दुधारी जलपर्णी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2018   
Total Views |



भारतात जलपर्णी सर्वप्रथम १८ व्या शतकात बंगालमध्ये आणली गेली, असं मानलं जातं. इथलं उष्ण-दमट हवामान तिला अनुकूल असल्याने आसेतुहिमाचल तिने आपला साम्राज्यविस्तार केला आहे. केरळमधील अनेक सरोवरं जलपर्णीची शिकार बनली आहेत. जिथे जिथे जलपर्णी फोफावलेली आहे तिथे तिथे ती हटवण्यासाठी खूप पैसे मोजावे लागत आहेत...


दि.११ नोव्हेंबर, २०१८. रविवार होता. सकाळी सात वाजता माझा मित्र ओंकार गानू आणि मी पुण्यापासून आठ-दहा किलोमीटर लांब असलेल्या थेरगाव इथे जायला निघालो. बरोबर होत्या ज्येष्ठ निसर्गप्रेमी गिर्यारोहक उषाताई (उषःप्रभा) पागे आणि ‘जीवितनदी फाउंडेशन’च्या संस्थापक सदस्या शैलजाताई देशपांडे. नऊ वाजण्याच्या सुमारास आम्ही थेरगावला पुण्याच्या मुळा नदीची उपनदी असलेल्या पवना नदीच्या केजुबाई घाटावर पोहोचलो. तिथे ‘रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी’ या संस्थेचे १५-२० स्वयंसेवक पवना नदीत बेसुमार वाढलेली जलपर्णी काढण्याचं काम करत होते. ते बघायलाच खरं तर आम्ही गेलो होतो. या क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी आम्हाला त्यांच्या ‘जलपर्णी हटाव’ मोहिमेची माहिती दिली. दर आठवड्याला या क्लबचे स्वयंसेवक पाच-पाच ट्रक जलपर्णी नदीतून बाहेर काढतात. पवनामाई जलपर्णीमुक्त करण्याचा त्यांचा ध्यास आहे. नदीत जलपर्णी का वाढू द्यायची नाही? त्यासाठी आपल्याला जलपर्णीचं वनस्पतीशास्त्र माहीत करून घ्यायला हवं. जलपर्णीचे प्रकार बरेच आहेत पण, प्रामुख्याने आपण ज्याला ‘जलपर्णी’ म्हणतो ती Echornia Crassipes ही वनस्पती होय, जिला इंग्रजीत Water Hyasinth म्हणतात. ही वनस्पती मूळची भारतीय नाही. ती आहे दक्षिण अमेरिकेतली. पण तिच्या बेसुमार वाढण्याच्या गुणधर्मामुळे आज जगभर तिने आपले ठाण मांडले आहे. गडद हिरवी पानं आणि जांभळ्या आकर्षक फुलांमुळे ही वनस्पती दिसायला खूप सुंदर दिसते. पानांच्या देठाशी गुठळ्या असतात, ज्यामुळे पानं पाण्यावर तरंगतात आणि मुळं पाण्याखाली वाढतात. केसाळ मूळं पाण्याखाली जवळजवळ दोन फूट वाढतात. या वनस्पतीच्या खोडाला आडवे धुमारे फुटून नवीन रोपं तयार होत जातात. तसंच ही वर्षभरात हजारो बियाही निर्माण करते आणि आपली प्रजा वाढवते. पिस्तीया (Pistia) ही वनस्पतीसुद्धा जलपर्णीचाच एक प्रकार आहे. तिला इंग्रजीत Water Cabbage म्हणतात. (त्या दिवशी केजुबाई घाटावर जी जलपर्णी काढली जात होती ती प्रामुख्याने ‘पिस्तीया’ हीच होती.) तिची वेलवेटसारखी मऊमऊ लुसलुशीत हिरवी पानं पाण्यावर तरंगतात आणि मूळं पाण्याखाली राहतात. या वनस्पतीला खोड नसतं. इकॉर्नियासारखीच हीसुद्धा प्रचंड वेगाने फोफावणारी वनस्पती आहे.

