सुरगाणा-दिंडोरीतील वनवासींचे अनोखे विश्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018   
Total Views |


 


वनवासी जीवन हे मूलतः निसर्गाशी मानवी जीवनाचे द्योतक सांगणारे. वनवासी बांधव म्हणजे ‘आदि’वास असणारा मानवी समुदाय. ते खरे जंगलाचे राजे. सिंहासारखी निर्भिडता ही त्यांच्या अंगी जोपासली गेली आहे. विपरीत परिस्थितीतही अस्तित्व टिकविण्याची त्यांची लढाई हेच त्यांच्या समृद्धतेचे गमक. निसर्ग त्यांचा अन्नदाता. त्यामुळे तोच त्यांचा आद्य परमेश्वरदेखील. वनवासी जीवनाचे हे वैशिष्ट्य अधोरेखित करण्याचे प्रयोजन इतकेच की, नुकतीच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा व दिंडोरी या ठिकाणी वनवासी जीवनाचा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी मिळाली. या अभ्यास दौऱ्यातून येथील वनवासी जीवनाचे भावविश्व जवळून न्याहाळता आले. त्याचाच शब्दबद्ध केलेला हा अनुभव...

 

सुरगाणा व दिंडोरीतील वनवासींशी अगदी सहज संवाद आणि आणि आत्मीयतापूर्ण सहवास अनुभवता आला. भेटीच्या सुरुवातीला अगदी परके असणारे आपण व वनवासी बांधव पुढील पाच मिनिटांत आपले सगेसोयरे कधी होतो, हेच काळत नाही. ही कमाल अतिथीची नाही तर यजमानाची आहे, हे अगदी सहजपणे आपल्या लक्षात येते. माणसाला जिंकणे म्हणजे काय आणि माणूसपण म्हणजे काय ते इथे आल्यशिवाय अनुभवता येणे शक्यच नाही. स्वभावातील ही समृद्धता त्यांच्या ठायी ही बहुदा निसर्गातूनच आली असावी. तिथल्या बोलीभाषेत सांगावयाचे झाले तर, वनवासी हातावरची भाकर आणि अंगावरची चादर देण्यास कायमच मनस्वी तयार असतो आणि तेही अनिच्छेने नव्हे, तर आनंदाने. सुरगाणा आणि दिंडोरी या दोन्ही तालुक्यांत विकासाचे अस्तित्व ठायीठायी जाणवते. पालाची घरे ही तुलनेने कमी असून पक्क्या घरांची म्हणजे किमान विटांचे बांधकाम असणाऱ्या घरांची संख्या बहुतांश. नोकरी असली तरी शेती आणि पशुपालनाकडे येथील वनवासी अजूनही झुकलेला. त्याच्या सांसारिक गाडीचा तोच एक्सल आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिक्षित समाजातदेखील काही ठिकाणी स्त्रीबद्दल असणारी हीनता येथे अभावानेही जाणवत नाही. येथील स्त्रिया क्रियाशील, पुरुषसत्ताक पद्धती येथे नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यात कामाची विभागणी त्यांच्यातील परस्पर प्रगल्भतेचे दर्शन घडविते. गरिबी असली तरी दारिद्य्र नाही. येथील लहान मुले संपूर्ण कपडे परिधान केलेली. वेणीफणी केलेली अगदी नीटनेटकी. आपण साधारणतः वनवासी म्हटले की, अनवाणी पायाने चालणारा असेच गृहीत धरत असतो. मात्र, येथील वनवासी बांधव पायात चप्पल, बूट घालूनच वावरतात. पालक जरी अशिक्षित असले तरी, ते आपल्या पाल्यांच्या शिक्षणाप्रती सजग आहेत. गरिबी असली तरी त्यांनी परिवेशाशी समायोजन साधलेले दिसते. त्यांच्या मानसिकतेला त्यांनी भौतिकतेशी जुळवून घेतल्यामुळे त्यांचे जीवनमान गतिशील आहे, संघटित आहे, हेच त्यांच्या आनंदी जीवनाचे गमक. तुम्हाला शहरात यावेसे वाटत नाही का? असे विचारल्यावर येथील ७५ वर्ष वयाचे वनवासी धनाजी आबाजी पवार नकारार्थी मान डोलवत ठामपणे ‘नाही’ असे उत्तरले. त्याचे कारण विचारल्यावर ते सांगतात की, “माझ्या वयाचा तुमच्या शहरातील म्हातारा आयुष्यात कोणतेही औषध न घेता एवढा जगता का?, पाच कोस दूर जाऊन हंडाभर पाणी आणता का? त्याची तर कवाच मूठ मारली (हृदयविकाराचा झटका) आसा.” त्यांचे हे उत्तर आपल्याला नक्कीच अंतर्मुख करते आणि यातून जाणवते की, त्यांचे म्हणून एक विश्व आहे. ते त्यात तन-मन-धनाने पूर्णतः रमलेले. याच धनाजी पवारांच्या एका कार्याचे अप्रूप वाटते. ते म्हणजे, ते गेली २० वर्ष रोज रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या पांथस्तांना पिण्याचे पाणी मोफत वाटतात. तसे पाहिले तर हे काम आपल्याला खूप सोपे आणि सहज वाटेल. पण, केवळ लोकसेवेसाठी वयाच्या ७५व्या वर्षी पाच कोस दूर अंतरावरून ते डोक्यावर हंडा भरुन पाणी आणतात. त्या उलट पाणपोईवर एक पेला दान केला म्हणून नाव कोरणारेही समाजात काही दिग्गज असतात. पण पवारांना त्यांच्या या कार्याचे काहीच अप्रुप नाही. यावरून येथील वनवासी समाजाचा दातृत्व हा गुण दिसून येतो.


