नद्या व हिमनद्या : भाग १३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018   
Total Views |


मागील लेखात आपण गाळाच्या व रूपांतरित खडकांबद्दल माहिती घेतली. या लेखात आपण नद्या व हिमनद्यांविषयी माहिती घेऊ. नदीचे मानवी जीवनातील महत्त्व सर्वांना परिचयाचे आहेच. जगातील अनेक पुरातन संस्कृती नदीकिनारीच उदयास आल्या. इथपासून नद्यांना येणार्‍या पुरांमुळे झालेल्या हाहाकारापर्यंतची माहिती ढोबळमानाने सगळ्यांनाच असते. आता आपण नदीचे भूशास्त्रीय कार्य बघू.

 
 

भूशास्त्रामधील ‘पोटॅमोलॉजी’ (Potamology Potamos = River, Logia = Study) अर्थात, ‘नदीशास्त्र’ ही शाखा नद्यांच्या शास्त्रीय अभ्यासासाठी वाहून घेतलेली आहे. शास्त्रीय अभ्यासात नदीचा प्रवाह, त्या प्रवाहामुळे तिच्या पात्राची झालेली झीज तसेच तिने वाहून आणलेला गाळ इ.चा अभ्यास केला जातो. याशिवाय प्रवाहामुळे निर्माण झालेल्या विविध भूस्तरांचाही अभ्यास केला जातोनदीचे कार्य हे तिच्या वैशिष्ट्यांबरोबरच तिच्या आसपासच्या पर्यावरणावरही अवलंबून असते. नदीचा उगम डोंगरात कुठेतरी होतो व भूगर्भातील अंतर्गत हालचालींमुळे डोंगरात निर्माण झालेल्या खाचखळग्यांमधून ती उताराच्या दिशेने वाहते. डोंगरउतारावरून ती वाहत असताना तिच्या समोर असलेल्या अडथळ्यांवर तिचा वेग अवलंबून असतो. याशिवाय उताराचा कोनही यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हे सगळे होत असतानाच त्या परिसरातील वातावरणाचाही नदीच्या प्रवाहावर परिणाम होतो. जेवढा प्रवाहाचा वेग जास्त, तेवढा गाळ नदी आपल्याबरोबर घेऊन येते. याचे कारण म्हणजे, नदीमधील पाण्याचे रेणू तिच्या पात्राच्या तळाशी व काठावर सतत घासत असतात. यामुळे नदी व काठ यांच्यात घर्षणीय बल (Shear Force) निर्माण होते. जेवढा नदीचा वेग जास्त, तेवढे हे बल जास्त. यामुळे काठावरील माती, दगड इ. त्यांच्या जागा सोडून नदीबरोबर वाहत जातात. यातसुद्धा जर काठावरील खडक हे गाळाचे खडक असतील, तर हे प्रमाण जास्त असते. कठीण अग्निजन्य खडकांच्या बाबतीत हे प्रमाण कमी असते.

 
 

या कारणांमुळे विविध भूस्तरांची निर्मिती होत असते. नदीच्या पात्राच्या तळाशी या कार्यामुळे खड्डे पडतात. यांना ‘रांजण खळगे’ म्हणतात. तसेच जसजशी जमिनीची धूप वाढत जाते, तसतसे नदीचे पात्र मोठे होत जाते. यामुळे प्रचंड मोठ्या दर्‍या तयार होतात. काही ठिकाणी फार मोठ्या प्रवाहांमुळे डोंगरच्या डोंगरसुद्धा पोखरले गेल्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेतील ‘ग्रँड कॅनियन’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. नदीच्या कार्याचे सर्वांत लोकप्रिय उदाहरण म्हणजे ‘धबधबे!’ स्तरित खडकांवरील अतितीव्र उतारावरून वाहत असताना नदी तुलनेने मऊ खडकांची कठीण खडकांच्या तुलनेत जास्त धूप करते. त्यामुळे तेथे एक प्रकारचा खळगा तयार होतो. त्याचा आकार कालांतराने मोठा होतो व एक क्षण असा येतो की, नदीचे पाणी सरळच्या सरळ त्या खळग्यात पडायला सुरुवात होते. यालाच आपण ‘धबधबा’ म्हणतो. जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे अमेरिकेतील नायगरा धबधबा. याशिवाय काही वेळा नदी वेडीवाकडी वळणे घेत गेलेली दिसते. याचे कारण म्हणजे जेव्हा नदी तिचा रस्ता स्वतः तयार करते तेव्हा ती प्रवाहात अडथळा आणणार्‍या खडकांपैकी तुलनेने मऊ खडकांचीच प्रामुख्याने धूप करते. म्हणूनच जर हे खडक उतारावर वर्तुळाकार पसरले असतील, तर नदीही त्याच आकाराची पुनरावृत्ती करून वळणे घेते. यामुळे नदीला नागमोडी आकार येतो. या प्रकाराला ‘रिव्हर मिईंडरिंग’ (River Meandering) असे म्हणतात. काही वेळा अशा एका वळणावर जर अजून मऊ खडक असतील, तर नदी त्याही खडकांची धूप करून परत मुख्य प्रवाहात येऊन मिळते. त्यामुळे त्या वळणावर नालाच्या आकाराचे सरोवर तयार होते. या सरोवराला ‘नालाकृती सरोवर’ (Oxbow Lake) म्हणतात.

