अक्कल कधी येणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018   
Total Views |



काँग्रेसला अक्कल आली पाहिजे की, संघाचा विरोध करणे म्हणजे हिंदू समाजाचा विरोध करणे आहे. संघाचा विरोध करणे म्हणजे हिंदू जीवनमूल्यांचा विरोध करणे आहे आणि संघाचा विरोध करणे म्हणजे हिंदू विचारधारेचा विरोध करणे आहे. पाण्यात राहून माशाशी वैर केले, तर जीव गमविण्याची पाळी येते. ज्या देशातील हिंदू समाज आता राजकीयदृष्ट्या जागरूक झाला आहे, मतदान करताना तो हिंदूहिताचे रक्षण करणारे कोण आणि भक्षण करणारे कोण याची मोजदाद करतो, त्या हिंदू मतदाराला गाढवासारखी लाथ मारून आपण निवडणूक रिंगणातील खरोखरच गाढव आहोत, हे दाखवून देण्यात कसली अक्कल आहे.


“मेल्या! तुला अक्कल कधी येणार?” असे एखादे आई आपल्या मुलाविषयी वैतागून म्हणते. जेव्हा मुलगा किंवा मुलगी त्याच त्याच चुका वारंवार करीत राहते, तेव्हा मुलाची किंवा मुलीची कानउघडणी करण्यासाठी हे बोल आईच्या मुखातून बाहेर पडतात. काही मुले सुधारतात, तर काही मुले सुधारणेच्या पलीकडे गेलेली असतात. त्यांना कितीही सांगा, पालथ्या घड्यावर पाणी! गाढवापुढे वाचली गीता, गाढव म्हणतो-कालचा गोंधळ बरा होता, अशी यांची स्थिती असते. मुलाच्या जागी आपण काँग्रेसला आणूया आणि आईच्या जागी आपण भारतमातेला आणूया. मध्यप्रदेश निवडणुकीतील काँग्रेसचा जाहीरनामा वाचल्यानंतर, भारतमाता काँग्रेसचा कान धरून प्रश्न करील, “मेल्या! तुला अक्कल कधी येणार?” २०१४ पासून प्रत्येक निवडणुकीत तू आपटी खात चालला आहेस. केंद्रात सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, सर्व ठिकाणी लोकांनी लाथा घातल्या आहेत आणि तरीही गाढवाचा गोंधळ चालूच आहे. आता हे उकिरड्यावरचे लोळणे बंद करा.” काँग्रेसने जाहीरनाम्यात सार्वजनिक जागेवर संघ शाखांवर बंदी घालू, सरकारी कार्यालयात शाखा भरवू देणार नाही, सरकारी कर्मचाऱ्यांना संघात जायला बंदी घालू, अशा प्रकारची मुक्ताफळे उधळली आहेत. या मध्यप्रदेशमध्ये १९३२च्या सुमारास संघावर पहिली बंदी घालण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा सरकार काँग्रेसचे होते. डॉ. हेडगेवारांनी बंदीचा डाव त्यांच्यावरच उलटविला. त्या मध्यप्रदेशात आता दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री संघस्वयंसेवक आहेत, अनेक मंत्री संघस्वयंसेवक आहेत, ते आकाशातून पडलेले नाहीत. ते जनाकाशातून आलेले आहेत. लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे. ते संघस्वयंसेवक आहेत, याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. ही मान्यता मध्यप्रदेशात गेल्या २५-३० वर्षांपासूनची आहे. अशा मध्यप्रदेशात निवडणूक जाहीरनाम्यात संघाविरुद्ध गरळ ओकण्याचा गाढवपणा राहुल गांधीची काँग्रेसच करू शकते.