 

जलपर्णी नदी, ओढे, तलाव, तळी, सरोवरे अशा ठिकाणी, म्हणजेच गोड्या पाण्यात वाढते. खाऱ्या पाण्यात ती वाढत नाही. वास्तविक जलपर्णी ही प्रदूषित पाण्याची निर्देशक आहे. जलपर्णीची मूळं दूषित पाण्यातली शिसं, पारा, इ. विषारी द्रव्यं शोषून घेते. त्यामुळे जिथे पाणी जास्त प्रदूषित झालेलं असेल तिथे जलपर्णी चटकन फोफावते. भारतात नद्यांचं प्रदूषण दिवसागणिक अतिप्रचंड प्रमाणात होतं आहे. तेवढंच जलपर्णीला खाद्य मिळून ती राक्षसासारखी फोफावते. प्रदूषणाला प्रतिक्रिया म्हणून निसर्गाने केलेली ती एक सोय आहे. जलपर्णीच्या सौंदर्यमूल्यामुळे भारतात इंग्रजांच्या काळात, तसंच राजा-महाराजांकडून ती तळी-तलावांमध्ये लावली गेली. ती इतकी बेसुमार वाढून त्रासदायक ठरेल याची त्यावेळी बहुधा कल्पना नसावी. पण जलपर्णीचे स्थानिक परिसंस्थेवरील दुष्परिणाम आता स्पष्ट झाले आहेत. एकतर ती कायच्या काय वाढत असल्याने अत्यंत कमी कालावधीत नदीचा अथवा तळी-तलावांचा संपूर्ण पृष्ठभागच व्यापून टाकते. जलपर्णीने वेढलेल्या एखाद्या सरोवराकडे पाहिलं की, ‘हे सरोवर आहे’ हे कळतच नाही. एखादं मैदान असल्यासारखं वाटतं. जलपर्णी पाण्याचा पृष्ठभाग झाकून टाकत असल्याने नदीचा खळाळता प्रवाह मंदावतो. तसंच सूर्यप्रकाश पाण्याच्या तळाशी पोहोचत नाही. त्यामुळे जलीय वनस्पतींचं जीवनचक्र बिघडतं. हवेचा आणि पाण्याचा संपर्क न झाल्यामुळे पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचं (Dissolved Oxygen) प्रमाण घटतं. त्यामुळे मासे आणि जलचरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. (त्या दिवशी पवना नदीकाठी माझा मित्र ओंकार गानू याने पाण्यात किती ऑक्सिजन विरघळला आहे याची चाचणी केली. तो तीन पीपीएम (Parts per Million) च्या आसपास होता. तो आठ पीपीएम असेल, तर पाणी शुद्ध आहे असं समजलं जातं. पवना नदीचा घटलेला डिझॉल्व्हड ऑक्सिजन पवनामाई मरणासन्न अस्वस्थेत असल्याचं दाखवत होता.) जलपर्णी डासांच्या पैदाशीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. आफ्रिकेतलं सुप्रसिद्ध व्हिक्टोरिया सरोवर साधारणतः १९८० पासून जलपर्णीने वेढलं गेलं आहे. जलपर्णी हटवण्याचे अनेक प्रयत्न करूनसुद्धा तिचा नायनाट करणं शक्य झालेलं नाही. कारण, ज्या वेगाने ती पाण्यातून काढली जाते त्याच्यापेक्षा जास्त वेगाने ती वाढते. त्यामुळे व्हिक्टोरिया सरोवरात जलवाहतूक आणि मासेमारी करणं अशक्य झालं आहे. डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे लोक रोगराईलाही बळी पडत आहेत. भारतात ही वनस्पती सर्वप्रथम १८ व्या शतकात बंगालमध्ये आणली गेली, असं मानलं जातं. आज बंगालमधील नद्या, सरोवरं आणि तलावांमध्ये ती राक्षसासारखी पसरल्यामुळे तिला ‘बंगाल टेरर’ म्हणतात. भारतातलं उष्ण-दमट हवामान तिला अनुकूल असल्याने आसेतुहिमाचल तिने आपला साम्राज्यविस्तार केला आहे. केरळमधील अनेक सरोवरं जलपर्णीची शिकार बनली आहेत. मुंबईला जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडने जाताना जलपर्णीचं हिरवं पांघरूण घेतलेला पवई तलाव दृष्टीस पडतो. पवई तलावातील जलपर्णी हटवणं हे मुंबई महानगरपालिकेसाठी मोठं खर्चिक काम होऊन बसलं आहे. मुंबईतच नव्हे, तर जिथे जिथे जलपर्णी फोफावलेली आहे तिथे तिथे ती हटवण्यासाठी खूप पैसे मोजावे लागत आहेत.

