वाद चव्हाट्यावर कशाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



दोन दशकं खेळाचे मैदान गाजवून, पुरुष खेळाडूंना टक्कर वगैरे देत, आपलं स्थान कायम ठेवणाऱ्या मितालीची कारकीर्द संपविण्याचा रचला जाणारा डाव हे माध्यमांनी रंगवलेलं स्वरूप, यामुळे महिला संघातील समीकरणं बदलतायत.


अपराजित संघ, दर्जेदार खेळाडू, उत्तम संघबांधणी अशी सगळी विशेषणे महिला ‘टी २०’च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला लागू पडत होती. पण गेल्या काही दिवसांपासून मैदानावरील संघाच्या कामगिरीपेक्षा संघाची चर्चा मैदानाबाहेरच जास्त होताना दिसते आणि त्याचा थेट परिणाम होतोय तो खेळाडूंच्या खेळावर. खरं तर, सीनियर खेळाडूंना एका सामन्यात ‘विश्रांती’ देण्याचे प्रकार काही नवीन नाहीत, त्यात पुरुष संघात असे प्रकार तर सर्रास घडतात आणि अर्थात वाद हा आलाच. या वादाचे मुख्य कारण म्हणजे खेळाचे झालेले ‘मीडियाफिकेशन.’ एखादा वाद मीडियाच्या कानावर आला की, तो चघळत बसण्याखेरीज दुसरं काही त्या विषयाचं होऊ शकत नाही, तरीही संघातले आपापसातील वाद कधी मुद्दाम, तरी कधी चुकून चव्हाट्यावर येतातच. दोन दशकं खेळाचे मैदान गाजवून, पुरुष खेळाडूंना टक्कर वगैरे देत, आपलं स्थान कायम ठेवणाऱ्या मितालीची कारकीर्द संपविण्याचा रचला जाणारा डाव हे माध्यमांनी रंगवलेलं स्वरूप, यामुळे महिला संघातील समीकरणं बदलतायत, हे नक्की. पण, एखादा क्रिकेटचा सामना खेळताना मैदानावर केवळ अकराच खेळाडू असू शकतात, हा नियम तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. मग त्यात मितालीचं नसणं हे पाहायला गेलं तर वावगं ठरणार नव्हतं. पण, हा क्रिकेटप्रेमींसाठी धक्का होता एवढं मात्र खरं. पण त्याची चर्चा झाली, कारण भारत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अतिशय ‘वाईट’ प्रकारे हरला. ही अशी रिस्क घेण्याचं तसं काही कारण हरमनप्रीतकडे नव्हतं, कारण सलग दोन सामन्यांत अर्धशतक ठोकत मितालीने सामने आपल्या खिशात घातले होते. तरीदेखील ही रिस्क हरमनप्रीतने घेतली, मग त्यात मितालीच्या मॅनेजरने हरमनप्रीतवर आरोप केले आणि या मीडियानिर्मित वादाला सुरुवात झाली. त्यात मितालीने केलेले आरोप खरे जरी असले तरी असे प्रकार क्रिकेटविश्वात नवीन नाहीत. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातलं गुरुशिष्याचं आणि सलोख्याचं वगैरे नातं यातून क्रिकेट क्षेत्र कधीच बाहेर पडलं, म्हणजे ग्रेग चॅपेल भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक असताना गांगुलीचंही भविष्य असंच काहीसं धोक्यात होतं. मितालीने महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर केलेले आरोप आणि त्याची चर्चा यामुळे आता या तापलेल्या प्रकरणावर पोळी भाजणारेही बरेच असतील. पण, शेवटी घरातले वाद घरातच राहिले की ते सुटतात आणि बाहेर गेली की त्यांची चर्चा होते... त्यामुळे विश्वचषकाच्या एवढ्या जवळ येऊन सगळी मेहनत मातीमोल होऊ नये, एवढीच काय ती समस्त क्रिकेटपटूंची इच्छा...!

 

४३ वर्षांचं शल्य...

 

पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे बिगूल भारतात वाजलं आणि भारताच्या ४३ वर्षांपासूनच्या शल्याची पुन्हा आठवण झाली. आठवेळा ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाने १९७५ मध्ये एकमेव विश्वविजेतेपद पटकावले होते. त्यावेळी अजित पाल सिंग आणि त्याच्या संघाने इतिहास घडवला होता. आता यजमान असल्यामुळे अपेक्षांचं ओझंही भारतीय संघावर असणार हेही खरं... युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाला या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकविण्याची सुवर्णसंधी असली तरी या संधीचं सोनं कितपत होईल हे ‘क’ गटातील भारताच्या खेळीवर असेल. भारतासमोर आपल्या गटातून बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. नवख्या खेळाडूंचा भरणा जास्त असला तरी, १९७५ पासून भारतीय संघाला पहिल्या पाच संघांमध्येही येता आले नाही, त्यामुळे अर्थातचं हे शल्य कायम असेल. १९८२ आणि २०१० मध्ये भारताने या विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळवला होता, मात्र त्यावेळीही भारताच्या पदरी निराशाच आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, आतापर्यंत १४ वेळा झालेली ही हॉकी विश्वचषक स्पर्धा पाकिस्तानने पाचवेळा जिंकली. नाही म्हणायला गेलं तर, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारत हा पाकिस्तानपेक्षा कधीही सरस दिसतो. भारताच्या खात्यात ८ ऑलिम्पिक सुवर्णपदकांचा समावेश आहे. पण, गेल्या चार दशकांपासून युरोपियन संघांनी विश्व हॉकीवर वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार सध्या तरी ऑस्ट्रेलिया या संघाला मानले जाते. गतविजेता ऑस्ट्रेलियाला अर्जेंटिना, नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम व इंग्लंड यांच्याकडूनही काँटे की टक्कर नक्कीच मिळू शकते, तर दुसरीकडे भारतीय संघ आपली लाज राखण्यासाठी आणि ४३ वर्षांचे हे व्रत तोडण्यासाठी जोशात खेळेल, अशी अपेक्षा आहे, कारण जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर भारतीय संघ सध्या विराजमान आहे, त्यामुळे भारताच्या या संघांकडून अपेक्षा जास्त असल्या तरी, आशियाई खेळात भारताला सुवर्णपदक राखता आले नाही, त्यामुळे काहीशा बॅकफूटवर असलेल्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यापासूनच आपले वर्चस्व दाखवावे लागणार आहे. बाकी ४३ वर्षांचं शल्य यावर्षी शमेल, अशी आशा आणि भारतीय पुरुष संघाला शुभेच्छा...!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@