अंधांसाठीचा ‘देवदूत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018   
Total Views |



ब्रेललिपीच्याही पलीकडे जाऊन अंधांसाठी एक सहज-साधे, पण तरीही एक विशेष उपकरण तयार करणारा २३ वर्षांचा रुपम शर्मा... त्याच्या या प्रयोगाने तो अंधांसाठीचा देवदूतच ठरला आहे.

 

आपल्या देशात प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वांची काही कमी नाही. असाच एक प्रतिभावंत व कल्पक तरुण सध्या जगभर चर्चेचा विषय ठरतोय. आपल्या देदीप्यमान संशोधनामुळे त्याने जगभर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अंधांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यात त्याचे योगदानही अगदी महत्त्वाचे... असा हा देदीप्यमान हिरा म्हणजेच युवा उद्योजक, संशोधक रुपम शर्मा.

 

रुपम शर्मा हा हरियाणातील फरिदाबादचा २३ वर्षीय तरुण. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात निर्मल आणि कृष्ण दत्त यांच्या पोटी रुपमचा जन्म झाला. रायन इंटरनॅशनल स्कूल आणि मॉर्डन विद्या निकेतन या शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्याने पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करायचे, हा प्रश्न इतर पालक व विद्यार्थ्यांप्रमाणे त्याच्याही घरी पडला होता. पालकांनी थोडा विचार केल्यानंतर रुपमने इंजिनिअरिंग शाखा निवडावी, असा आग्रह धरला. मात्र, रूपमला इंजिनिअरिंगमध्ये फारसा रस नव्हता. मात्र, त्याच्या पालकांना विश्वास होता की, इंजिनिअरिंग हे एकमेव क्षेत्र आहे जिथे आपला मुलगा भुकेने मरणार नाही. त्यामुळे त्याचा पुढील दाखला फरिदाबादमधीलच ‘मानव रचना विद्यापीठा’त घालण्यात आला होता. पालकांच्या आग्रहास्तव त्याने इंजिनिअरिंग क्षेत्र निवडले. मात्र, पालकांच्या याच निर्णयाने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होते.

 

इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे रुपमच्या महाविद्यालयीन जीवनाला सुरुवात झाली. दंगा, मस्ती, अभ्यास करत करत तो महाविद्यालयीन आयुष्य जगत होते. संगणक शाखेच्या अखेरच्या वर्षाला असताना त्याचे आयुष्य महाविद्यालयातील एका प्रकल्पाने पूर्णपणे बदलून गेले. रंगांध व्यक्तींसाठी गेम तयार केला जाऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या प्रकल्पासाठी हाच विषय निवडला. यानंतर त्याने या विषयावर संशोधन करण्यास सुरुवात केली. दृष्टिहीनांचे आयुष्य कसे असते? त्यांच्या हालचाली, एखादी गोष्ट ते कशी समजून घेतात? त्यांच्यासाठी कोणतीउपकरणे वापरली जातात? त्यांना कसे शिकवले जाते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तो दिल्लीतील आर. के. पुरम येथील एका अंधशाळेत सलग १५ दिवस जाऊ लागला. हे १५ दिवसच त्याच्या आयुष्याचे टर्निंग पॉईंट ठरले. या १५ दिवसांत त्याला असे लक्षात आले की, ब्रेल लिपी सोडली, तर अंधांसाठी इतर कोणतेही उपकरण नाही ज्यामुळे त्यांचं आयुष्य अधिक सोयीस्कर होईल. दृष्टिहीनांचे संपूर्ण आयुष्य ब्रेल लिपीवरच अवलंबून असल्याचे रुपमच्या लक्षात आले.

 

जग पाहण्याचा व जगण्याचा जेवढा अधिकार डोळस व्यक्तींना आहे, तितकाच तो दृष्टिहीनांनासुद्धा आहे. याच विचाराने प्रभावित होऊन त्याने अंधांसाठी काम करण्याचा निश्चय केला. यानंतर रुपमने ‘मानवरचना इनक्युबेशन अ‍ॅण्ड इनोव्हेशन सेंटर’च्या मदतीने अंधांचे प्रश्न सोडविण्यासाठीचा प्रकल्प हाती घेतला. याच संशोधनाच्या बळावर रूपमने अंधांसाठी ‘मॅनोव्ह्यू’ नावाचे उपकरण बनवले. या उपकरणामध्ये कॅमेरा व सेन्सर असून हे हातमोज्यांसारखे सहज हातात घालता येते. यातील कॅमेरा समोरील अक्षरांचे ऑडिओमध्ये रूपांतर करतो, तर वाटेत काही अडथळे असतील तर सेन्सरच्या माध्यमातून समोर असलेला धोका कळतो. त्यामुळे अंधव्यक्ती एखादा मजकूर सहज वाचू शकते. सहज रस्ता ओलांडू शकते व मोबाईलवरून फोन व मेसेज सहज पाठवू शकते. पाच हजार ५०० रुपये खर्च करून रुपमने हा शोध लावला. या उपकरणाचा ३५० दृष्टिहीनांवर प्रयोग करून पाहिला आणि आपला हा क्रांतिकारी शोध यशस्वी झाल्याचे जगजाहीर केले.

 

त्याच्या या शोधानंतर जगभरात त्याची दखल घेण्यात आली. २०१५ मध्ये ‘मायक्रोसॉफ्ट इमॅजिन करंडक,’ ‘याहू असेंशुअर इनोव्हेशन जॉकीज पुरस्कार,’ भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ व नुकताच बर्लिन येथे जागतिक ‘आरोग्य शिखर बैठकी’चा २०१८ सालचा ‘स्टार्ट-अप पुरस्कार’देखील त्यांना मिळाला आहे. मात्र, यातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे फेसबुकचा सर्वेसर्वामार्क झुकेरबर्ग व गुगलचे संस्थापक अध्यक्ष लैरी पेज, सेरगे ब्रिन यांना मिळालेला ‘एमआयटी टेक रिव्ह्यू’ हा पुरस्कार रूपमला मिळाला. हा पुरस्कार जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्याला दिला जातो. विशेष म्हणजे, रूपम हा जगातील सर्वात लहान विद्यार्थी आहे, ज्याला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

रूपम एवढ्यावर थांबला नाही, तर त्याने या विषयावर अधिक संशोधन सुरू केले. तसेच या शोधाचे पेटंट मिळविण्यासाठी तो प्रयत्न करत असून या उपकरणाची किंमतदेखील त्याने सर्वसामान्यांना परवडेल एवढीच, म्हणजे फक्त दोन हजार ८०० रुपये ठेवली आहे. त्याचा हा शोध दृष्टिहीनांसाठी नक्कीच क्रांतिकारी ठरला आहे. यामुळे दृष्टिहिनांनादेखील अगदी सहज आयुष्य जगायला, अनुभवायला मिळेल यात शंका नाही...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@