शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत तापले राजकारण

    28-Nov-2018
Total Views |

माघारीआधीच मतदार भेटीवर भर, उद्याच्या माघारीनंतर लढतीचे चित्र होणार स्पष्ट

 
शेंदुर्णी, ता-जामनेर :
शेंदुर्णी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक ९ डिसेंबर रोजी होऊ घातलेली असल्याने प्रचारासाठी कमी कालावधी मिळत असल्याने २९ नोव्हेंबरच्या माघारीपूर्वीच उमेदवार मतदारांच्या भेटीवर भर देत आहे. येथील नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीचे वातावरण तापू लागले आहे. शेंदुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतरित झाल्याने पहिली सत्ता स्थापनेचा बहुमान मिळविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी आपआपली राजकीय प्रतिष्ठापणाला लावल्याने सत्ता स्थापनेचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. भाजप विकास मुद्यावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या मुद्यावर निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. नाराज अपक्षांचे मत वळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.
 
 
मागील ग्रामपंचायतीमध्ये ६ प्रभाग मिळून १७ उमेदवार होते. प्रत्येक प्रभागात प्रत्येकी ३ उमेदवारांची संख्या असल्याने एक प्रभाग हा जातीधर्माच्या वसाहतीनुसार सोईस्कर असल्याने प्रत्येक जाती धर्माचा उमेदवार निवडून येणे सोपे होते. नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीमुळे नवीन प्रभाग रचना तयार झाल्याने १७ प्रभागांमधून प्रत्येकी १ नगरसेवकप्रमाणे १७ नगरसेवक निवडून द्यावयाचे असल्याने नवीन प्रभाग रचनेनुसार स्वतंत्र झालेल्या प्रभागामध्ये सर्वच जातीधर्माचे मतदार आल्याने जातीधर्मांचे समीकरण मांडताना स्थानिक प्रभागातील उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे.
 
 
 
मतदानासाठी जनजागृती
९ डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी पथनाट्य आणि इतर कार्यक्रमांतून जनजागृती करण्यात येत आहे.
 
 
कोण बनणार लोकनियुक्त नगराध्यक्ष?
शेंदुर्णी नगराध्यक्षपदी महिला ओबीसी पद राखीव असल्याने भाजपतर्फे पूर्वाश्रमीच्या सरपंच विजया खालसे यांना पुनःश्च नगराध्यक्षपदासाठी संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीतर्फे क्षितिजा प्रवीण गरुड यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी नागरिकांमध्ये कोण बनणार नगराध्यक्ष? या विषयावर गल्लीबोळात चर्चा रंगत असून आपापसात दावे प्रतिदावे केले जात आहे. तसेच प्रभागानुसार नगरसेवकपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडू शकते. तसेच नगरसेवक कसा असावा याबाबत चर्चा करताना मतदार दिसत आहे. तरी उद्याच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर प्रचाराला व जाहीर सभांना प्रत्यक्ष सुरुवात होऊन यामुळे परिसरातील वातावरण तापू लागले आहे.