वस्त्रप्रावरणांच्या नभांगणातील चमकता ‘उज्ज्वल तारा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018   
Total Views |



 
 
 
फॅशन डिझायनिंग केलेल्या प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं. ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये तिने डिझाईन केलेले ड्रेस घालून मॉडेलने रॅम्प वॉक करावा. तिने सुद्धा फॅशन डिझाईनमध्ये पदवी मिळविली. ती उत्तम डिझायनर आहे. मात्र, तिला या चमचमत्या दुनियेपेक्षा जे हात या कापडाला घडवतात, त्या विणकरांच्या आयुष्याला डिझाईन करण्यात अधिक रस होता. जगाच्या पटलावर कुठल्यातरी कोनाड्यात राहून आपली कला जोपासणाऱ्या त्या कलाकाराची कला लोकांसमोर आणणं आणि त्याच्या कलेला मूल्य मिळवून देणं, यालाच तिने वाहून घेतलं. यातूनच निर्माण झाली ‘आर्ट एक्स्पो’सारखी संस्था आणि ‘उज्ज्वल तारा’ सारखा हातमागामधला मराठमोळा ब्रॅण्ड. हातमाग संस्कृतीला विणकरांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविणारी ही उद्योजिका आहे, उज्ज्वल सामंत.
 

नरेश आणि ज्योती या परुळेकर दाम्पत्याच्या पोटी उज्ज्वलचा जन्म झाला. नरेश परुळेकर वालचंद हिराचंद कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. ‘बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स’ या उद्योग जगतात नावाजलेल्या संस्थेचे संचालक म्हणून ते निवृत्त झाले. उज्ज्वलचं बालपण ठाण्यात गेलं. शालेय शिक्षण सरस्वती सेकंडरी हायस्कूल येथे झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज येथे झालं. तिचा ओढा फॅशन डिझायनिंगकडे होता, मात्र त्याकाळी असलेल्या अलिखित शैक्षणिक प्रथेनुसार आणि कुटुंबाच्या म्हणण्यानुसार तिने वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली. पदवी मिळाली आणि काहीच दिवसांत उज्ज्वलचा सत्यजीत सामंत या रुबाबदार तरुणासोबत विवाह झाला. सासर प्रेमळ असल्याने उज्ज्वलला त्यांनी फॅशन डिझायनिंग शिकण्यास परवानगी दिली. उज्ज्वलने फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी मिळवली. सत्यजीत सामंत यांनी नुकताच प्लास्टिक उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. पतीच्या व्यवसायात उज्ज्वलने मदत करण्यास सुरुवात केली. १९९५ ते २००८ पर्यंत हा व्यवसाय सुरूच होता. मात्र, सरकारने प्लास्टिक व्यवसायावर अनेक बंधनं आणली. सोबत टॅक्समुळे या क्षेत्राचं कंबरडं मोडलं होतं. सामंत दाम्पत्याने काळाचा विचार करून हा व्यवसाय विकला. सत्यजीत सामंत पुढे बांधकाम क्षेत्रात स्थिर झाले. उज्ज्वल आणि सत्यजित यांचा मुलगा आदित्यनारायण सामंत याने नुकतीच एअरोस्पेस इंजिनिअरिंगची अमेरिकेतून पदवी मिळविली आहे. एवढा उच्चशिक्षित असूनसुद्धा आदित्य आई-बाबांप्रमाणेच विनम्र स्वभावाचा आहे. एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये आपल्या भारताचं नाव उज्ज्वल करण्याचं त्याचं ध्येय आहे.

 

पतीच्या व्यवसायात मदत करत असताना आपणच बॉस होतो. मात्र, इतरांच्या उद्योगातून काहीतरी शिकायला मिळावं, या उद्देशाने उज्ज्वल सामंत यांनी २००८ ते २०११ या तीन वर्षांत नोकरी केली. अनुभव मिळवला. फॅशन डिझायनिंग शिकत असताना उज्ज्वल विविध वस्त्रप्रावरणे तयार करायच्या. घरातल्या आत्या, काकू, मावशी, मामी याच त्यांच्या मॉडेल आणि ग्राहक. या महिला वर्गाने परिधान केलेले ड्रेसेस हा त्यांच्या वर्तुळात कौतुकाचा विषय असायचा. ही वस्त्रप्रावरणे तयार करताना उज्ज्वल सामंत यांचा थेट संपर्क विणकरांसोबत यायचा. या विणकरांचे कष्ट, त्यांची कला, त्याच्या तुलनेत त्यांना मिळणारा तुटपुंजा मोबदला. मात्र, त्याबदल्यात इतरजण कसे गब्बर होतात आणि तो बिच्चारा विणकर आहे, तिथेच फाटक्या अवस्थेत आहे हे उज्ज्वल पाहत होत्या. त्यांनी मनाशी निश्चय केला की या विणकरांसाठी काहीतरी करायचं.

