
मुंबई : ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आधीच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत.
संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावे चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संमेलनासाठी नागपूर, पिंपरी चिंचवड, लातूर या ठिकाणांची नावे स्पर्धेत आहेत. नाट्य संमेलनाचे ठिकाण लवकरच जाहीर होणार आहे.
कोण आहेत प्रेमानंद गज्वी?
प्रेमानंद गज्वी हे मराठी लेखक व ज्येष्ठ नाटककार आहेत. यांची लेखन कौशल्याची खास बात म्हणजे ते सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडतात. त्यांच्या काही लेखांचा शालेय अभ्याक्रमातदेखील समावेश करण्यात आला आहे.
'ढिवरडोंगा', 'लागण' ही त्यांची काही प्रसिद्ध कथासंग्रह. तर 'किरवंत', 'गांधी आणि आंबेडकर', 'देवनवरी', 'नूर महंमद साठे', 'शुद्ध बीजापोटी' ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत. त्यांनी लिहलेली 'घोटभर पाणी' या एकांकिकेचे १४ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. तर 'पांढरा बुधवार' या त्यांच्या एकांकिकेचा समावेश अमरावती विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/