 
 

 
 
 

नदीची एवढी माहिती घेतल्यावर आता आपण नदीसारख्याच दुसर्‍या एका प्राकृतिक घटकावर नजर टाकू. हा घटक म्हणजे ‘हिमनदी’ (Glacier). हिमनदीचा अभ्यास हा ‘ग्लेशिऑलॉजी’ (Glaciology, Glacies = Frost, Logia=Study) या विषयांतर्गत केला जातो. हिमनदीचा वाच्यार्थ म्हणजे बर्फाची नदी असा आहे. हिची व्याख्या ‘वाहणारे बर्फाचे तुकडे’ अशीही करता येते. साधारणपणे हिमनदीची घनता ०.०५ ते ०.५ ग्रॅम/घन सें.मी. एवढी कमी असते. तसेच हिमनदीतील बर्फ हा बर्‍याचदा ठिसूळ असतो व त्यात हवेचे प्रमाण बरेच जास्त असतेजे बर्फ स्वतःचे स्वतः वहन करतो त्यातून निर्माण होते ती हिमनदी होय. हे आपण वर पाहिलेच. या हिमनदीचेही दोन प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे

 
 

१. बर्फाच्या लाद्या (हिमलादी - Ice Sheets) - ध्रुवीय प्रदेशांमध्ये या प्रकारच्या हिमनद्या पाहायला मिळतात. या हिमनद्या एवढ्या मोठ्या व जाड असतात की, त्यांच्याखाली पृथ्वीची इतर सर्व वैशिष्ट्ये झाकली जातात. या प्रकाराचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अंटार्क्टिकावरील हिमलादी. हिच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ हे अंदाजे १४ दशलक्ष वर्ग किलोमीटर असून अंटार्क्टिका खंडाचा जवळ जवळ ९० टक्के भाग या एकाच हिमलादीने व्यापला आहे. याशिवाय ग्रीनलॅण्डमधील हिमलादीही अशीच मोठी असून, ८० टक्के ग्रीनलॅण्ड हा तिने व्यापला आहे. इतक्या मोठ्या आकारामुळे या हिमनद्यांना ’खंडीय हिमनद्या’ (Continental Glaciers) असेही संबोधले जाते.

 
 

२. पर्वतीय हिमनद्या (Mountain Glaciers) - या हिमनद्यांचा उगम पर्वतांत अत्यंत उंचावर होतो. तेथून त्या वाहत वाहत खाली उतरतात व एका ठराविक उंचीवर तापमान वाढल्यामुळे त्यातील बर्फाचे पाण्यात रूपांतर होऊन त्या पुढचा प्रवास नदी म्हणून करतात. हिमालय, आल्प्स्, अँडीज इत्यादी जगातील सर्वच उंच पर्वतांमध्ये या हिमनद्या सापडतात. आपल्या सर्वांच्या परिचयाची गंगा नदी ही गंगोत्री येथे उगम पावताना हिमनदीच असते. तेथून खाली येताना हळूहळू तिच्यातील बर्फाचे पाण्यात रूपांतर होऊन तिला नदीचे रूप येते. या हिमनद्यांपासून तयार झालेल्या सर्वच्या सर्व नद्या बारामाही (Perennial) असतात. आता आपण या हिमनद्यांमुळे कोणत्या प्रकारचे भूस्तर निर्माण होतात याची माहिती घेऊ. हिमनदीमुळेही नदीसारखीच जमिनीची धूप होते पण, यामुळे तयार झालेले भूस्तर हे नदीमुळे तयार झालेल्या भूस्तरांपेक्षा वेगळे असतात. याचे कारण म्हणजे बर्फाचा जोर पाण्याच्या तुलनेत बराच जास्त असतो. यामुळे एक तर खडक त्यांच्या जागेवरून उचकटले जातात व प्रवाहाबरोबर वाहत जातात. याला ‘प्लकिंग’ (Plucking) म्हणतात. तसेच काही खडक उचकटले न जाता जागेवरच गुळगुळीत होतात. याला ‘अब्रेशन’ (Abrasion) म्हणतात. या कार्यामुळे हिमानी रेखांकन (Glacial Striations), व्हेलच्या पाठीच्या आकाराचे खडक (Whaleback landforms), यू आकाराच्या दर्‍या (U shaped valley), लटकणार्‍या दर्‍या (Hanging valley) इत्यादी रचना निर्माण होतात.

 
 

   नद्या व हिमनद्यांबद्दल जाणून घेतल्यावर पुढील लेखात आपण समुद्र, महासागर यांच्याबद्दल माहिती घेऊ.

   संदर्भ – (Textbook of Engineering and General Geology, Parbin Singh, KatsonPublishin House)

 
 

[email protected]

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@