मुंबई : रेल्वे रुळांची दुरुस्तीकामांसाठी उद्या मुख्य, हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे नेहमीप्रमाणे मुंबईकरांचा रविवार अडथळ्यांचा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते गोरेगाव अप व डाऊन धीम्या मार्गावर, मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद तर हार्बरवरील पनवेल ते नेरूळ अप व डाऊन मार्ग आणि नेरूळ, बेलापूर ते खारकोपर अप व डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे ट्रान्सहार्बर देखील बंद राहणार आहे.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेमार्गावर सकाळी १०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३, ४ वरून एकही लोकल धावणार नाही. दरम्यान, बोरीवली आणि गोरेगाव या ठिकाणी ट्रॅक, सिग्नल, ओव्हरहेड वायरिंगचे काम करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेमार्गावर सकाळी ११.१५ ते दु. ३.४५ वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १० वाजून ३७ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याणवरून सीएसएमटीकडे जलद मार्गाने धावणाऱ्या सर्व लोकल दिवा आणि परळ या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर धावतील. यामुळे मेगाब्लॉक दरम्यानच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच ब्लॉकमुळे रविवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिव्यापर्यंतच चालवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेमार्गावर सकाळी ११.३० ते दु. ४.०० वाजेपर्यंत पनवेल ते नेरूळ अप व डाऊन मार्ग आणि नेरुळ, बेलापूर ते खारकोपर अप व डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते अंधेरी आणि ठाणे ते पनवेल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ लोकल नियमितपणे धावणार आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/