अमेझिंग थायलंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018   
Total Views |

 
 
एकीकडे बौद्ध संस्कृतीची संपन्नता, तर दुसरीकडे गगनचुंबी इमारतींची परस्पर स्पर्धा असा पारंपरिक वारसा जपूनही आधुनिकतेचा साज ल्यायलेला थायलंड हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश. भारताच्या पूर्वेला आणि अंदमान-निकोबार बेटांपासून केवळ एक हजार किमी दूर अशा या देशातील बँकॉक आणि पटाया या दोन प्रमुख पर्यटन शहरांना भेट देण्याचा योग जून महिन्यात जुळून आला. याच अनुभवांचे प्रवासवर्णन रेखाटणारा हा लेख...
 

काय? थायलंडला जातोयस? कशासाठी? आणि तेही नुकतचं लग्न झाल्यानंतर?” माझ्या एका जवळच्या मित्राने उपस्थित केलेल्या या प्रश्नार्थक इशाऱ्याचा रोख मला तसा लगेचच समजला. पण, त्यात त्या बिचाऱ्याचाही काय दोष म्हणा. आपण भारतीयांनी थायलंडविषयी एक विशिष्ट नकारात्मक प्रतिमा, माध्यमांतून, इतरांच्या अनुभवांतून अगदी चौकटबद्ध करून ठेवली आहे. अगदी स्पष्टचं बोलायचं झालं, तर थायलंड म्हणजे काय तर ‘सेक्स हेवन.’ गोऱ्यापान सडपातळ (आपल्याला ‘चायनीज’ वाटणाऱ्या) ललना, रस्त्यावर त्यांचा खुलेआम सुरू असणारा वेश्याव्यवसाय आणि मुलींनाही लाजवतील अशा लकबीच्या लेडीबॉईजच्या घायाळ करणाऱ्या त्या हायतोबा अदा... त्यात रस्तोरस्तीपहुडलेले थाय मसाज पार्लर्स, रात्रंदिवस कल्ला करणारे बार-रेस्टॉरंट्स आणि क्लब्सच्या रोषणाईचा डोळे दीपवून टाकणारा तो लालेलाल झगमगाट... थायलंडची अशी ही ‘अय्याषीचा स्वर्ग’ म्हणून रंगवलेली बाहेरख्याली प्रतिमा चुकीची नसली तरी, ती परिपूर्ण निश्चितच नाही. वेश्याव्यवसाय हा थायलंडच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य घटक असला, ती या देशाची जणू कधीही न पुसली जाणारी ओळख असली; तरीही ‘थायलंड म्हणजे हेचं असलचं गुलछबू सगळं’ हा समज मात्र चुकीचा. त्यामुळे कोणतेही पूर्वग्रह न ठेवता या देशाला भेट देण्याचं पाच-सहा महिने आधीपासून रीतसर नियोजन केलं आणि जून महिन्याच्या सुरुवातीला दोन मित्रांसोबत थायलंडच्या सुवर्णभूमीकडे मोठ्या आशेने निघालो.


 
 

मुंबईहून रात्री तीनच्या सुमारास ‘थाय स्माईल’च्या विमानाने बँकॉकसाठी प्रस्थान केलं. खरं तर विमानात प्रवेश करताच हवाईसुंदरींच्या थाय भाषेच्या स्वागतापासूनपुढ्यात काय वाढून ठेवलंय, याची थोडी फार कल्पना आलीच. पण, आमची पहिलीवहिली ‘इंटरनॅशनल ट्रीप’ म्हणून आनंद गगनातही मावत नव्हता. संपूर्णपणे भारतीय पर्यटकांनी भरलेल्या या नॉनस्टॉप विमानाने अवघ्या पाच तासांत थायभूमी गाठली. लांबच लांब क्षितीजावरसूर्योदयाच्या बदलत्या केसरी-निळ्या रंगछटा मी अधाशासारखा डोळ्यांत साठवून घेत होतो. जणू असा सूर्योदय पुन्हा होणेच नाही... हळूहळू विमानही पांढऱ्याशुभ्र ढगांच्या मखमालीतून खाली खाली येत सुवर्णभूमीकडे झेपावत होते. आता कुठे तो थायलंड देश दृष्टिक्षेपात होता. विमानाच्या इटुकल्या खिडकीतून खाली नजर जावी तिथे लांबच लांब आयताकृती रचलेले हिरवेगार शेतपट्टे आणि त्यांना विभागणारे कालव्यासारखे निळेशार जलप्रवाह. ते रम्य दृश्य बघता बघता ‘कुर्सी की पेटियां’ बांधत अलगद बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले. भारतीय वेळेपेक्षा दीड तास पुढे धावणारा थायलंडच्या टाईम झोनचा काटा. पण, विमानात रात्रभर आरामशीर झोपून आल्यामुळे फारसं काही जाणवलं नाही. आमच्या टूर कंपनीच्या गाईडबाईंच्या शोधात सुरुवातीला पुरती दमछाक उडाली. कारण, आमच्या नावाचे फलक घेऊन स्वागतासाठी कुणीच उभं नव्हतं. त्यात फोनही बंद आणि भाषेचा तर सगळा सावळा गोंधळ. म्हणजे अगदी उतरल्या उतरल्या ‘आता पुढे काय?’ हाच प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला. पण, एका दुसऱ्या टूर गाईडने आमच्या टूर कंपनीचे नाव विचारत आम्हाला संबंधित टूर गाईडच्या हवाली केले आणि मग थोडा जीवात जीव आला. बँकॉकच्या प्रशस्त अशा सुवर्णभूमी विमानतळावरून फोटोसेशन झाल्यानंतर आमचा बँकॉक ते पटाया हा एसी कारने प्रवास सुरू झाला. बाहेरचे वातावरण प्रचंड उष्ण. जून महिना असल्यामुळे हवेतील उकाडा तर अगदी असहनीय. सकाळी १० वाजण्यापूर्वीच इतक्या कडक उन्हाचा मारा. पण, मुंबईसारख्या घळाघळा वाहणाऱ्या घामाच्या धारा नाहीत. पण, सुदैवाने एसी गाडीतून प्रवास सुखकर सुरू होता. त्या वाहनचालकालाही अपेक्षेप्रमाणे इंग्रजी ‘येस-नो-प्लीज’ पलीकडे काही समजत नव्हतेच आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांनी तो अधिकच गोंधळतोय, हे पाहून आम्ही मुकाट्याने गाडीच्या खिडकीतून थायलंडची पहिलीवहिली दृष्य टिपण्यातच धन्यता मानली. बँकॉक-पटाया हा थायलंडचा एक प्रमुख हायवे. पण, दुतर्फा तरीही कुठेही ट्राफिकजाम नाही की कर्णकर्कश हॉर्नचा आवाज नाही. सगळी वाहने संथ गतीने आपापल्या ‘लेनच्या शिस्ती’त धावत होती. विमानतळ मुख्य शहरापासून काहीसे दूर असल्यामुळे बँकॉकमध्येही चक्क रस्त्याच्या आजूबाजूला मळे फुललेले दिसून थोडे आश्चर्य वाटलेच. एकदाही करकचून ब्रेक न मारता, विनाथांबा बँकॉक-पटाया हे १२० किमीचे अंतर आम्ही दोन तासांत पार केले. मग पुढे पोलीस तपासणी झाल्यानंतर पटायाच्या हद्दीत प्रवेश झाला. पोटात कावळे कोकलत होते. पण, आमच्या चालकाने आम्हाला हॉटेलवर न नेता थेट ‘मिनी सियाम’ गाठले.

