अमेरिकी ‘समोसा कॉकस’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018   
Total Views |



राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या मध्यवर्ती निवडणुकीमध्ये जर निराशाजनक कामगिरी केली किंवा दोन्ही सभागृहातील सदस्य निवडून आणताना त्यांची दमछाक झाली, तर ट्रम्प यांना आगामी दोन वर्ष मात्र धोकादायक सिद्ध होऊ शकतात.

 

दैनंदिन वाचनात अमेरिकेसंबंधित एकही विषय सापडणार नाही किंवा अमेरिका मुळात चर्चेतच नाही, असा एकही दिवस नाही. अर्थातच, अमेरिकेला ‘जगन्मान्य’ महासत्तेचा बहुमान मिळाला असल्याने ती चर्चेच्या केंद्रस्थानी असणं तसं अगदी स्वाभाविक म्हणा. मात्र, सध्या अमेरिकेने इराणवर घातलेले तेलनिर्बंध व अमेरिकेत होत असलेल्या मध्यवर्ती निवडणुका जगाच्या पाठीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आज होत असलेल्या या मध्यवर्ती निवडणुका जगभरात चर्चिल्या जात असल्या तरी यात भारतीय वंशाच्या शेकडो उमेदवार विशेष लक्षवेधी ठरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने डॉ. अमी बेरा, प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती आणि रो खन्ना या चौघांची नावे अमेरिकेत सर्वात जास्त चर्चेत आहेत. हे चौघेही अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’चे प्रतिनिधी आहेत, तर शिव अय्यादुराई हे अमेरिकन सिनेटचे सदस्य आहेत.

 

अमेरिकेत सध्या भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या १ टक्के आहे. त्यामुळे भारतीयांची मते झोळीत टाकण्यासाठी मध्यवर्ती निवडणुकांत भारतीय उमेदवार उभे केलेले दिसतात. यात डॉ. अमी बेरा हे सर्वाधिक चौथ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. तसेच ४३५ जागांसाठी १०० पेक्षा जास्त भारतीय उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे, इथे निवडून येणाऱ्या भारतीय वंशांच्या सदस्याला ‘समोसा कॉकस’ म्हटले जाते. या ‘समोसा कॉकस’मध्ये सध्या पाचच सदस्य असले तरी आज होणाऱ्या १०० भारतीय ‘समोसा कॉकस’ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद होणार आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचेदेखील भविष्य ठरणार आहे. त्यामुळे अमेरिकेबरोबरच भारताचेदेखील या निवडणुकांवर लक्ष लागून राहिले आहे. याचमुळे ही अमेरिकेची मध्यवर्ती निवडणूक नेमकी काय असते आणि याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कसे परिणाम होतील, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

 

अमेरिकेमध्ये दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत असतात, तर मध्यवर्ती निवडणुका दर दोन वर्षांनी होतात. २०१६ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे आज दोन वर्षांनी मध्यवर्ती निवडणुका होऊ घातल्या आहेत. ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस’ व ‘सिनेट’ या दोन अमेरिका सभागृहांसाठीच्या या निवडणुका. प्रामुख्याने ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस’ सभागृहाच्या सदस्यांचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असतो, तर ‘सिनेट’च्या सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो. त्यामुळे दर दोन वर्षांनी ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस’चे सदस्य बदलतात, तर दर दोन वर्षांनी सिनेटच्या एक तृतीयांश जागा रिक्त होतात. आज होऊ घातलेल्या या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये सिनेटच्या ३५ व ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस’च्या ४३५ जागांसाठी निवडणुका होत आहेत. २०१६ साली झालेल्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने २३५ जागा जिंकल्या होत्या, तर १०० सदस्य असलेल्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे सध्याला ५१ सदस्य आहेत. त्यामुळे निर्णायक अशा या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारतंय, यावर अमेरिकेन राजकारणाच्या पुढील दिशा ठरणार आहेत.

 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या मध्यवर्ती निवडणुकीमध्ये जर निराशाजनक कामगिरी केली किंवा दोन्ही सभागृहातील सदस्य निवडून आणताना त्यांची दमछाक झाली, तर ट्रम्प यांना आगामी दोन वर्ष मात्र धोकादायक सिद्ध होऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने दोन धोके वर्तविले जातात. यातील पहिला म्हणजे, या दोन वर्षांत त्यांना निर्णय घेताना व महत्त्वपूर्ण कायदे करताना अडचणी निर्माण होतील, तर दुसरा धोका असा की, रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांच्या प्रमाणात डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिक सदस्य निवडून आले तर ट्रम्प यांच्या खुर्चीलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेमध्ये काय खलबतं होतात, ते पाहावे लागेल. पण, काहीही असले तरी या निवडणुकांमध्ये ‘समोसा कॉकस’चा महत्त्वपूर्ण वाटा असेल, हे निश्चित. त्यामुळे आता ट्रम्प यांची आतापर्यंतची वादग्रस्त कारकीर्द व स्वतःच्या पक्षातूनच वाढता विरोध ही ट्रम्प यांच्याविरोधातील ठिणगी या निवडणुकांमध्ये दिसून आल्यास त्यांच्या अडचणी येत्या काळात अधिकच गंभीर रुप धारण करतील, यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@