पिढीजात गुलामगिरीचा शाप!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2018   
Total Views |



सध्या राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. विविध ठिकाणी राजकीय प्रचारसभा रंगत आहेत. अशात काँग्रेस नेत्यांनी मात्र स्वपक्षाच्या प्रचारसभांमध्ये एकामागोमाग एक धक्कादायक वक्तव्यं करून पक्षाची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीला मिळविण्याचा विडा उचलला आहे. निवडणुकांचे निकाल, पक्षाची कामगिरी हे सगळं बाजूला ठेऊनही या देशाचा एक नागरिक म्हणून ही वक्तव्यं चीड आणणारी आहेत. राज बब्बर, दिग्विजय सिंह, सी. पी. जोशी, कमलनाथ यांच्या एकेक वक्तव्यांवरून वादंग उठलेलं असतानाच आता विलास मुत्तेमवार हेदेखील या पंक्तीत जाऊन बसले आहेत. त्यांचं वक्तव्यं हे या सर्वांवर कडी करणारं आणि अत्यंत संतापजनक आहे. “राहुल गांधी यांच्या वडिलांचे नाव सर्वांना माहीत आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव कुणाला माहीत आहे काय? त्यांना कोणी ओळखतं काय?,” अशा आशयाचं वक्तव्य विलास मुत्तेमवार यांनी राजस्थानमध्ये पक्षाच्या एका बैठकीत बोलताना केलं. याचे व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत. आता हे मुत्तेमवार म्हणजे काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते. नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन-चार वेळा ते खासदार झाले, पुढे केंद्रात मंत्रीही झाले. पक्षातही संघटनात्मक स्तरावर अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत, असा हा वरिष्ठ राजकीय नेता जर थेट देशाच्या पंतप्रधानाच्या वडिलांबाबत इतकं खालच्या दर्जाचं विधान करत असेल, तर या पक्षाच्या सर्वसामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत काय संदेश जात असेल, आणि त्यांची विचारधारा कशी घडत असेल, याचा विचार न केलेलाच बरा. एकवेळ त्यातील हीन दर्जाची शेरेबाजी जरी बाजूला ठेवली तरीही त्यातून एकाच घराण्याची गुलामी इमानेइतबारे करण्याची मानसिकताही लपून राहत नाही. राहुल गांधींचे वडील राजीव आणि आज्जीबाई इंदिरा होत्या, म्हणून त्यांना सर्व ओळखतात आणि हा घराण्याचा वारसा हेच त्यांचं मोठेपण असल्याचं मुत्तेमवार यांच्यासारखे लोक आपल्या वक्तव्यांतून सूचित करतात. आज यांचा पक्ष इतका रसातळाला गेला असतानाही, या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजून गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. पक्ष अपयशी का ठरतो आहे, याचं उत्तर या मानसिकतेत दडलेलं आहे. पिढीजात गुलामगिरीचा हा एक शापच आहे, आणि त्याची फळं या पक्षाला भोगावीच लागणार आहेत.

 

शिशुपालांचे १०० अपराध...

 

विलास मुत्तेमवार आज काही बोलून गेले असले तरी चार दिवसांनी त्यांचीही चर्चा बंद होईल, कारण तोवर दुसरा कोणीतरी काँग्रेसनेता असंच आपलं ज्ञान कुठेतरी पाजळेल. बरं, हे सारेच एकेक दिग्गज, नावाजलेले आणि वरिष्ठ पदांवर असलेले नेते. राज बब्बर यांचंच उदाहरण घ्या. हे महाशय उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यांची मतं काय आहेत, तर नक्षलवादी हे क्रांतिकारक आहेत! ते लोकांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास निघाले आहेत आणि तुम्ही त्यांना रोखू शकत नाही! ज्या नक्षलवाद्याने छत्तीसगढसह भारतातील मोठ्या प्रदेशाचं कधीही न भरून निघणारं नुकसान केलं, अशा एका विषवल्लीबाबत बब्बर यांची ही मतं आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांचा बळीही याच नक्षलवादाने घेतला, याचंही भान बब्बर यांना दिसत नाही. बब्बर एवढ्यावरच थांबले नाहीत. काही दिवसांतच त्यांनी भारतीय रुपयाच्या किमतीची तुलना पंतप्रधान मोदींच्या आईशी केली. आता याला काय म्हणावं? ही अशी भाषा वापरणं म्हणजे कोणतं राजकारण आहे आणि त्यातून देशाला काय मिळणार आहे, हे समजणं सर्वसामान्य नागरिकांच्या आकलनापलीकडचं होऊन बसलं आहे. दुसरे एक महान विभूतिमत्व म्हणजे सी. पी. जोशी. केंद्रात असंख्य महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद भूषवलेले जोशी म्हणतात की, “मोदी, उमा भारती, साध्वी ऋतंभरा हे धर्मावर कसे काय बोलू शकतात? त्यांची जात कोणती आहे? कारण, धर्मावर बोलण्याचा अधिकार हा केवळ ब्राह्मणांना आहे.” देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षं उलटल्यावरही केंद्रीय मंत्री राहिलेले, एका राष्ट्रीय पक्षाचे ज्येष्ठ नेतेदेखील जातीयवादाच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकलेले नाहीत आणि यांचा काँग्रेस पक्ष म्हणजे पुरोगामी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष! मोदी आणि उमा भारती यांचा भाजप मात्र जातीयवादी, सनातनी... विचार करा, जोशी यांनी केलेलं वक्तव्य जर कुणा भाजप नेत्याने केलं असतं तर? तमाम तथाकथित पुरोगामी, लिबरल, सेल्क्युलर वगैरे पत्रकार, लेखक, बुद्धिवादी मंडळी एव्हाना चंद्रावर पोहोचली असती. परंतु, काँग्रेस नेत्याने हे असं संतापजनक काही बोलूनदेखील, ही मंडळी आपापल्या बिळातच आहेत. याला काय म्हणावं? धोरणीपणा, धूर्तपणा की कोडगेपणा? आपण काहीही म्हणालो, तरी शेवटी सर्वसामान्य जनता मात्र योग्य ते ओळखते आणि त्यावर आपली प्रतिक्रिया मतपेटीतून नोंदवते. त्यामुळे येत्या ११ डिसेंबर रोजी सर्व शिशुपालांच्या अपराधांचा घडा भरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@