 

 
 
  
सियाम... हे थायलंड या देशाचे जुने नाव. पालीमधील ‘स्वर्णभूमी’, संस्कृतमधील ‘श्याम’ किंवा चिन्यांच्या ‘झ्यान’चा पोर्तुगीजांनी केलेला ‘सियाम’ हा अपभ्रंश मानला जातो. मोन, खेमर, मलय, सुखतोई, अयुथ्या आणि त्यानंतर चक्री साम्राज्यकर्त्यांनी सियामवरील वर्चस्वासाठी अकराव्या शतकापासून संघर्ष केला. त्यानंतर अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात वसाहतवादाच्या वर्चस्वात फ्रेंच, ब्रिटिश, पोर्तुगीजांकडूनही सियामला गिळंकृत करण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. पण, पाश्चात्त्य शक्तींना सियामला आपल्या वसाहतीच्या नकाशात सामील करता आले नाहीच. त्यामुळे द. आशियातील थायलंड हा एकमेव असा देश, जो कधीही पाश्चात्यांच्या अधिपत्याखाली आला नाही. अखेरीस १९३२ साली एका रक्तहीन क्रांतीत ‘सियाम’ हे आपले सांस्कृतिक नाव बदलून ‘थायलंड’ अर्थात ‘लोकांचा देश’ म्हणून संवैधानिक राजेशाही पद्धतीनुसार शासन करणारा हा देश जागतिक पटलावर आला. त्यामुळे थायलंडच्या संस्कृतीवर चिनी, भारतीय, बौद्ध, मलय, इंडोनेशियन या सगळ्या संस्कृतींचा प्रकर्षाने प्रभाव जाणवतो. ‘मिनी सियाम’या अशाच एका अनोख्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरच याचा प्रथम परिचय झाला. एक सोनेरी रंगाची सुरेख स्मित करणारी मूर्ती स्वागतमुद्रेत डौलात उभी होती. मूर्तीचा अर्धा वरचा भाग हा माणसाचा, तर खालचा भाग हा पक्ष्याचा. डोक्यावर पारंपरिक थायलंडचा रेखीव-कोरीव मुकूट. या देवीला थायलंडमध्ये ‘किन्नरी’ म्हटले जाते, जी नृत्य, संगीत, कविता, स्त्रीसौंदर्याचे प्रतीक म्हणून थायलंडमध्ये ओळखली जाते. आपल्याकडील ‘किन्नर’चीच ही ‘थायलंडची आवृत्ती’ म्हणा हवं तर. आपण ‘किन्नर’ म्हटलं की लगेच तृतीयपंथीय डोळ्यांसमोर येतात. पण, महाभारताच्या आदिपर्वात किन्नर-किन्नरींचा उल्लेख आढळतो. भारतीय धर्मशास्त्रानुसार अर्धे मानव आणि अर्धे अश्व असलेले हे हिमालयातून आलेले दैवी जीव. पण, द. आशियातील पौराणिक कथांनुसार किन्नरींचे अर्धे शरीर हे मानवाचे आणि अर्धे पक्ष्याचे असते; जेणेकरुन ते मानवी दुनियेतून रहस्यमयी दुनियेतही अगदी सहज मुक्त संचार करू शकतात. अशा या थायलंडच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या ‘किन्नरी’ नंतर ठिकठिकाणी दिसल्या.
 

 