 

आधी होती दासी। पट्टराणी केली तिसी। तिचे हिंडणे राहिना। मूळ स्वभाव जाईना।

 

नेहरु-गांधी घराण्याचा स्वभाव संघाचा पराकोटीचा द्वेष करण्याचा आहे, हिंदू विचारधारेचा द्वेष करण्याचा आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी अनुद्गार काढले हे आपण जाणतोच. हा द्वेष करण्यासाठीच नेहरु-गांधी घराण्यात दिवटे जन्मतात. परंतु, त्याचा उपयोग सत्ता मिळविण्यासाठी शून्य आहे. हे १९७७च्या निवडणुकीपासून टप्प्याटप्प्याने प्रस्थापित होत गेले आहे. २०१४साली तर काँगे्रसची अब्रू घालविणारा पराभव झाला. ज्या काँग्रेसचे एकेकाळी ४००हून अधिक खासदार लोकसभेत असत, त्यांची संख्या आता ५४ झाली. अंगावर भरजरी वस्त्रे आणि हिऱ्यामाणक्यांची दागिने घालणारी राणी फाटक्या वस्त्रात आली. तरीसुद्धा अक्कल येत नाही. अक्कलदाढ कुठे गेली, काही समजत नाही. एक काळ असा होता की, संघाविषयीचे भय मुसलमानांच्या मनात निर्माण करता येत होते. संघ वाढला की तुम्ही संपलात, हे मुसलमानांना सांगितले जाई. भाबड्या मुसलमानांना ते खरे वाटे आणि ते काँग्रेसच्या मागे उभे राहत, असे दीर्घकाळ चालले. गाढवाच्या मागे उभे राहिले, तर कधी ना कधी गाढवाची लाथ खावी लागते. मुसलमानांना अशा काँग्रेसच्या लाथा बसल्या. ते आर्थिक विकासात मागे पडले, शिक्षणात मागे पडले, जीवनाच्या स्पर्धेत मागे पडले, समाजसुधारणेत त्यांची पीछेहाट झाली, त्यांची प्रतिमा कट्टर धार्मिक आणि जिहादी अशी झाली. काँग्रेसच्या मागे गेल्याचे हे फळ त्यांना मिळाले. आता मुसलमानांना खूश करण्यासाठी संघाला शिव्या देण्यात काही उपयोग नाही. हे असे काम झाले की गावातील आंब्याला चांगली फळे यावी म्हणून आपल्या कुंडीतील आंब्याला पाणी आणि खत घालण्यासारखे आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या दिल्लीच्या भाषणात स्वच्छ शब्दांत सांगितले की, “आम्ही मुसलमानांना वगळीत नाही. मुसलमानांना बरोबर घेऊ इच्छितो आणि त्यांना सन्मानाने वागवू इच्छितो.” संघाची प्रतिमा ‘जे बोलू ते करू’ अशी असल्यामुळे आणि ती सर्व लोकांना माहीत असल्यामुळे आणि त्यात मुसलमानही आले. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा परिणाम मुसलमानांच्या दृष्टीने शून्य आहे. निवडणुकीतील पराभवानंतर अॅण्टोनी कमिटी बसविली गेली, तिने काँग्रेसच्या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. तिने एक कारण दिले की, काँग्रेसची प्रतिमा हिंदूविरोधी झाली आहे म्हणून हिंदू मतदार काँग्रेसपासून दूर गेला. संघ म्हणजे हिंदूहित, संघ म्हणजे हिंदूचेतना, संघ म्हणजे हिंदू अस्मिता, संघ म्हणजे हिंदू तेजाचा हुंकार, हिंदू हितरक्षणासाठी संघ समर्पित आहे, तेच त्याचे जीवनकार्य आहे आणि तोच त्याचा श्वाच्छोश्वास आहे, ही गोष्ट सर्व हिंदू समाजाला माहीत आहे. जे स्वत:ला ‘हिंदू’ म्हणून घेण्यात गर्व करतात त्यांना माहीतच आहे आणि जे लाजतात, बुजतात, कचरतात त्यांनादेखील माहीत आहे. असे हिंदूपण जगणाऱ्या संघाला शिव्या घालून आणि त्याच्याशी शत्रुत्व करून अॅण्टोनी रिपोर्टवर उतारा शोधणार आहे की, काँग्रेस आणखी उतरत्या कळेकडे जाणार आहे. कधी अक्कल येणार, हा प्रश्न आ वासून उभा आहे.

