डॉ. प्रकाश व मंदाताई आमटे दाम्पत्याने उलगडला सेवाप्रवास
जळगाव :
जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलालजी जैन यांच्या स्मृतिनिमित्त ‘भाऊंचा कट्टा’ हा अनोखा उपक्रम जळगावात सुरू झाला आहे. पद्मश्री व रेमन मॅगसेस पुरस्कारप्राप्त डॉ. प्रकाश आमटे यांनाही ‘भाऊ’ या नावाने संबोधलं जातं. योगायोगाने या कट्ट्यावर संवादाचे प्रथमपुष्प डॉ. आमटे दाम्पत्याशी गप्पांमधून गुंफले गेले.
जैन हिल्सवरील ‘परिश्रम’ वास्तूतील सभागृहात रविवार, 25 रोजी सायंकाळी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण डॉ. आमटे दाम्पत्य, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले. त्याचा आरंभ म्हणून ते निमंत्रितांसमोर बोलत होते.
जैन इरिगेशनअंतर्गत भेटीसाठी आणि गांधीतीर्थ पाहणीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर येतात. त्यातील काही मान्यवरांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त का होईना, परिचय व्हावा, समाजापर्यंत जावा आणि त्यांच्या कार्यालाही चालना मिळावी, या हेतूने थेट चर्चा करण्याची संधी जळगावमधील विशेष निमंत्रितांना मिळावी म्हणून ‘भाऊंचा कट्टा’ सुरू झाला आहे.
भवरलाल जैन हे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व. प्रचंड वाचनातून त्यांनी स्वतःची चिंतनशील आणि विचारवंत प्रतिमा घडविली होती. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाची स्मृती जपण्यासाठीच विविध क्षेत्रात दीपस्तंभासमान मान्यवरांशी संवाद तथा गप्पा करण्याची संधी ‘भाऊंचा कट्टा’ मधून मिळणार आहे.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या कल्पनेतून ‘भाऊंचा कट्टा’ साकारलेला आहे. प्रास्ताविक पत्रकार दिलीप तिवारी यांनी केले. हा उपक्रम तसेच आमटे त्यांच्या दुर्गम क्षेत्रातील अतिगरीब उपेक्षितांसाठीच्या कार्याची माहिती त्यांनी दिली.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी उभयतांचा शाल, महात्मा गांधीजींचा छोटा पुतळा, सुतीहार आणि स्व.भवरलाल जैन यांचा विचारसंग्रह देऊन सन्मान केला. आमटे दाम्पत्याच्या कार्यपरिचयाची चित्रफीत दाखविण्यात आली.
महाराष्ट्र भूषण स्व. बाबा आमटे यांचे पुत्र विदर्भातील गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील भामरागड, हेमलकसा या आदिवासी बहुल आणि दुर्गम भागात गेल्या 1973 पासून लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून रुग्ण, शैक्षणिक आणि सामाजिक सेवा देत आहेत. या प्रकल्पांतर्गत तेथील माडिया गोंड आदिवासींवर रोगराई, आजारातून बरे करण्यासाठी आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली.
या बरोबरच आदिवासींना शिक्षण व स्वयंरोजगार देऊन अंधश्रद्धेपासून दूर करण्याचे प्रयत्न केले. जंगलापलीकडचे जग आदिवासींना माहीत नव्हते. लोकबिरादरीच्या अथक परिश्रमातून आमटे दाम्पत्याने तेथे सुसज्ज रुग्णालय, शाळा सुरू केली आहे. आदिवासींची मुले शिकून डॉक्टर, वकील होत आहेत. वैद्यकीय उपचारांअभावी होणार्या या मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प आहे. आदिवासींच्या या ‘अंधाराकडून उजेडाकडे’ झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय आमटे दाम्पत्याचे आहे.
सुसंवादानंतर डॉ. आमटे यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थितांनी अधिक माहिती जाणून घेतली. विनोद रापतवार यांनी आभार मानले.
तत्पूर्वी डॉ. आमटे दाम्पत्याने दिवसभरात जैन इरिगेशनच्या औद्योगिक प्रकल्प आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यास भेट देऊन माहिती घेतली.
डॉ. प्रकाश आमटे सुसंवादात म्हणाले की, 1970 ला बाबांनी आम्हाला सहलीच्या माध्यमातून भामरागड या दुर्गम भागात नेलं. तेथील जनजीवन, आदिवासींचे दुःख बघितल्यावर आपण स्वयंस्फूर्तीने येथे सेवाकार्य करू, हा संकल्प बाबांना बोलून दाखविला. बाबांनी काढलेली सहल हीच सेवाकार्याची प्रेरणा ठरली.
त्यामुळे आमच्या आयुष्याला टर्निंग-पॉइंट मिळाला. माझा मुलगा डॉ. दिगंत या कार्यात सहभागी होत आहे, हे त्याने बाबांना सांगितले.
त्यावेळी आपल्या नातवाच्या विचारांनी बाबा भावुक झाले आणि मला सुखद धक्काच बसला, असे सांगून डॉ. प्रकाश आमटे यांनी आपला व परिवाराचा सेवाप्रवास उलगडून दाखवला.