‘मिनी सियाम’ या नावाप्रमाणेच या संग्रहालयात जगभरातील प्रसिद्ध अशा १०० वास्तूंचे १:२५ या प्रमाणानुसार छोट्या, पण तरीही भव्य वाटणाऱ्या प्रतिकृती कल्पकतेने विस्तृत परिसरात उभारल्या आहेत. थायलंडच्या सुप्रसिद्ध बुद्ध मंदिरापासून ते इजिप्तचे पिरॅमिड आणि आयफेल टॉवर आणि हो, मुख्य म्हणजे जगभरात प्रेमाचे प्रतीक असलेला आपला ताजमहालही... विशेष म्हणजे, ‘मिनी सियाम’मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली. पण, टेन्शन नॉट... तुमच्याकडे छत्री नसली तरी, थायलंडच्या बहुतांशी पर्यटनस्थळांवर बाहेर मोफत छत्र्या ठेवल्या जातात. त्या उचला, वापरा आणि काम झाले की जागच्या जागी ठेवून द्या. आहे की नाही कमाल... त्यानंतर १५-२० मिनिटांनी ‘मिरॅकल सूट’ या आमच्या फोर स्टार हॉटेलमध्ये चालकाने आम्हाला सोडले आणि ‘गुड डे’ म्हणत त्याने आमचा निरोप घेतला. अत्यंत प्रशस्त, भव्यदिव्य अशा या हॉटेलमध्ये ‘चेक-इन’ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रूमपर्यंत सामान घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याने रूममध्ये शिरताच हळूच एक कॅटलॉग काढला. भुकेलेल्या आम्हा बापड्यांना तो जेवणाचा मेन्यू वाटला, पण ती वेगळीच ‘भूक’ भागवण्याचा मेन्यू होता म्हणा हवं तर... गोऱ्यापान, बारकुड्या थायमुलींच्या (त्यातील लेडीबॉईज किती कोणास ठाऊक) १००-१५० फोटोंनी भरलेला तो अल्बम होता. आम्हाला त्या कर्मचाऱ्याचा रोख कळला. पण, “नो...नो...” म्हणत ५० बाथ (आपले १०० रुपये) टीप देऊन ‘तुमची ही सेवा नको असल्याचे’ त्यांना सांगितले. जेवणासाठी लगेच बाहेर एक रेस्टॉरंट गाठले आणि पेटपूजा उरकली. थायलंड हा पर्यटकांनी पुरता गजबजलेला देश, तरीही एक विशिष्ट वर्ग सोडला तर इंग्रजी बोलणारे कमीच. पण, संध्याकाळी पटाया आणि अख्ख्या थायलंडमध्ये सुप्रसिद्ध असणाऱ्या ‘अल्कझार शो’ला नेणारा चालक मात्र स्मार्ट आणि अस्खलित इंग्रजी बोलणारा. ‘अल्कझार कॅब्रे शो’ हा अत्यंत नावाजलेला आणि थायलंडचे संस्कृतीदर्शन घडवून आणणारा एका तासाचा जंगी कार्यक्रम. १९८१ पासून सुरू झालेला हा कार्यक्रम पाहण्यासाठी आज देशविदेशांतील पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे, मंचावर आकर्षक पेहरावांसह परफॉर्म करणारी एकही मुलगी नसते. पण चक्क मुलींनाही लाजवतील असे या लेडीबॉईजचे सौंदर्य... याबाबत आम्हाला आधीच आमच्या चालकाने सांगितले होते. पण, आमचा मात्र डोळ्यांवर खरचं विश्वास बसत नव्हता. कार्यक्रमानंतर आम्ही चालकाला पुन्हा तोच प्रश्न केला आणि हसत हसत त्यानेही “अहो त्या मुलीच नाहीच,”हे पुन्हा पटवून देण्याचा प्रयत्न केला. शो संपल्यावर या उंच गोऱ्या, मेकअपचे अगदी थरावर थर चढवलेल्या, आकर्षक पोशांखातील लेडीबॉईजसोबत फोटो काढायचे असतील, तर खिसा मोकळा करायची तयारी ठेवाच. पण, एकूणच ‘अल्कझार’चा अनुभव सर्वार्थाने संस्मरणीय असा. साजेशी अन् वेगवान प्रकाशयोजना, संगीताचा केलेला उत्तम वापर आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे थायलंडच्या संस्कृतीचे अप्रतिम कलासादरीकरण...एकदम लाजवाब...
 
 

 
 
 
त्यानंतर रात्री जवळपासच्या परिसरात फेरफटका मारला आणि ‘थाय स्ट्रीटफूड’ म्हणून साधा चिकन आणि भात चाखून बघितला. गोड, तिखट, आबंट चवीचे कीटकांसह इतरही बरेच पदार्थ होते म्हणा, पण उगाचं पोटाची बिकट अवस्था नको म्हणून झेपेल असेच पहिल्या दिवशी खाणे पसंत केले. पुढचे काही दिवस तर नारळाचा भरपूर वापर करुन बनवलेल्या थाय करीवरच ताव मारला. साहजिकच जेवणाला आपल्यासारखी मसालेदार चव नसली तरी, कमी पैशांत पोटभर जेवण हे थायलंडचे वैशिष्य पुढेही पदोपदीजाणवले. त्यामुळे खरं तर पहिल्याच दिवशी या देशाविषयी, शहराविषयी बरचं काही समजलं. पण, ही तर फक्त एक झलक होती. भारताच्या सहापट लहान असलेल्या थायलंडमध्ये एकूण ७६ प्रोव्हिनसेस अथवा राज्य आणि राजधानी बँकॉक व दुसरे महत्त्वाचे शहर पटाया ही दोन विशेष प्रशासकीय क्षेत्र. आपल्यासारखाच केंद्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक राज्यकारभार. पटाया हे बाराही महिने पर्यटकांनी अगदी गजबजलेले शहर. जणू पर्यटकांसाठीच उभारलेले ही खास नगरी. ‘रिसॉर्ट सिटी’ म्हणूनही जगभरात या शहराची विशेष ओळख.त्यामुळे २०१७च्या केवळ मध्यापर्यंत ८० लाख पर्यटकांनी पटायाला भेट दिली होती, यावरून या शहराच्या पर्यटनमूल्याचा अंदाज यावा. साधारण तीन किमी लांबीचा समुद्रकिनारा पटायाला लाभला असून किनारपट्टी अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित देखभाल केलेली. पण, मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातही वाहतूककोंडीची प्रचंड समस्या आणि खासकरून संध्याकाळी... पटाया-बँकॉक धावणाऱ्या मस्त लक्झरी बस असल्या तरी, पटायातील अंतर्गत बस वाहतुकीसाठी वापर होतो ‘बाथ बस’चा. या बस म्हणजे जीपपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या, जणू रिक्षाच. २० बाथ द्या आणि पटायाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात प्रवास करा. विदेशी पर्यटकही अगदी लटकून लटकून या बसने पटायामध्ये प्रवास करताना दिसतात, हे विशेष. ही बस नाही तर मग ‘टूकटूक’ ही पाय पसरवायला पुढे भरपूर जागा असलेली रिक्षा. मीटर-बीटर नाही, आधीच घासाघीस करायची आणि मग सवारी...

 

दुसऱ्या दिवशी दुसरी गाडी आणि पुन्हा दुसरा चालक. ‘कोरल आयलंड’ची ही टूर. ‘कोह लार्न’ असे या बेटाचे प्रशासकीय नाव. पटायाच्या मुख्य किनाऱ्यापासून ४५ मिनिटांवर असलेल्या या बेटावर स्पीडबोटने पोहोचण्याआधी समुद्राच्या मध्यभागी एक कृत्रिम बेटासारख्या भागावर पॅरासेलिंगचा मनमुराद आनंद लुटला. आकाशात उंचावरून अवघं पटाया नेत्रतृप्त करून गेलं. बोटीला बांधलेल्या पॅराशूटने हवेत वेगाने घिरट्या घालतानाच्या या खगविहाराची मज्जाच काही और... पायाखाली फक्त निळाशार उसळणारा समुद्र, वर निळेशुभ्र आकाश आणि किनाऱ्यालगतची पटायाची सुंदर स्कायलाईन... दूरवर दिसणाऱ्या पटाया हिल्सवर लिहिलेला ‘पटाया’चा मोठा फलक शोधण्याचा मोह, तर वर पॅरासेलिंग करताना आवरला नाही. त्यानंतर मग पुढे दुपारी ४ पर्यंतचा वेळ कोरल आयलंडच्या किनाऱ्यावर जलक्रीडा करताना कसा गेला, ते कळलंच नाही. स्कुबाडायव्हिंग, स्नॉर्क्लिंग यांसारखे वॉटर स्पोर्ट्सचे भरपूर पर्याय... नितळ, स्वच्छ पाणी आणि पांढरीशुभ्र बारीक वाळू... पाठी हिरवीगार गर्द झाडी... अधूनमधून भुरभुरणारा पाऊस... वाह... फूल्ल पैसा वसूल... कोरल आयलंडला जडमनाने निरोप देऊन पुन्हा पटायाच्या किनारी पोहोचलो आणि नियोजित कार्यक्रमाप्रमाणे भारतीय रेस्टॉरंटमध्ये पंजाबी जेवणावर अगदी तुटून पडलो. सूर्य मावळतीला जायला तरी तासभर होता. उन्हानेही थोडी विश्रांती घेतली होती. मग पोटभर जेवणानंतर निघालो ते ‘सँक्चुरी ऑफ ट्रूथ’ला.
 