 

मध्यप्रदेशात गावोगावी संघ पोहोचलेला आहे. नुसता गावोगावीपोहोचलेला आहे असे नाही, तर वनवासी भागात वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून पाड्यापाड्यावर संघ पोहोचलेला आहे. विद्याभारतीच्या शेकडो शाळा मध्यप्रदेशात आहेत. त्यात लाखो विद्यार्थी येतात. या सर्व शाळांतून उत्तम शिक्षण दिले जाते. विद्याभारतीची शिक्षण संकुले मध्यप्रदेशात शेकड्याने असतील, एवढा अफाट जनसंपर्क एका संस्थेच्या माध्यमातून होतो. काँग्रेस त्याच्याशी कशी टक्कर देणार? यावेळी ‘डॉन क्विकझोट’ ही कादंबरी आठवते. सांचोपांझा हा त्याचा सेवक आहे. दोघे मिळून एकांडे शिलेदार बनून पराक्रम करायला बाहेर पडतात आणि नंतर काय काय गंमती होतात, ते कादंबरीतच वाचले पाहिजे. मध्यप्रदेशच्या निवडणुकीत ही ‘डॉन क्विकझोट’ची फलटण उतरवली आहे का? ‘डॉन क्विकझोट’च्या कादंबरीत पवनचक्कीला राक्षस समजून तिच्याशी लढाई करण्याचा एक प्रसंग आहे. असे हे काँग्रेसचे ‘डॉन क्विकझोट’ पवनचक्कीशी लढायला निघाले आहेत. यांना कधी अक्कल येणार? निवडणुका जिंकण्यासाठी संघाला शिव्या घालण्याचा काही उपयोग नाही, तो घाट्याचा धंदा आहे. संघाच्या शक्तीशी तुलना करता काँग्रेस आखाड्यातील लकडी पैलवान आहे. रामायणामध्ये अंगदाच्या शिष्टाईचा प्रसंग आहे. रावण अंगदाला किंमत देत नाही. राजदूताशी गैरव्यवहार करतो. त्याला पकडण्याची आज्ञा देतो. अंगद दरबारामध्ये प्रचंड रूप धारण करतो आणि आपला पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा राहतो. “ज्या कुणाची हिम्मत असेल त्याने माझा पाय हलवून दाखवा,” असे म्हणतो. ‘चरण अंगदने रखा है। आ इसे कोई हटाये।’ संघाचा पायच काय, पण एक बोट हलविण्याचीदेखील काँग्रेसची ताकद नाही. म्हणून नसत्या वल्गना करणे सोडून दिले पाहिजे. काँग्रेसला अक्कल आली पाहिजे की, संघाचा विरोध करणे म्हणजे हिंदू समाजाचा विरोध करणे आहे. संघाचा विरोध करणे म्हणजे हिंदू जीवनमूल्यांचा विरोध करणे आहे आणि संघाचा विरोध करणे म्हणजे हिंदू विचारधारेचा विरोध करणे आहे. पाण्यात राहून माशाशी वैर केले, तर जीव गमविण्याची पाळी येते. ज्या देशातील हिंदू समाज आता राजकीयदृष्ट्या जागरूक झाला आहे, मतदान करताना तो हिंदूहिताचे रक्षण करणारे कोण आणि भक्षण करणारे कोण याची मोजदाद करतो, त्या हिंदू मतदाराला गाढवासारखी लाथ मारून आपण निवडणूक रिंगणातील खरोखरच गाढव आहोत, हे दाखवून देण्यात कसली अक्कल आहे. म्हणून पुन्हा म्हणावेसे वाटते की, ‘मेल्या! तुला अक्कल कधी येणार?’

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@