मातृभूमीचे ऋण फेडता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2018   
Total Views |



अमेरिकेत मोठे नाव कमावूनही बाळासाहेबांची मातृभूमीशी नाळ जोडलेली होतीच. अखेरीस बाळासाहेब स्वदेशी परतले आणि समाजसेवेसाठी स्वत:चे जीवन त्यांनी समर्पित केले.

 

२००४ साली आलेला आशुतोष गोवारीकर यांचा ‘स्वदेश’ चित्रपट अनेक जणांनी पाहिला असेलच. मोहन भार्गव हा चित्रपटाचा नायक अमेरिकेस्थित ‘नासा’मध्ये एका महत्त्वाच्या पदावर कार्यरत होता. त्याला भारतात कधी परत यावंसं वाटायचं नाही. मात्र, काही कारणास्तव तो भारतात दाखल होतो. जातिभेद, अस्पृश्यता, गरिबी, शिक्षणाबद्दलची अनास्था, वीजटंचाईसारख्या शेकडो समस्यांनी ग्रासलेल्या आपल्या गावकर्‍यांना एकटे सोडून ऐशआरामाचं जीवन जगायला निघून जाणं त्याच्या जीवावर येतं. शेवटी निर्णय घेऊन मोहन गावातच राहतो आणि गावच्या विकासासाठी, विजेसाठी दिवसरात्र झगडतो. या चित्रपटाच्या कथेसारखीच एक कथा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बाळासाहेब दराडे नावाच्या एका तरुणाची. बाळासाहेब दराडे हे बुलढाणा जिल्ह्यातील पांग्राडोळे या गावातील रहिवासी. घरची परिस्थिती जेमतेम, मात्र पोरगा शाळेत हुशार! गावातील शाळेत बाळासाहेबांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. पुढे त्यांना औरंगाबादला अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक शाखेला प्रवेश मिळाला. इथेही बाळासाहेबांनी आपली छाप सोडत प्रथम क्रमांकात पदवी मिळवली. बाळासाहेब एवढ्यावरच थांबणारे नव्हते. पुढील शिक्षणासाठी त्यांनी तयारी सुरू केली आणि शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठात प्रवेश मिळवला. अभ्यासू बाळासाहेबांनी या विद्यापीठातून एम. एस. आणि डॉक्टरेटची पदवी मिळवली. या दरम्यान ते नॅनो तंत्रज्ञानावर संशोधन करत होते. याच संशोधनाचे शोधनिबंध अमेरिका आणि जगप्रसिद्ध वैज्ञानिक नियतकांलिकामध्ये प्रसिद्ध झाले.

 

संशोधन व बुद्धिमत्तेच्या जोरावर बाळासाहेबांना ‘नासा’मध्ये काम करायची संधी मिळाली. यावेळी त्यांनी नॅनो इलेक्ट्रॉनिक, सेमी कंडक्टर लेसर्स, सोलार सेल, सेमी कंडक्टर, बायो मायक्रोबायॉलॉजी अशा विविध क्षेत्रांत संशोधन केलं. ‘मार्स रोवर’ मध्येदेखील त्यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं होतं. वायरलेस पॉईंट टू पाईंट ऑडियो-व्हिडिओ डाटा ट्रान्सफरिंग टर्मिनसचा प्रयोगदेखील त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्याचं हेच संशोधन सॉफ्टवेअर आणि नॅनो तंत्रज्ञानाला नवी दिशा देणारं ठरलं. मात्र, आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या ज्ञानाचा, आपण शोधलेल्या तंत्रज्ञानाचा आपल्या मातीला उपयोग होतं नसल्याची खंत त्यांना नेहमी असायची. बाळासाहेब अमेरिकेत राहून आपल्या मातृभूमीसाठी काम करत असत. आपल्या देशातील घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. आपल्या गावाकडील लोकांना मदत व्हावी यासाठी त्यांनी पांग्राडोळे परिसरातील वीस गावांत ‘शंकरा ग्राम परिवर्तन’ संस्थेची स्थापना केली होती. अमेरिकेतून सुट्टीवर आल्यावर व अमेरिकेत राहून ते या संस्थेच्या माध्यमातून आपल्या लोकांसाठी सामाजिक काम करत होते. मात्र, अमेरिकेत राहून आपण आपल्या देशासाठी, मातीसाठी आणि आपल्या लोकांसाठी योगदान देऊ शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. अशातच त्यांचा संपर्क भारतचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याही आला. त्यावेळी डॉ. कलाम त्यांना म्हणाले, “India needs youth like you” आणि येथूनच बाळासाहेबांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

 

बाळासाहेबांच्या भारतात परतण्याच्या निर्णयावर आपल्या मातृभूमीसाठीचे प्रेम होतेच, पण डॉ. कलाम, अण्णा हजारे, श्री श्री रविशंकर यांचा जास्त प्रभाव होता. कारण, विद्यार्थीदशेतच ते ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या युवा विभागाचे ते प्रमुख होते. यावेळी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. विशेष म्हणजे, ते ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे आध्यात्मिक शिक्षकदेखील आहेत. तसेच बाळासाहेब अण्णा हजारांचे चाहते आहेत. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनावेळी त्यांनी अमेरिकेत तरुणांना एकत्र करून अण्णांच्या आंदोलनाच्या समर्थनात रॅलीदेखील काढली होती. भारतात परतल्यानंतर आपण समाजसेवा करणार असल्याचे घरच्यांना सांगून त्यांनी थेट राळेगणसिद्धी गाठली. अमेरिकेसारख्या देशातील सुखदायी, प्रशस्त आयुष्य जगणारा, सुटबुटात वावरणारा, जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ आपल्या गावी परतल्यानंतर भारतीय पेहरावात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेऊ लागला, लोकांना मदत करू लागला. फक्त समाजसेवा करून समस्या सुटणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरायचे ठरवले. ‘ना जात, ना पात, ना पक्ष! ग्राम परिवर्तन एकच लक्ष,’ हा निवडणुकीचा त्यांचा नारा लोकप्रिय ठरला आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लोकांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान त्यांनी कोणालाही दारू पाजली नाही, कोणालाही पैसा दिला नाही. गलेलठ्ठ पगाराची सुटबुटातील नोकरी सोडून आपल्या लोकांसाठी आपल्या देशासाठी ते अपक्ष राजकारणात उतरले. हे कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात असे अनेक बाळासाहेब आपल्या देशात तयार होण्याची गरज आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@