 

थायलंडला जाण्यापूर्वी पटायातील पर्यटनस्थळ निवडीची जबाबदारी ही माझ्याकडे होती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हे स्थळ वगळायचं नाही, ही गाठ मनाशी बांधलीच होती. थायलंडला दाखल होण्यापूर्वीच या अद्भुत वास्तूचे फोटो बघूनच याची भव्यता डोळ्यात भरते. पण, प्रत्यक्षात तिथे गेल्यावर या अजस्र लाकडी वास्तूकडे बघून आम्ही दोन मिनिटांसाठी अगदी नि:शब्द झालो. डोळ्यांत त्या लाकडी किल्ल्यावजा वाड्याची भव्यता सामावतच नव्हती. ज्या हातांनी कलेचा हा अद्वितीय नमुना साकारला त्यांच्यासाठी मनोमन नतमस्तक झालो. खरं तर ‘सँक्चुरी’चा इतके वर्ष ‘अभयारण्य’ हाच एकमेव अर्थ परिचित होता. पण, ‘सँक्चुरी’ म्हणजे देवालय, देवळातील गाभारा हे अर्थ इथे आल्यावर सर्वार्थाने उलगडले आणि खरंच सत्याचा साक्षात्कार झाला. ‘सँक्चुरी ऑफ ट्रूथ’ ही थायलंडमध्ये उपलब्ध लाकडांपासून बांधण्यात आलेली जगातील सर्वात मोठी लाकडी वास्तू. हिंदू, बौद्ध, चिनी आणि इंडोनेशियन संस्कृती, पुराणकथांचा सुंदर मिलाफ येथील कोरीव लाकडी शिल्पांमध्ये पाहायला मिळतो. थायलंडमधील एका व्यावसायिकाच्या मनात ही संकल्पना आकारास आली आणि १९८१ पासून आजही या वास्तूचे काम सुरूच असून ही वास्तू पूर्ण होण्यासाठी २०५० हे साल उजाडावे लागेल. म्हणजे, जवळपास ७० वर्षांचा कालावधी... ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती यांसह भारतीय देवीदेवतांची सुबक शिल्पं लाकडी कलाकुसरीचा एक उत्तम नमुना आहेत. त्याचबरोबर तथागत गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा लाकडावर अगदी सूक्ष्मपणे कोरलेल्या दिसतात. १०५ मीटर उंच आणि तेवढ्याच रूंदीच्या वास्तूत हेल्मेट घालूनच प्रवेश करावा लागतो. लाकडावरील रेखीव कलाकुसर जोडण्यासाठी किंवा वास्तूच्या आधारासाठी लाकडाशिवाय इतर कुठलीही वस्तू वापरलेलीनाही. शिवाय, हे लाकूड खराब होणार नाही, याचीही विशिष्ट खबरदारी घेतलेली दिसते. एकूणच या भव्य, स्तीमित करणाऱ्या वास्तूदर्शनाचा अनुभव मानवी सांस्कृतिक संपन्नतेसह त्याच्या कलाकुसरीची, हस्तकौशल्याची जिवंत साक्ष देणारा... कलाविष्काराचा थायलंडचा हा वारसा कॅमेऱ्यात कैद करत आम्ही हॉटेलकडे रवाना झालो.
 

रात्रीस खेळ चाले...

 