 

 

साप, वाघ, बिबटे, तरस हे तर येथील जीवनाचे अविभाज्य घटक. यांच्याशी आपला सामना होणार, ही वनवासी बांधवांनी मनाशी अगदी खूणगाठ मारून ठेवलेली. येथील केशव तर शालेय जीवनातच वाघांशी सामना करून मोकळा झाला. शाळेतून येताना त्याला वाघीण आडवी आली. तिने त्याच्या दिशेने झेप घेतली, तर या पठ्ठ्याने तिचे दोन्ही पंजे हातात धरून तिला खाली दरीकडे ढकलले. ऐकतानाही अंगावर काटा यावा, असा हा प्रसंग त्याने अनुभवला. यातून येथील वनवासींची चपळता आणि सजगता अधोरेखित होते. वनवासी म्हटला की, त्याला भोवतालच्या जगातील काहीही माहीत नाही, असा अनेकंचा समज असणे तसे अगदी स्वाभाविक. मात्र, शांता पांडुरंग गावित या आपला हा समज धादांत खोटा ठरवितात. त्यांनी सरकारी योजनेतून आपल्या शेतात शेततळे खोदले आहे. त्यासाठी त्यांनी त्या योजनेचा पाठपुरावा केला. आता त्यात प्लास्टिक टाकण्यासाठी त्यांचे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यांना त्याचे ५० हजार रुपये मंजूर होणार आहेत. त्या स्वतः आठवी उत्तीर्ण असून त्यांची मुलगी कावेरी बारावी विज्ञान शाखेत आहे, तर मुलगा दहावीला आहे. त्यांचे पती गृहरक्षक दलात कार्यरत असले तरी त्यांची नाळ शेती आणि पशुपालनशी अजूनही जोडलेली आहे. शेती का करता?, असे विचारले तर त्या सहज सांगतात, “काळी आईच आमची माय, तिया जीवावरच जगता आम्ही, कष्टाने खावा आणि राहावा, समाधान मिळतो.” त्यांचे हे बोल जणू जीवनाचे सारच उलगडणारे... येथील वनवासी बांधवांशी बोलणे झाल्यावर त्यांनी माझा मोबाईल नंबर मागितला. मला विशेष वाटले तर “नंबर घेऊन काय करणार?,” असे विचारले तर म्हटले की, “आठवण आली की बोलू.” नंबर कसा देऊ विचारले, तर लगबगीने घरात जाऊन त्यांनी मोबाईल आणला. यात द्या म्हणे. ज्या पद्धतीने त्यांनी मोबाईल हाताळला ते पाहून अवाक् व्हायला होते. पूर्णतः रेंज नसणाऱ्या प्रदेशात मोबाईल तंत्रज्ञान त्यांना अवगत आहे. रेंज नेमकी कोणत्या विशिष्ट ठिकाणी येते त्याचे ठरविक स्पॉट त्यांना ज्ञात आहेत. त्यामुळे कोणे एकेकाळी कंदमुळे शोधणारा वनवासी आता रेंज शोधताना पाहून खरंच अप्रूप वाटते.
 

सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यात वनवासींच्या मुख्यत्वे चार प्रमुख जाती. १) हिंदू कोकणा या जातीचा प्रमुख व्यवसाय शेती हा जरी असला तरी त्यांनी आजमितीस विविध व्यवसायांत आपले बस्तान बसविले आहे. तसेच, या जातीतील लोक नोकरी करतानादेखील दिसून येतात. २) हिंदू महादेव कोळी या जातीतील काही लोक हे सुशिक्षित असून काही निरक्षर आहेत. अजूनही विविध ठिकाणी हे लोक कामाच्या शोधार्थ भटकंती करताना आढळतात. या जातीतील लोक कामाच्या हंगामानुसार स्थलांतरित झाल्याचे पाहावयास मिळते. जसे की, द्राक्ष उत्पन्नाच्या हंगामात कामाच्या शोधार्थ हे लोक नाशिकजवळील पिंपळगाव येथे काही काळासाठी स्थलांतर करतात. यातून त्यांना रोजगार उपलब्ध होतो व संसारासाठी वित्तीय साहाय्यदेखील मिळते. ३) हिंदू वारली- वारली चित्रकलेचे जनक म्हणून हा जातीचा मुख्यत्वे उल्लेख केला जातो. चित्रकला जोपासणे व ती रेखाटणे हेच या जातीतील लोकांचे मुख्य काम. हे लोक तुलनेने तसे कमी शिकलेले. ४) भिल्ल या जातीतील लोक आजही शिकार, त्यातही मुख्यत्वे मासेमारी करताना आढळतात. त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण कमी असले तरी ते अगदीच निरक्षर नाहीत. गावातील इतर लोकांना मांसमच्छी पुरविणे हे त्यांचे काम. या वनवासींच्या चार भिन्न जाती असल्या तरी आणि प्रत्येकाचे व्यवसाय भिन्न असले तरी यांच्यात जातीय तणावाचा मागमूसही नाही. येथे होळीच्या निमित्ताने सर्व जातीधर्मांचे लोक, शिक्षित-अशिक्षित एकत्र येऊन सणाचा आनंद लुटताना दिसतात. सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यातील हे ऐक्याचे प्रतीक... वनवासी बांधव आपल्या सणांना विशेष प्रथापरंपरांचे अनुकरण करून विविध सण-उत्सवांचा आनंद लुटताना दिसतात. या भागात होलिका उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपूर्ण गावाची मिळून एकच होळी प्रज्वलित केली जाते. होळीच्या प्रज्वलनासाठी प्रत्येक घरातून एक लाकूड दान केले जाते. त्याचप्रमाणे होळीमध्ये आहुती देण्यासाठी खोबऱ्याच्या वाटीचे विशेष महत्त्व येथे जाणवते. होळीच्या सणाला गावातील सर्व लोक एकत्र येऊन सण साजरा करतात. नोकरीमुळे स्थलांतरित झालेले वनवासीदेखील या दिवशी गावात जातीने हजर असतात. त्यांच्या आयुष्यातील ज्येष्ठांचे महत्त्व यावरुन अधोरेखित होते.

 

होळीव सदा शिमगा खेळीव...

बगळा दादा रे भोळा शंकर, बस माझे पाठीवर, तुला दडीन साती समिंदर

वरल्या माळीला उन्ह्या पावा वाजव वं, उन्ह्या पावा वाजव वं,

रंग दिला व शेंदवड गोळाला वं शेंदवड गोळाला

 

