
मुंबई : ‘माझ्यावर टीकेची करून कामना, विखे-पाटील वाचतात सामना... संघर्षयात्रेला लाभेना गर्दी, म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी.. जनताजनार्दन आमच्याच बाजूला आणि तुमची खुर्ची असेल त्याच बाजूला... २०१९ चा महासंग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचा बाण आणि कमळ...’ या कवितेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत त्यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. “विरोधकांनी आम्हाला प्रश्न विचारण्यापूर्वी आत्मचिंतन करावे,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या आधी बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भारतीय जनता पक्षात गुंडांना राजाश्रय मिळत असून हा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ असल्याचे म्हटले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत,”आम्हाला विचारण्यापूर्वी विरोधकांनी आत्मचिंतन करून पाहावे,” असे म्हटले. दरम्यान, गेल्या साडेतीन-चार वर्षांच्या कालावधीत आमच्या सरकारने अनेक कामे केली आहेत. तेच आघाडी सरकारला गेल्या १५ वर्षांत जमले नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोस्टल रोडवरून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. कोस्टल रोड ही संकल्पना पृथ्वीराज चव्हाण यांची होती. मात्र त्यांच्या कालावधीत कोस्टल रोडसाठी एक फुटकी परवानगीही मिळाली नाही. आपण स्वतः दिल्लीला जाऊन कोस्टल रोडसाठी परवानग्या मिळवल्या असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
२०१९ पर्यंत नवी मुंबई विमानतळाचा एक रनवे
नवी मुंबई विमानतळाचे कामही हाती घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या विमानतळासाठी आवश्यक असलेल्या आठ परवानग्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्या आहेत. डिसेंबर २०१९ पर्यंत नवी मुंबई विमानतळाचा एक रनवे तयार करण्यात येणार आहे. तसेच विमानतळाची टर्मिनल बिल्डिंगही उभारली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘सनातन’वर कारवाई आमच्या काळात
यापूर्वी ’सनातन’बाबत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकार ’सनातन’बाबत मवाळ भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणातही ’सनातन’ या संस्थेचे नाव जोडले गेले असल्याचे म्हटले होते. तसेच पुरावे असूनही ’सनातन’वर का कारवाई करण्यात येत नाही?, असा सवाल त्यांनी केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ’सनातन’ या संस्थेवर सर्वाधिक कारवाई आताच्या सरकारच्या काळात झाल्याचे नमूद केले. तसेच ’सनातन’वरील सर्वाधिक पुरावे हे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने गोळा केल्याचे नमूद केले. तसेच याचे श्रेय कर्नाटक दहशतवादविरोधी पथकाला देऊ नका, असे म्हटले.
मुस्लीम आरक्षणावर लवकरच निर्णय घेणार
मुस्लीम समाजाचे रद्द करण्यात आलेले आरक्षण पुन्हा देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली. तसेच ”या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून राज्य मागासवर्ग आयोगाला याचाही अहवाल तयार करण्यास सांगू,” असे ते यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणानंतर शुक्रवारी विरोधी पक्षांनी मुस्लीम आरक्षणाची मागणी सभागृहात लावून धरली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत राज्य मागासवर्ग आयोगाला याचाही अहवाल तयार करण्यास सांगू, असे म्हटले. भीमा-कोरेगावप्रकरणी एकूण ६५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ६३ गुन्हे हे मागे घेता येणार नाहीत. तसेच उर्वरित गुन्हे मागे घेतले जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/