पटायातील काही रस्ते, गल्लीबोळ हे फक्त रात्रीचं जागे होतात. सकाळी हेच रस्ते, हीच रात्री धुमाकूळ घालणारी ठिकाणं केवळ निर्जीव-निद्रिस्त होऊन पहुडलेली असतात. पण, सूर्य मावळतीला गेल्यावर हळूहळू पटायाच्या वातावरणातील वाढती नशा खुणावू लागते. रस्ते गजबजू लागतात. दुतर्फा पर्यटकांची गर्दी आणि मसाज पार्लरबाहेर उद्युक्त करणाऱ्या थाय मसाजर्सची रेलचेल... खाण्यापिण्याच्या चालत्या-फिरत्या स्टॉलसमुळे रस्त्यांवरही एक विशिष्ट सुगंध कायम दरवळलेला... रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेलमधून चालत आम्ही निघालो ते सुप्रसिद्ध ‘वॉकिंग स्ट्रीट’कडे. नावाप्रमाणे फक्त चालण्याचा आणि चालण्याचा रस्ता. कुठल्याही वाहनाला या रस्त्यावर ‘नो एन्ट्री.’ का? तर ते तिथे पोहोचल्यावरचं लक्षात येतं. खरं तर केवळ लोकांनी ओसंडून वाहणारा हा रस्ता. मुंबईत सकाळच्या वेळेस रेल्वे फलाटांवर गर्दी तुंबावी तशी पर्यटकांनी, आंबटशौकिनांनी, हौशेगौश्यांनी खच्चून भरलेला हा साधारण दीड-एक किमीचा रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला क्लब्स आणि बारच्या रांगाच रांगा... भारतीय पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी तिरंग्यासह जाहिरातबाजी करणाऱ्या ‘इंडियन’ बार आणि क्लब्सची संख्याही इथे कमी नाही. जाहिरात फलकांचा तर अगदी लखलखाट आणि कुठे पॉप म्युझिकचा ढाणढाण आवाज, तर कुठे गिटारवादकांच्या तालीवर नर्तिकांनी धरलेला ठेका... त्यातच पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यासाठीची एकच चढाओढ. पण, साहजिकच या सगळ्यात लक्ष वेधून घेतात त्या क्लब्सबाहेर ‘स्वत:च्या’ किंमतीचे फलक झळकावत पर्यटकांना शरीरसुखासाठी आमंत्रित करणाऱ्या वेश्या... अगदी तोकड्या कपड्यात शरीरप्रदर्शन करत आंबट हावभावांनी पुरुषांच्या नजरा चाळवणाऱ्या बिनधास्त मुली, महिला आणि लेडीबॉईजही. त्यांच्याकडे बघून त्यांच्या स्त्रीत्वाचा अंदाज बांधणे तसे कठीणच. त्यांची रोजचीच वेळ आणि रोजचीच जागा. हा रेडलाईट एरियाच, पण सर्वांसाठीच ग्रीन लाईट... या सगळ्या शरीरविक्रीच्या भाऊगर्दीत अगदी लहान, चेहऱ्यावर निर्विकार भाव असलेल्या थायलंड, म्यानमार, रशियातील अल्पवयीन मुलींना पाहून मन अगदी खिन्नं झालं. खरंच का यांना ‘वेश्या’ म्हणावं... बाहुलीशी खेळण्याच्या वयात याच मुली कुणाच्या तरी हातातील बाहुलं बनून रोज रात्री खुडल्या जात असतील. पण, केवळ आणि केवळ आर्थिक विवंचनेपोटी हे असलं जीणं त्यांच्या नशिबी आलेलं... थायलंडमधील प्रचंड गरिबी आणि बेकारीमुळे तेथील ग्रामीण भागांतूनही अनेक मुलींची पावलं आपसुकचं ‘वॉकिंग स्ट्रीट’कडे वळतात. कुटुंबाला पाळण्याची जबाबदारीही ही यांचीच आणि त्यातून काही उरलेच तर स्वत:साठी चार पैसे. विशेष म्हणजे, वेश्याव्यवसाय हा थायलंडमध्ये बेकायदेशीर असला तरी, खुलेआम केला जातो. पोलीसही या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्तासाठी हजर होतेच.पण, पर्यटकांसाठी, पोटापाण्यासाठी आणि एकूणच पटायासाठी वेश्याव्यवसायाला मरण नाही. तिथेच एक छोटेखानी रेस्टॉरंट गाठून मस्तपैकी थाय सलाडची आंबट-तिखट चव चाखली आणि ‘वॉकिंग स्ट्रीट’वरून माघारी फिरलो. पटायामध्येच सूर्य मावळतीला जाण्यापूर्वीचे ‘सँक्चुरी ऑफ ट्रूथ’चे सांस्कृतिक सत्यदर्शन आणि ‘वॉकिंग स्ट्रीट’वरचे आजचे वर्तमानातील मानवी जीवनाचे सत्य; दोन्हीचा अनुभव एकाच शहरात... एका दिवशी... जीवनाचा आणि सत्याचा असा हा विरोधाभास...

 

 

पटायामधील तिसरा दिवस उजाडला. मागील दोन दिवसांच्या अनुभवांनंतर जरा जास्तच नाश्ता करून आम्ही भटकंतीसाठी बाहेर पडलो. तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात होती तीन स्थळं. सुरुवात झाली ती पटाया फ्लोटिंग मार्केटपासून. नावाप्रमाणेच एक तरंगती बाजारपेठ... कपडे, शोभेच्या वस्तूंपासून ते अगदी खाण्यापिण्यापर्यंत सर्व काही... छोटे छोटे लाकडी पूल ओलांडत तरंगत्या बोटीत बसलेल्या विक्रेत्यांकडून वस्तूंच्या खरेदीचा हा बाजार. मिनी व्हेनिसच!! आम्हीही अशाच एका बोटीतून तरंगत्या बाजाराला प्रदशिणा घातली आणि सोबत थायलंडच्या आंबट-गोड आंबरसाचा आस्वादही लुटला. पण, पुढे बँकॉकला शॉपिंग करण्याचे निश्चित केल्यामुळे इथून फारशी खरेदी करण्याचा मोह टाळला.त्यानंतर फ्लोटिंग मार्केटपासून अगदी जवळच असलेल्या अंडरवॉटर वर्ल्डकडे वळलो. समुद्रातील जीवसृष्टी एका छताखाली इथे अनुभवायला मिळाली. १०५ मीटर लांबीच्या एका पारदर्शक बोगद्यातून रंगीबेरंगी माशांसह, शार्क माशांचेही अगदी जवळून दर्शन झाले. जणू आपण समुद्राच्याच तळाशी येऊनच समुद्रविहार करत आहोत, असा आभास निर्माण करणारी ही मानवनिर्मित समुद्रीदुनिया.. माशांबरोबर खेकडे, सरपटणारे प्राणीही इथे पाहायला मिळाले. एक ते दीड तास या समुद्रीजीवांना न्याहाळताना कसा जातो, ते अजिबात कळत नाही.
 

तिसरे आणि खरं तर पटायातील शेवटचे ‘डेस्टिनेशन’ म्हणजे पटाया स्काय टॉवर. पटायामधील सर्वात उंच अशी ७९० फूट उंच इमारत. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण पटायाचं दर्शन आपल्याला एका दृष्टिक्षेपात होतं. या इमारतीच्या ५२व्या, ५३व्या आणि ५४व्या मजल्यावर गोल फिरणारं रेस्टॉरंट आहे, तर ५५व्या मजल्यावरून अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी टॉवर जम्प, स्पीड शटल आणि स्काय शटल हे धाडसी प्रकार अनुभवण्यासाठी हौशी पर्यटकांची भरपूर गर्दी जमते. टॉवरच्या शेवटच्या मजल्यावरून पटायाचं नयनरम्य दृश्य डोळ्यांत आणि कॅमेऱ्यात कैद करून आम्ही स्काय शटल म्हणजे इमारतीवरुन हळूहळू खाली येणाऱ्या बंद लिफ्टने उतरलो. समोरच्या जॉमेटन बीचवर मस्त फेरफटकाही मारला. तिथेच एक मराठी, पुणेरी दाम्पत्यही भेटले. त्यांच्या मुलाची कामानिमित्त बदली पटायात झाल्यामुळे ते त्याच्यासोबत काही दिवस राहायला आले होते. त्यामुळे भारतीय आणि त्यात मराठी कुटुंबाशी मस्त अर्धा तास समुद्रकिनारी गप्पा रंगल्या. आपल्या देशापासून हजारो किमी दूर असं ‘आपलं’ कुणीतरी भेटल्याचा अनुभव विलक्षण सुखावणारा होता. तोवर सूर्याची मावळतीची तयारी सुरु झाली होती. मग तसं आम्हीही गाडीने परत हॉटेलकडे वळलो. कारण, सामान पॅक करायचे होते... कारण, या थायलंड टूरचा एक टप्पा संपला होता आणि बँकॉकचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार होता. पटायाचे अनुभव मनात कैद करुन बँकॉक कसं असेल, याच्या चर्चांमध्येच डोळे कधी मिटले, ते कळलंच नाही...