 

याच उद्देशाने नोकरी सोडल्यानंतर त्यांनी विणकरांना जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी कसे स्वत:ला विकसित करावे, याचे धडे देण्यास सुरुवात केली. मात्र, या वर्गाची गरज ही नसून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे, हे त्यांना जाणवले. या जाणिवेतून विणकर आणि ग्राहक यांना एकत्र आणण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला आणि त्यातून जन्मास आली ‘आर्ट एक्स्पो’ नावाची संस्था. ही संस्था विणकर आणि ग्राहक यांच्यामधील सेतू सांधण्याचे कार्य करते. ‘आर्ट एक्स्पो’ या विणकरांच्या हातमागावरील कौशल्याचे, कलाकुसरीचे प्रदर्शन भरविते. पहिलंच प्रदर्शन दादर मध्ये २०१२ साली भरवलं होतं. या क्षेत्रात नवोदित असल्याने तितकासा प्रतिसाद या पहिल्या प्रदर्शनास मिळाला नाही. या प्रदर्शनातून खूप काही शिकण्यास उज्ज्वलना मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. २०१२ ते २०१८ या सहा वर्षांत त्यांनी ३० ते ४० हातमाग प्रदर्शनाचे आयोजन केले. मुंबईमधील दादर, फोर्ट, जुहू येथे ही प्रदर्शने झालेली आहेत. गेल्या सहा वर्षांत विणकर आणि ग्राहक यांच्यामध्ये ‘आर्ट एक्स्पो’च्या प्रदर्शनामुळे अंदाजे २५ कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे. गुजराती, मारवाडी, पंजाबी या बांधवांचं प्राबल्य असलेल्या या क्षेत्रात उज्ज्वल सामंत यांनी ‘आर्ट एक्पो’च्या माध्यमातून आपला मराठमोळा असा अमीट ठसा उमटविलेला आहे.

 

‘आर्ट एक्स्पो’ मुळे देशभरातील विणकरांना प्रदर्शनाद्वारे पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. तुम्ही मुंबईत आमच्या कलेसाठी कायमस्वरूपी एक स्थान निर्माण करा, अशी विनंती या विणकरांनी उज्ज्वल सामंत यांना केली. त्यातूनच मग साकारला ‘उज्ज्वल तारा’ हा हातमाग वस्त्रप्रावरणांचा ब्रॅण्ड. दादर येथील रानडे रोडनजीक ‘उज्ज्वल तारा’ चा वस्त्रप्रावरणाचा स्टुडिओ आहे. भारतातील प्रसिद्ध विणकर आणि डिझायनर्स यांनी तयार केलेले हातमागावरील कपडे येथे उपलब्ध आहेत. किंबहुना, त्यांच्यासाठी ‘उज्ज्वल तारा’ हा मंच आहे. हातमाग म्हणजे कंटाळवाणे कपडे हा समज येथे आल्यानंतर गळून पडतो. मनोहारी रंगसंगती आणि विलोभनीय कलाकुसर महिलावर्गाचं लक्ष वेधून घेतात. आजच्या तरुणींची आवड लक्षात घेऊन उज्ज्वल सामंत यांनी त्याप्रमाणे ‘कलेक्शन’ सादर केले आहे. येत्या काही वर्षांतच ‘उज्ज्वल तारा’ हा मराठमोळा ब्रॅण्ड हॅण्डलूममधील एक आगळावेगळा ब्रॅण्ड म्हणून निश्चितच स्थान मिळवेलमहाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठी उद्योजिका घडाव्यात, हे उज्ज्वल सामंत यांचं स्वप्न. ‘उज्ज्वल तारा’च्या महाराष्ट्रभर शाखा असाव्यात, असा त्यांचा मानस आहे. जी महिला ‘उज्ज्वल तारा’ची शाखा सुरू करण्यास उत्सुक आहे तिला या क्षेत्रातील पूर्ण ज्ञान आणि हवी ती मदत देण्याची तयारी उज्ज्वल सामंत यांनी दर्शवली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी एक असणाऱ्या वस्त्रांना, त्यामध्ये हातमागासारख्या वेगळ्या वस्त्रप्रकाराला आणि त्याचा निर्माता अर्थात विणकराला एका उंचीवर नेण्याचा उज्ज्वल सामंत यांचा ध्यास आहे. अथक परिश्रम आणि नावीन्य यामुळे ‘उज्ज्वल तारा’ हा ब्रॅण्ड वस्त्रप्रावरणांच्या तारांगणात नक्कीच चमकेल, अशी आशा आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@