रायपूर : राजकीय पक्ष म्हटले की, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी ओघाने आलीच. परंतु, हे करत असताना एखादा राजकीय पक्ष किंवा नेता जर थेट देशविघातक प्रवृत्तींचे समर्थन करू लागला तर ती मात्र चिंतेची बाब ठरते. याचे कारण म्हणजे एका काँग्रेस नेत्याने नुकतेच नक्षलवाद्यांची भलामण करत, नक्षलवादी हे तर क्रांतीसाठी निघाले आहेत, अशा आशयाचे दिव्यज्ञान पाजळले आहे. छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुका होत असून याच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी रणधुमाळी सध्या पेटली आहे. परंतु, या आरोप-प्रत्यारोपांचा भाग म्हणून काँग्रेससारखा एक राष्ट्रीय पक्षच जर नक्षलवाद्यांची बाजू घेऊन बोलू लागला, तर त्याचे करायचे काय? असाच प्रश्न समाजमाध्यामांवरून नागरिक उपस्थित करत आहेत.
हे नेते म्हणजे काँग्रेस नेते व ज्येष्ठ अभिनेते तथा राज्यसभा खासदार राज बब्बर होत. छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी रायपुर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बब्बर यांनी नक्षलवाद्यांची बाजू घेतल्याने सध्या त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान तसेच एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. नक्षल्यांच्या या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रीय स्तरावरून निषेध नोंदवण्यात आला होता. मात्र, राज बब्बर आपल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, “बंदुकीच्या गोळ्यांनी निर्णय होत नाहीत. जे लोक क्रांतीसाठी निघाले आहेत, त्यांना तुम्ही रोखू शकत नाही.” हे माझे वैयक्तिक मत असून मी माझ्या पक्षालाही ते सांगितले असल्याचे बब्बर यांनी सांगितले.
“जेव्हा लोकांना त्यांचे हक्क मिळत नाहीत, ते हक्क हिरावून घेतले जातात, तेव्हा मग लोक ते हक्क मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देतात.” अशीही पुस्ती राज बब्बर यांनी नक्षलवाद्यांबाबत बोलताना जोडली. तसेच, नक्षलवादी चळवळ ही हक्कांसाठी सुरू झाली असल्याचे सांगत या हक्कांबाबत आपल्याला या लोकांशी चर्चा करावी लागेल, असे ते म्हणाले. पुढे आपली बाजू सावरून घेताना ते म्हणाले की, ना त्यांच्या बंदुकीच्या गोळ्यांनी मार्ग निघेल ना आपल्या बंदुकीच्या गोळ्यांनी. मार्ग हा केवळ चर्चा केल्याने निघेल, असे बब्बर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ज्यावेळी नक्षलवाद्यांनी पत्रकारांवर हल्ला केला त्यानंतर काँग्रेस पक्षाने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला होता. त्यानंतर खा. राज बब्बर यांच्यासारख्या एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने नक्षलवाद्यांना थेट क्रांतीकाऱ्यांची उपमा दिल्याने देशभरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. राज बब्बर हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये असून अनेकवेळा त्यांनी संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. सध्या ते उत्तराखंड राज्यातून काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभेचे सदस्य आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर, छत्तीसगढ राज्याच्या राजधानीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज बब्बर यांनी उघडपणे नक्षलवाद्यांबाबत असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने काँग्रेस पक्ष मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. दरम्यान, बब्बर यांच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रियेसाठी म्हणून काँग्रेस प्रवक्त्यांशी संपर्क केला असता, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिला.
काँग्रेसचा नेहमीच नक्षल्यांना छुपा पाठींबा
“काँग्रेसने नेहमीच नक्षलवाद्यांना छुपा पाठींबा दिला आहे. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नक्षलवादाचे उघड समर्थन करत आहे. काँग्रेस प्रत्येक विषयाकडे एक ‘व्होट बँक’ म्हणूनच पाहते. काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आपल्या सुरक्षादलांतील जवान मारले गेले. ही घटना ताजी असतानाच असे विधान करणे म्हणजे, या हुतात्म्यांच्या निधनाने झालेल्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.”
- अतुल भातखळकर
आमदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस
कितीही गुन्हेगार असला तरी जिंकणारा उमेदवार हवा!
एकीकडे राज बब्बर यांचे हे वक्तव्य गाजत असताना दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. कमलनाथ यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत केलेल्या वक्तव्याने तर हद्दच ओलांडल्याचे दिसत आहे. भाजप प्रवक्ते डॉ. संबित पात्रा तसेच, मध्य प्रदेश भाजप आदींनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये कमलनाथ काही मोजक्या व्यक्तींबरोबर चर्चा करताना दिसत आहेत. या चर्चेत ते म्हणतात की, “कोणी सांगतात, अमुक उमेदवारावर ४ गुन्हे दाखल आहेत. मी तर म्हणतो की ५ गुन्हे असू दे. मला केवळ जिंकणारा उमेदवार हवा आहे. हे मी सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो.” कमलनाथ यांच्या या धक्कादायक वक्तव्याचा भाजपतर्फे खरपूस समाचार घेण्यात येत आहे. राजकारणात गुन्हेगारांना पाठबळ देण्याची ही काँग्रेसची मूळ विचारधाराच असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/