 

बँकॉक कॉलिंग...

 

सकाळी ९ वाजता बँकॉकसाठी एसी गाडीतून पटायाहून प्रस्थान केलं. बँकॉक-पटाया हायवेवरून प्रवास सुरू झाला. साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर आपण एका मोठ्या शहरात प्रवेश केल्याची प्रचिती आसपासच्या आकाशाला भिडणाऱ्या इमारती पाहून आलीच. मोठमोठे प्रशस्त रस्ते, जागोजागी पूल, स्काय ट्रेनची स्टेशन्स आणि मॉल्सची भाऊगर्दी... पटायापेक्षा अगदी दुप्पट-तिप्पट रेलचेल... एका आंतरराष्ट्रीय मेट्रोपॉलिटन शहराची गती बँकॉकमध्ये प्रवेश करताच अनुभवायला मिळाली. म्हणजे पटाया हे भारतातील गोवा म्हणा तर... संथ, मनमौजी आणि बँकॉक हे मुंबईसारखंच धावतं, रात्रभर जागणारं व्यापार आणि पर्यटनाचं मुख्य केंद्र. थायलंडच्या विकासाचा, आर्थिक प्रगतीचा केंद्रबिंदू, राजधानी बँकॉक. चाओ फर्या नदीच्या किनारी वसलेलं हे सुंदर शहर. पंधराव्या शतकात अयुथ्या साम्राज्यात व्यापारकेंद्र म्हणून बँकॉक नावारुपाला आलं. त्यानंतर सातासमुद्रापारहून बँकॉकमध्ये व्यापार्‍यांचा ओघ वाढतच गेला आणि थायलंडच्या आर्थिक-राजकीय-सामाजिक क्रांतीचे शहर म्हणून बँकॉक उदयास आले. १९६० ते १९८०च्या दरम्यान बँकॉकमध्ये आमूलाग्र बदल झाले. १९९९ साली स्काय ट्रेन, त्यानंतर अंडरग्राऊंड रेल्वे, एअरपोर्ट रेल लिंक, बीआरटी बस सेवा आणि नदी-कालव्यांतील जलवाहतुकीनंतरही बँकॉकची ट्राफिक समस्या काही कमी झालेली नाही. त्यातच खाजगी वाहनांची प्रचंड वर्दळ वायुप्रदूषणात भर घालते. त्यामुळे बँकॉकमध्ये फिरताना आम्ही पायी चालणे आणि स्वस्त-मस्त स्काय ट्रेनचा पर्याय स्वीकारला. ‘हॉटेल सिलोम सिटी’ने दिलेला बँकॉकचा नकाशा नीट पाहिला. तो अर्धा तास संपूर्णपणे समजून घेतला. त्यानंतर बँकॉकच्या सर्वात मोठ्या एमबीके मॉलमध्ये जाण्याचं ठरलं. त्यासाठी हॉटेलपासून पंधरा मिनीटं पायी चालत चाँग नॉन्सी हे स्काय ट्रेनचं स्टेशन गाठलं. तिकीट घेण्यासाठी वेन्डिंग मशीनमध्ये पैसे टाकले आणि तिकीट हातात. लांबच लांब रांगांची कटकट नाही की सुट्ट्यांची चणचण. अवघ्या १५ मिनिटांत नॅशनल स्टेडियम या शेवटच्या स्टेशनवर उतरलो. विशेष म्हणजे, स्टेशनची एक एक्झिट ही थेट मॉलच्या आतमध्येच घेऊन जाते. म्हणजे, जिने उतरा, रस्ता ओलांडा याची कटकटच नाही. एमबीके मॉल थायलंडमधील आकारमानाच्या बाबतीत १६व्या क्रमांकाचा मॉल असला तरी, अडीच हजारांपेक्षा जास्त छोटी-मोठी दुकानं या मॉलमध्ये घर करून आहेत. आठ मजल्यांच्या या मॉलमध्ये कपड्यांपासून ते अगदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सगळं काही अगदी सहज उपलब्ध. खादाडी झाल्यानंतर मस्तपैकी शॉपिंग सुरू केलं. सुती कपडे, शोभेच्या वस्तू, लाकडाचे शोपिसेस, तेलाचे वेगवेगळे सुगंधी प्रकार, मेकअपचे साहित्य, साबण आणि या सगळ्यात हत्तीची विविध रुप हे थायलंडच्या शॉपिंगचं वैशिष्ट्य. घासाघीस करून स्वस्त आणि मस्त माल उचलण्यासाठी आम्ही अख्खा मॉल पालथा घातला. पाय दुखत होते तरी खरेदीची भूक काही संपत नव्हती. अखेर रात्रीचे जेवण उरकूनच मॉलमधून निघालो आणि पुन्हा स्काय ट्रेननेच हॉटेल गाठले. या मॉलचे इलेक्ट्रॉनिक सेक्शन तेवढे शेवटच्या दिवशी मुद्दाम फिरण्यासाठी राखीव ठेवले.

