‘देवबंद’ सांगते नेलपॉलिश बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018   
Total Views |



मुस्लीम समाजात दारुल उलूम देवबंदचे फतवे काही नवीन नाहीत. दर चार महिन्यांनी अमुककरावे, तमुक करू नये, ही गोष्ट इस्लाममध्ये वर्ज्य असे व्यक्तिस्वातंत्र्यावर धर्माच्या नावाखाली मर्यादा घालणारे फतवे जारी करणे हेच जणू देवबंदचे आद्यकर्तव्य. त्यात आता भर पडली आहे ती नेलपॉलिश न लावण्याची. म्हणजे मुस्लीम महिलांनी वॅक्स करू नये, परपुरुषांच्या हातून बांगड्या भरणे गैरइस्लामिक आणि आता नेलपॉलिशबंदीचा फतवा. मुस्लीम महिलांचे जिणे आधीच पिचलेले, त्यात आता ही अशा फतव्यांची भर. खरंतर हा फतवा किती मुस्लीम महिला स्वीकारतील, हा संशोधनाचाच विषय असला तरी देवबंदच्या फतवेबाजीचा एकदाचा सोक्षमोक्षच या मुस्लीम महिलांनी पुढाकार घेऊन लावायला हवाच. सौंदर्य हा स्त्रीचा दागिना. त्यात मेकअप, नेलपॉलिशसारखे प्रकार या सौंदर्यात अधिक भर घालण्यासाठी अगदी सामान्यपणे महिलांकडून वापरले जातात. त्यात गैर, कोणत्याही धर्माचा अपमान करणारे काही नाही... पण, इस्लाममधील देवबंदसारख्या अशा काही कट्टर धर्मांधळ्या मौलवींना ते मान्य नाही. खरं बघायला गेलं तर, मुस्लीम महिला अगदी नखशिखांत काळ्या बुरख्यात धार्मिक अपरिहार्यतेमुळे वावरत असतात. त्यात त्यांच्या केसापासून अगदी पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर व्यवस्थित झाकलेले. डोळ्यांना काय ते चालण्यापुरते दिसते तेवढे पुरे. त्यातही डोळ्यांवरील बुरख्याच्या भागात जाळी असतेच. तरीही या महिलांना बुरख्याची सवय करावीच लागते. तो अंगवळणी पडतो. पण, मग बुरख्याच्या आत जर या महिला रंगीबेरंगी कपडे, नेलपॉलिश, वॅक्सिंग करत असतील तर त्यात गैरइस्लामिक ते काय? देवबंदच्या आणखी एका महिलाविरोधी फतव्याची बातमी वाचून गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाची आठवण झाली. त्यातील मुस्लीम तरुणीला जिन्स घालणे, उंची चपला घालणे, इतर महिलांसारखे सजणे-सवरणे याची अतिशय आवड. पण, घरातील कडक वातावरणामुळे तिला आपल्या आवडींना मुरड घालावी लागते. पण, घरातून बुरखा घालून निघणारी हीच मुस्लीम तरुणी बुरख्याशिवाय महाविद्यालयात पोहोचते. बिचारीची चोरी पकडली जाते. बिंग फुटते आणि तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर पुन्हा एकदा धार्मिक रुढींखाली नख लावले जाते. देवबंदचेही असेच धोरण- नखं दाखवू नका, नखं रंगवू नका, कारण, महिलांनो, आमची नखंच तुमचे स्वातंत्र्य, सौंदर्य ओरबाडणारी...

 

खरगेंची खर्डेघाशी

 

जसजशा निवडणुका तोंडावर येऊ लागल्या आहेत, तसतसा राहुल गांधींसह अख्खा काँग्रेस पक्ष अधिक सैरभैर होताना दिसतो. राफेल करारावरून मोदींना लक्ष्य करण्यात एकीकडे राहुल गांधींना परमानंद होतोय, तर दुसरीकडे त्यांची नेतेमंडळी ‘संविधान बचाव’ची हाक देत देशभर बोंबलत फिरताना दिसतात. खरंतर भाजप-मोदींच्या भीतीमुळेच ‘संविधान खतरे में’ हा काँग्रेसी अन् कम्युनिस्टांनी निर्माण केलेला कावा. सर्वसामान्य भारतीयांना असे दुरान्वयानेही वाटत नसावेच. पण, काँग्रेसकडे भाजप-संघाला विरोध करण्यासारखे ठोस मुद्देच नाहीत. त्यामुळे राफेल, पंतप्रधान पीक विमा योजना यासारखे तथ्यहीन विषय ‘घोटाळा’ म्हणून ‘एक्सपोज’ करण्याची एकच चढाओढ सध्या काँग्रेसमध्ये लागलेली दिसते. आपल्या हायकमांडला खुश करण्यासाठी मोदींना कोण, किती, कसे अश्लाघ्य भाषेत अपमानित करतोय, याची जणू स्पर्धाच काँग्रेसमध्ये रंगलीय. त्याचाच कळसाध्याय गाठणारे मल्लिकार्जुन खरगेंचे मोदींची थेट हुकूमशहा हिटलरशी तुलना करणारे एक निर्लज्ज वक्तव्य समोर आले. खरगे म्हणतात, जे हिटलरने जर्मनीत केले, म्हणे ते मोदींना भारतात करायचे आहे. हिटलरने जर्मनीत काय केले, ते वेगळे सांगायला नकोच. पण, हिटलरसारखे मोदींचे मनसुबे असल्याचा भयंकर विचारही मनात येणे हेच केवळ बौद्धिक दारिद्य्राचे लक्षण म्हणावे लागेल. कारण, मोदींमध्ये १ टक्का जरी हिटलरचे गुण असते तर आतापर्यंत काँग्रेसचा हात काय, साधं बोटही दिसलं नसतं. पण, तोंडाला येईल ते बरळण्याचा खरगेंचा तसा जुनाच इतिहास. “स्वातंत्र्यसंग्रामात तुमचं कुत्रं तरी मेलंय का?” असा उर्मठ प्रश्न भाजप-संघाला विचारणाऱ्या याच खरगेंची बोलती लोकसभेतही मोदींनीच सणसणीत उत्तर देऊन बंद केली होती. पण, खरगेंची खर्डेघाशी अजूनही सुरूच आहे. चार वर्षांत भाजपची योग्य दिशेने पावलं पडत नसल्याचे सांगण्यापूर्वी खरगेंनी जरा स्वत:च्याच पक्षाचा इतिहास नीट चाळावा. मोदी आणि भाजपवर सरकारी संस्था नष्ट करण्याचा थातुरमातुर आरोप करण्यापूर्वी खरगेंनी अगदी इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळापासून ते राहुल गांधींनी मनमोहन सिंग सरकारचा अध्यादेश फाडण्यापर्यंतच्या कृतीचे समस्त भारतीयांना आधी स्पष्टीकरण द्यावे. पण, खरगे, ते कुठल्या तोंडाने देतील म्हणा. त्यामुळे हुकूमशाही, माध्यमांची मुस्कटदाबी, संविधानातील बदल हे ‘हिटलरी’ गुण खरगेंनी काँग्रेसच्या इतिहासात डोकावून बघावे. त्यांना उत्तर आपसूकच मिळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@