 

 
 

जलस्रोतांमधून जलपर्णीचा नायनाट करण्याचे अनेक वेगवेगळे प्रयत्न जगभर शास्त्रज्ञांच्या, सरकारच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केले जात आहेत. यात जलपर्णी हाताने वा यंत्रांनी काढून टाकणं, ती वाढू नये म्हणून रसायनांचा वापर करणं, जलपर्णी खाणाऱ्या कीटक-अळ्यांची पैदास करणं असे नाना उपाय अवलंबले जात आहेत. पण या महाकाय राक्षसीपुढे ते अपुरे ठरत आहेत. जलपर्णीच्या बिया २०-२५ वर्षं टिकतात आणि अनुकूलता मिळाली की रुजतात. त्यामुळे वरून कितीही जलपर्णी काढली तरी तिच्या पाण्यात पडलेल्या बिया रुजून ती वाढतच राहते. जलपर्णीचा आर्थिक उपयोग कसा करून घेता येईल, यावरही बरंच संशोधन झालं आहे व सुरू आहे. काढलेल्या जलपर्णीपासून सेंद्रिय खत, औषधं, चटया, पिशव्या इ. वस्तू तयार करण्याचे कारखानेही उभे राहिले आहेत. जलपर्णीला बाजारमूल्य मिळाल्यामुळे ती पाण्यातून काढायचा खर्च जरी भरून निघत असला तरी, यात एक मूलभूत धोका असा की, तिचा नायनाट करण्याऐवजी पैसा मिळतोय म्हणून ती वाढू दिली जाईल. परिसंस्थेला हानिकारक ठरणाऱ्या कुठल्याही सजीव-निर्जीव गोष्टीला बाजारमूल्य मिळणं हे आगीतून फुफाट्यात टाकणारं असतं. त्यामुळे जलपर्णीचा आर्थिक उपयोग करणं हे एका बाजूने जरी चांगलं असलं तरी, त्यामुळे तिच्या वाढीला तर कुठे प्रोत्साहन मिळत नाहीये ना, यावर लक्ष ठेवावं लागेल. जलपर्णी पाण्यातले प्रदूषक घटक शोषून घेत असल्याने एक नैसर्गिक प्रदूषणनियंत्रक म्हणून ती नक्कीच उपयोगात येऊ शकते. नदीच्या मुख्य प्रवाहात जलपर्णी वाढू न देता ओढे, नाले आणि घरगुती आणि औद्योगिक सांडपाण्याचे प्रवाह नदीला जिथे येऊन मिळतात, त्या जागी जलपर्णी मर्यादित प्रमाणात वाढवणं फायदेशीर ठरेल, जेणेकरून अशुद्ध पाणी शुद्ध होऊन नदीत वा सरोवरात सोडलं जाईल. पाण्याचं प्रदूषण हे जलपर्णीच्या वाढीला प्रोत्साहन देतं, ही यातील खरी मेख आहे. वाढलेल्या जलपर्णीच्या रुपाने निसर्ग आपल्याला आपल्या बेजबाबदारपणाची जाणीव करून देत असतो. त्यामुळे नद्या, ओढे, तळी, तलाव, सरोवरं इ. जलस्रोतांचं प्रदूषण होऊच न देणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@