 

 

दुसऱ्या दिवशी अगदी वेळेत चालकासह गाडी हॉटेलच्या दारात उभी. वेळ पाळण्याच्या बाबतीत थायलंडवासी अगदी काटेकोर. ‘सफारी वर्ल्ड’च्या सफरीवर आम्ही निघालो. शहरापासून बऱ्यापैकी लांब असलेल्या सफारीपर्यंत पोहोचायलाच बँकॉकच्या ट्राफिकमधून जवळपास दोन तास लागले. ट्राफिकमध्ये दिलासा एकच की, कर्णकर्कश हॉर्नने कानठळ्या बसल्या नाहीत. अखेरीस ‘सफारी वर्ल्ड’मध्ये चालकाने दिलेलं तिकीट घेऊन दाखल झालो. सफारीचा नकाशा बघितला आणि एवढ्या वेळात एवढे कसे काय फिरुन होणार, हाच प्रश्न पडला. पटापट पावलं टाकतं सगळचं बघायचं ठरलं. आमचे स्वागतच काकाकुवा आणि शेकडो रंगीत पोपटांनी केले. पुढे मोठमोठ्या प्रशस्त पिंजऱ्यात ठेवलेले प्राणी, पक्षी, सुस्त पडलेल्या मगरी पाहून आम्ही मोस्ट अवेटेड डॉल्फिन शो आणि एलिफंट शोकडे वळलो. डॉल्फिनच्या पाण्यातील आणि पाण्याबाहेरच्या जलक्रीडा पाहून बुद्धीमान डॉल्फिनसह त्यांच्या प्रशिक्षकांची दाद द्यावी तितकी कमीच. डॉल्फिनइतकेच मन लावून फुटबॉल खेळणारे हत्तीही तितकेच स्मार्ट! सफारीतील हे पार्क फिरल्यानंतर मग पुन्हा गाडीत बसून खऱ्याखुऱ्या जंगल सफारीकडे वळलो. पर्यटकांनी भरलेल्या बस, गाड्या नागमोडी वळणे घेत हळूहळू पुढे सरकत होत्या. आसपास मुक्तसंचार करणारे प्राणी, पक्षी अनुभवता येणारी ही अनोखी सफारी होती. जिराफ, गेंड्यांपासून, वाघ-सिंहांपर्यंत सगळ्या प्राण्यांची त्यांच्या नैसर्गिक आवासात असल्यासारखी चोख व्यवस्था...विनाकारण हॉर्न वाजवून, गोंधळ करून कुठेही सफारीतील नैसर्गिक शांततेचा भंग होईल, असे कृत्य नाही. खासकरून प्राण्यांचं, जंगलांचं व्यवस्थापन किती उत्तम आणि नैसर्गिकरित्या आपण करू शकतो, याचं आदर्श उदाहरणच. एका तासांच्या या सफारीनंतर मग हॉटेलकडे पुन्हा प्रयाण केले. परतीच्या प्रवासातही तेवढेच ट्राफिक. हॉटेलमध्ये पोहोचेतोवर रात्रीचे ८ वाजले. मग बाहेर जायचा कंटाळा करत आमच्याच हॉटेलमध्ये चार घास खाऊन झोपी गेलो. कारण, बँकॉकमधील तिसरा दिवस भरपूर महत्त्वाचा आणि ‘टेम्पल टूर’चा होता.
 

 

सकाळी ठीक ८ वाजता हॉटेलच्या दारात चालकासह गाडी दाखल झाली आणि एक सुखद धक्काच बसला. कारण, आमच्या गाडीत एक मध्यमवयीन महिला गाईडही मार्गदर्शनासाठी टूर एजन्सीने सेवेत हजर केली होती. निता तिचं नाव... अत्यंत मृदूभाषी आणि जुजबी इंग्रजी बोलणारी आणि उत्तरं देणारी. बँकॉकच्या या ‘टेम्पल टूर’मध्ये निताची प्रचंड मदत झाली. मंदिरांचे, वास्तूंचे ऐतिहासिक संदर्भ तिला सवयीनुसार अगदी तोंडपाठ होते. तिच्या म्हणण्यानुसार, एकट्या बँकॉकमध्ये ४०० पेक्षा जास्त मंदिरं आहेत. त्यांना ‘वॅट’ असे म्हटले जाते. कारण, कुठलाही चक्री राजा युद्ध जिंकायचा अथवा राजघराण्यात काही शुभकार्य असायचे, मग त्यानिमित्त बुद्ध मंदिरांची उभारणी केली जायची. म्हणूनच, बँकॉकला ‘मंदिरांचे शहर’ म्हणूनही ओळखलेजाते. सर्वप्रथम १४ कॅरेट सुवर्णमूर्ती असलेल्या बुद्धांच्या पांढऱ्याशुभ्र संगमरवराच्या मंदिरात प्रवेश केला. बुद्धाची साडेपाच टनांची आणि ९.८ फूट उंच प्रसन्न सुवर्णमूर्ती भूमीस्पर्श मुद्रेत विराजमान होती. असे म्हणतात की, ही मूर्ती तेराव्या किंवा चौदाव्या शतकातील असून ती सोन्याची आहे, हे कळण्यासाठी एकोणिसावे शतक उजाडावं लागलं. कारण, या मूर्तीला प्लास्टरने आच्छादित केले होते आणि एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात नेताना मूर्ती अचानक पडली आणि प्लास्टरचे तुकडे झाले. त्यानंतर आतील सुवर्णमूर्ती पाहून सर्वांना धक्काच बसला. कदाचित परकीय आक्रमक आणि लुटारूंच्या नजरेतून संरक्षणासाठी ही क्लुप्ती वापरण्यात आली असावी. या मंदिरानंतर बँकॉकच्या चाओ फर्या नदीतून फेरीबोटीने एक टोकाहून दुसरे टोक गाठले, ते सुप्रसिद्ध ‘वॅट अरुण’ या भव्यदिव्य मंदिराच्या दर्शनासाठी... पॅगोडा किंवा स्तुपासारखा २८६ फूट उंच सुंदर कलाकुसरीने नटलेला हा मुख्य मिनार आणि त्याच्या चारही दिशांना तसेच चार छोटे मिनार. सतराव्या शतकात बांधलेल्या या मंदिराला ‘अरुण’ अर्थात सूर्यदेवाच्या नावाने ओळखले जाते. हिंदू धर्मकथांसह चिनी आणि स्थानिक शिल्पचित्रांचा प्रभाव या मंदिरात पाहायला मिळतो. संध्याकाळच्या वेळी पांढरेशुभ्र मंदिर विविधरंगी विद्युत रोषणाईने अगदी उजळून निघते. त्यानंतरचे ‘वॅट बेन’ हे मंदिरही तितकेच अप्रतिम. १८९९ साली इटालियन संगमरवरी दगडातून चिनी-मंगोली स्थापत्त्यशैलीत उभे असलेले हे मंदिर ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गणले जाते. सुखोथाय शैलीतील एक प्रसन्न बुद्धमूर्ती १९२० साली इथे स्थापित करण्यात आली आणि त्याशिवाय इतर बुद्धाच्या ५२ विविध मुद्रांमधील मूर्ती इथे पाहायला मिळतात. पण, अखेरीस तो क्षण आला ज्याची आम्हालाप्रतीक्षा होती. निद्रावस्थेतील बुद्धदर्शनाची. ‘वॅट फो’ या प्राचीन मंदिरात बुद्धाची उजव्या हातावर डोकं ठेवून निजलेली ४६ मीटर लांबीची आणि १५ मीटर उंचीची आडवी भव्य प्रसन्न मूर्ती. गौतम बुद्धांच्या शिष्यांनी त्यांच्या निर्वाणापश्चात १० वर्षांनंतर याच मंदिरात सर्वप्रथम ही बुद्धाला झोपलेल्या अवस्थेत दाखवणारी मूर्ती उभारली आणि आज जगभरात या शैलीतील भरपूर मूर्ती दिसतात. या मूर्तीच्या तळपायांवर बुद्धाला चिन्हांकित करणाऱ्या १०८ अशा विविध गोष्टींचे चित्रण करण्यात आले असून दोन्ही तळपायांच्या मधोमध चक्र असून ते ऊर्जेचे केंद्र असल्याचा संदेश देते. थायलंडमधील हे स्थळ सर्वात जुने विद्यापीठ आणि थाय मसाजचे धडे देणारे केंद्र मानले जाते. त्यानंतर आम्ही वळलो ते थायलंडच्या राजेशाही महालाकडे अर्थात, ग्रँड पॅलेसकडे. 
 

