तसंस्थेच्या खर्चातही कपात होणे अपेक्षित असून अशाच रोबोंची संख्या वाढल्यास मानवी वृत्तनिवेदकांच्या नोकर्‍यांवर मात्र कायमची गदाही येऊ शकतेच. पण, तूर्त तरी असे दोन रोबो सज्ज असून चीनमधील सर्च इंजिन ‘सोगोऊ डॉट कॉम’च्या मदतीने ‘झिंक्वा’ने हा इंग्रजी आणि चिनी भाषेत वृत्तनिवेदन करणारा रोबो आकाराला आणला. चीनमध्ये झालेल्या पाचव्या जागतिक इंटरनेट परिषदेच्या व्यासपीठावरून या रोबोला जगासमोर सर्वप्रथम आणले गेले. त्यामुळे अग्रलेख लिहिणार्‍या रोबोनंतर आता चीनने थेट वृत्तनिवेदक रोबो जगासमोर आणल्याने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

 
 

हा रोबो जरी माणसासारखा दिसणारा असला, बोलणारा असला तरी, त्यात ‘ह्युमन टच’ नसल्याचा शेराही काही चिनी नागरिकांनी मारलाच. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका ठराविक वेळेनंतर या वृत्तनिवेदकाला टीव्हीच्या पडद्यावर पाहणे काही योग्य वाटले नाही, तर काही चिनी नागरिकांना हा प्रयोग मात्र अतिशय आवडला. खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान आणि रोबोंची संख्या वर्षागणिक वाढते आहेच. परंतु, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताच्याही पुढे असणार्‍या चीनमध्ये हे नवतंत्रज्ञानाचे वारे बेरोजगारीचे तुफान तर घेऊन येणार नाहीत ना, याचा विचार करावाचा लागेल. कारण, भारत, चीनसारख्या देशात मनुष्यबळाच्या टंचाईचा प्रश्नच नाही, उलट इथे कितीतरी हातांना आजही रोजगाराची आवश्यकता आहेच. अशावेळी केवळ व्यावसायिकांच्या नफ्यापोटी नोकर्‍यांचे असे रोबोटिकरण करणे कितपत योग्य, हा प्रश्न पडतोच. त्यात आज चीनने वृत्तनिवेदक म्हणून रोबो उभे केले, उद्या हाच महत्त्वाकांक्षी चीन मानवी सैन्यकपात करून सैनिक म्हणूनही रोबोंची फौजच्या फौज उभी करायलाही मागे-पुढे पाहणार नाही. म्हणूनच, काळाची पावलं वेळीच ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्सचा ताळमेळ साधायलाच हवा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@