दप्तराचे ओझे होणार हलके!

    26-Nov-2018
Total Views |



 
 
 

इयत्ता पहिली व दुसरीला गृहपाठ नाही!

 

नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे आता हलके होणार आहे. पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली होती. चिल्ड्रन स्कूल बॅग अॅक्ट २००६ नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे त्या विद्यार्थ्याच्या शरीराच्या वजनाच्या १० टक्क्यांहून जास्त असू नये. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची सूचना दिली आहे. यासाठी एक परिपत्रक काढण्यात आले आहे.

 

या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आता गृहपाठ दिला जाणार नाही. तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हे जास्तीत जास्त दीड किलो असणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत कोणती पुस्तके आणावीत आणि कोणती पुस्तके आणू नयेत, हे सर्व शाळांना ठरवावे लागणार आहे.

 

इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तराचे वजन हे दोन ते तीन किलोग्राम असेल. सहावी आणि सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तराचे वजन चार किलोग्राम असणार आहे. तर इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे साडेचार किलोग्राम एवढे निश्चित करण्यात आले आहे. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे पाच किलोग्रामपेक्षा जास्त नसावे. असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

 

इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना फक्त गणित आणि भाषा हा विषय शिकवावा. असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित या विषयांसोबत सामान्य विज्ञान अर्थात ईव्हीएस शिकविण्याची सूचना देण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/