ग्रँड पॅलेस अगदी नावासारखा ‘ग्रँड.’ चाओ फर्या नदीच्या किनारी रामा पहिला या चक्री साम्राज्यातील पहिल्या सम्राटाच्या कालखंडात १७७२ साली या महालाचे बांधकाम सुरू झाले. कारण, राजाने त्याची राजधानी थोनबुरी येथून बँकॉकला हलविली. १९२५ पर्यंत रामा आठवा हा या महालात राहणारा शेवटचा चक्रीसम्राट. त्यानंतर रामा नववा आणि विद्यमान रामा दहावा यांनी बँकॉकच्या ड्युसिट महालातील आलिशान आवासात आपला मुक्काम हलविला. १९२५ पर्यंत राजाचे निवास, न्यायालय आणि सगळी शासकीय कार्यालयं याच परिसरात होती. पण, कालांतराने सगळी शासकीय कार्यालयेही या महालाच्या आवारातून बाहेर पडली. आज ग्रँड पॅलेस हे एक मोठे म्युझियम असून येथील काही इमारतींमध्ये अजूनही सामान्यांसाठी प्रवेश निषिद्धच आहे. तसेच वर्षातून एकदा राजेशाहीशी निगडित उत्सव-धार्मिक विधी इथेच संपन्न होतात. सुवर्णवस्त्र धारण केलेली हिरव्या पाचूंची २६ इंचांची योगमुद्रेतील बुद्ध मूर्ती हे या पॅलेसचे एक खास आकर्षण. कारण, ही ‘एमेरोल्ड’ अर्थात हिरव्या पाचूची मूर्ती हे थायलंडचे ‘पॅलेडियम’ अर्थात राष्ट्राला प्रभावी सुरक्षा प्रदान करणारे, सुरक्षित ठेवणारे चिन्ह म्हणून मानले जाते. त्यामुळे साहजिकच येथील म्युझियम, शाही इमारती आणि पाचूची बुद्धमूर्ती पाहण्यासाठी एकच झुंबड उडालेली दिसते. ग्रँड पॅलेसच्या फेरफटक्यानंतर निताने आमचा निरोप घेतला. तिचे आभार मानत आम्ही आता मेणांच्या पुतळ्याचे ‘मादाम तुसा’ आणि ‘सियाम ओशन वर्ल्ड’कडे निघालो. खरं तर दोन्ही ठिकाणं बघण्यासाठी पुरेसा वेळही नव्हता. कारण, साधारण रात्री ८ वाजेपर्यंत दोन वेगवेगळ्या मॉल्समध्ये वसवलेली एक मेण्यांच्या पुतळ्यांची, तर एक समुद्रीजावांची दुनिया पाहायची म्हणजे प्रत्येकी दोन तास तरी हवेच. तेव्हा, चालकाला परत पाठवून आम्ही एक-एक तासात ही दोन्ही स्थळे धावत्या नजरेत भरून घेतली. मोदी, ओबामा, पुतीन पासून ते अमिताभ बच्चनपर्यंत अनेक देशीविदेशी हस्तींचे मेणाचे ७० पेक्षा जास्त पुतळे बँकॉकच्या मादाम तुसा संग्रहालयात विशेष लक्ष वेधून घेतात. काही पुतळे तर इतके हुबेहूब आहेत की, वास्तवात ही व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी असल्याचा भास व्हावा. तिथेच मग ‘आईसएज-४’ ‘फोर डी’मध्ये पाहण्याचीही, खरे तर अनुभवण्याची संधी मिळाली. चलचित्रांप्रमाणे हलणाऱ्या खुर्च्या, थंडगार बर्फवृष्टीचा डोळ्यांवर चष्मा पाहण्याची मज्जाच काही और... त्यानंतर पटायासारखेच जलचरांचे जीवन जवळून अनुभवण्याची संधी बँकॉकमध्येही ‘सियाम ओशन वर्ल्ड’च्या निमित्ताने मिळाली आणि हा थायलंडमधील पर्यटनाचा हा शेवटचा टप्पाही यशस्वीरित्या पार पडला.

 

 

थायलंडमध्ये अखेरच्या म्हणजेच सातव्या दिवशी रात्री मुंबईसाठी विमान असल्याने दिवसभर पुन्हा एमबीके मॉल फिरून इलेक्ट्रॉनिक विभागात मनसोक्त भटकलो. कारण, इथे सगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणं भारतापेक्षा अगदी किफायतशीर दरात मिळतात. प्रत्येकी एक मोबाईल विकत घेऊन आम्ही थायलंडच्या आठवणींच्या संचितानिशी पुन्हा मुंबईकडे रवाना झालो.अशा या थायलंडसारख्या देशात संस्कृतीचे जुने-नवे सगळे रंग उलगडता आले. लोकांचं अदबशीर वागणं, फूटपाथवरूनचं शिस्तीत चालणं, सिग्नल न तोडता ओळीत वाहनं हाकणं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेचा काटेकोरपणा इथे पदोपदी जाणवला. त्यामुळे प्राचीन संस्कृती आणि आधुनिक शहरी संस्कृती यांचा मिलाफ अनुभवायला ‘अमेझिंग थायलंड’ला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@