पाकिस्तानचा स्वतःशी जिहाद...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2018   
Total Views |
 
 

हिंसात्मक चळवळींचे अमाप विष पेरताना पाकिस्तान या देशातही या पिकाच्या पाळामुळांमुळे प्रचंड उलथापालथ झाली आहे. काही वर्षांपूर्वी पेशावरमध्ये शेकडो बालकांचे झालेले हत्याकांड असू दे की, सातत्याने होणारे बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले असू देत या सार्‍यांचे संबंध, या सार्‍यांचा जन्म कुठे झाला असेल? का झाला असेल याचा मागोवा घेतला तरी जाणवते की, पाकिस्तानने भारताला शह देण्यासाठी, जेरीस आणण्यासाठी जे काही काटे पेरले होते, त्याच काट्याचा आता कधी न बरा होणारा विषारी नायटा झाला आहे.

 
स्वतःच्या या अधोगतीकडे पाकिस्तानचे कधी लक्ष जाणार? भारतात मुस्लीम सुरक्षित नाहीत किंवा काश्मीर हा भारताचा भूभाग नाही, या कायम आक्रस्ताळेपणाच्या भूमिकेत इतर अल्पसंख्याक तर सोडाच पण पाकिस्तानमध्ये बहुसंख्य मुस्लीमच सुरक्षित नाहीत. पाकिस्तान आपल्या बरबादीच्या वाटेवर खुशीने जात आहे. काल मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणात जगभर साजरा झाला. मुस्लीमधर्मीय पाकिस्तानमध्ये तर दिवाळीच असेल यात शंका नाही. पण त्यानंतर काय? इस्लामाबाद -पाकिस्तानच्या कराचीमधल्या चिनी दूतावासाजवळ मोठा बॉम्बहल्ला करण्यात आला. या बॉम्बस्फोटानंतर गोळीबारही करण्यात आला. पाकिस्तानमधील या परिसराला ’रेड झोन’ असे संबोधण्यात येते. जगातील अनेक देशांची कार्यालये या ठिकाणी आहेत. या हल्ल्याची घटना ताजी असतानाच दुपारच्या सुमारास खैबर पख्तुनख्वा प्रांतातही शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यात ३० जण ठार झाले, तर ४० जण जखमी झाले आहेत. स्फोटातील मरण पावलेले अनेक नागरिक शिया मुस्लीम समाजाचे आहेत.
 

माणसं मग ती कोणत्याही देशातली वा कोणत्याही धर्माची असू दे, कोणत्याही बॉम्बस्फोट किंवा हल्ल्यात ती एकटी मरत नाहीत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब आणि जवळचे सारे काही छिन्नविछिन्न होते. या मृतांच्या पाठीमागे जगणारे मनात किती दुःख, संताप आणि द्वेष घेऊन जगत असतील? याचा अंदाज घेतला तर मन सुन्न होते. पाकिस्तानमध्ये धर्माचे नाव घेऊन शिया-सुन्नी वादात किती जण अल्लाला प्यारे झालेत त्यांची गणती नाही. त्यामुळे शिया, सुन्नी याशिवाय पंजाबी, सिंधी, पठाणी, बलुची, पख्तुनी, पहाडी वगैरे वगैरे वर्गिकरणातही पाकिस्तानमधला मुस्लीम दररोज मरतच आहे. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानला मात्र एकाच गोष्टीत रस आहे, ते म्हणजे भारताने प्रगती करू नये. आपल्या बुडाखाली काय आणि किती जळतेय याची भीती पाकिस्तानला आहेच. पण, आज पाकिस्तान यावर रडूही शकत नाही. भिकेचे डोहाळे लागले असतानाही पाकिस्तानला संरक्षण किंवा आपण दुसर्‍या देशावर हल्ल्यासाठी कसे सिद्ध आहोत, हे दाखवावेच लागते. काय करणार गल्लीतले खाजके कुत्रे हे जास्त ओरडते, पण खाजेमुळे व आजारामुळे ते उठूनही उभे राहू शकत नाही, तसेच काहीसे हे.

 

असो, इतकी सगळी अनागोंदी पाकिस्तानमध्ये सुरू असताना याच आठवड्यात अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल रॉब मॅनिंग यांनी मंगळवारी मेलवरून म्हटले की,”पाकिस्तानला देण्यात येणारी १.६६ अब्ज डॉलरची संरक्षणविषयक मदत थांबविण्यात आली आहे.” दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान कारवाई करत नसल्याने केवळ ट्रम्प प्रशासनच नाही तर अमेरिकी नागरिकही नाराज आहेत. याच मुद्द्यावरूनही ट्रम्प यांनी पाकिस्तानवर टीका केली. ते म्हणाले की, ”अमेरिकेने पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत दिली, मात्र पाकिस्तानने अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा सांगितला नाही.” असो, इमान मुसलमान वगैरेचा नारा देणार्‍या पाकिस्तानचा इतिहास हा कायम पाठीत खंजीर खुपसणे हाच होता. ट्रम्प किंवा अमेरिकेला ते आता कळले, इतकेच. असो. या निर्णयाच्या अगोदर आयएमएफनेदेखील पाकिस्तानला दणका दिला आहे. आयएमएफने पाकिस्तानकडून चीनबरोबरच्या आर्थिक सहकार्य कराराचा तपशील मागितला आहे. त्याचवेळी पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश या कराराचा खुलासा करण्याबाबत टाळाटाळ करत आहेत. या सगळ्याची परिणती म्हणजे आधीच सामाजिक, राजकीय अराजकतेमध्ये असलेला पाकिस्तान आता अटळपणे आर्थिक अराजकतेकडे चालला आहे. पण असे असतानाही स्वतःच्या अराजकतेची पाकिस्तानला ना खंत ना खेद. या ना त्या कारणावरून जिहाद मंत्र जपणार्‍या पाकिस्तानने हा स्वतःशीच पुकारलेला जिहाद तर नाही?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@