अशा प्रकारची लोकगीते मोठ्या उत्साहाने गायली जातात. या वनवासी भागातील दुसरा मोठा सण म्हणजे दिवाळी. आपल्या दृष्टीने दिवाळी जरी केवळ एक सण असला तरी वनवासी बांधवांसाठी दिवाळी हे आयुष्याचे परिमाण मोजण्याचे साधन. आपण किती दिवाळी जगलो, हे येथील वनवासी बांधव मोजत असतात. जसे जसे इंग्रजी महिने बदलतात, तसे तसे या मंडळींना दिवाळीची चाहूल लागते. येथे लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. ‘भाजी खाऊन वाचलो तर दिवाळी नाचलो,’ अशा शब्दांत येथील वनवासी बांधव आपली भूमिका आपल्या लोकगीतातून मांडतात. लक्ष्मीपूजनानंतर येथे ती भाऊबीज. या दिवशी मुराळीन (सासुरवाशीण) माहेरी येते. त्याचे वेगळेच महत्त्व वनवासी बांधवांच्या दृष्टीने आहे. पशुधन असलेल्या गायींच्या गोठ्यात साफसफाई केली जाते. दिवे लावले जातात. लक्ष्मीपूजनाला रोख रकमेपेक्षा पशुधनाद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते, कारण त्यापासूनच आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते, अशी वनवासींची धारणा. येथे दिवाळीच्या सणाला ‘गावं मागणे’ ही पद्धत रूढ आहे. ‘गावं मागणे’ म्हणजे दिवाळीच्या दिवशी विविध लोकगीते गात वनवासी बांधव आपले गाव सोडून दुसऱ्या गावात जातात व त्या बदल्यात तेथील गावकरी या वनवासी बांधवांना धान्य, पैसे, मिष्टान्न रूपाने मोबदला देतात. दिवाळी आणि होळीपश्चात येथे अक्षय्य तृतीया आणि पोळादेखील उत्साहात साजरा केला जातो. वनवासी भागाचा दुसरा मोठा सण म्हणून या सणांकडे पाहिले जाते. याव्यतिरिक्त नागपंचमीच्या आधी जूनच्या शेवटच्या आठवड्यात येथे एक विशेष सण साजरा केला जातो, जो ‘तेरा’ या नावाने प्रचलित आहे. हा सण एका पालेभाजीच्या नावाने ओळखला जातो. या दिवसांत येथे अळूच्या भाजीसारखी ‘तेरा’ नावाची जंगली भाजी उगवते. तिचे सेवन या दिवशी केले जाते म्हणून या सणाला ‘तेरा’ या नावाने संबोधले जाते.

 

 
 

सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यातील वनवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालन. येथील नागरिकांची बहुतांश घरे ही शेतातच. याबाबत त्यांना घरबांधणीसाठी अकृषी परवाना घेतला का? असे विचारले असता, ते अगदी भोळेपणाने आणि प्रांजळपणे सांगतात की, “इथे कोणी विचारायला येत नाही. त्यामुळे आम्ही तशी परवानगी घेतलेलीच नाही.” शेतीचे विभाजन आणि हद्द मध्ये एक लाकडी ओंडका टाकून निर्धारित केलेली. स्थावर आणि जंगम मालमत्तेसाठी आवश्यक असणारी आणि सरकारदरबारी महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून गणला जाणारा सातबाराचा उतारा बहुतांश जणांकडे नाही. पूर्वापार कसत आलेली जमीन हीच ग्राह्य धरली जाते. या सर्व बाबी वनवासींचा परस्पर समन्वय दर्शविण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. पशुंबद्दल कमालीचा आदरभाव जपणारे हे लोक उदरनिर्वाहासाठी मात्र, या पशुधनाची विक्री करताना दिसून येतात. या भागातील वनवासी बांधवांच्या परंपरा आणि देवही वेगळेच. त्यांची नावे ऐकली तरी आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मूलतः निसर्गपूजक असणारे येथील नागरिक डोंगराला आपला देव मानतात. त्यालाच ते ‘डोंगर देव’ म्हणून पूजतात. येथील डोंगराच्या गाभाऱ्यातील ‘डोंगऱ्या’ हे शिवस्थान आपल्याला समजून घ्यावे लागते. या देवाची उपासना व स्तुती वनवासी विवाहप्रसंगीदेखील करताना दिसतात. त्यामागची आख्यायिका अशी आहे की, महादेव व पार्वतीचा विवाह हा धवलगिरी पर्वतावर संपन्न झाला. त्यावेळी पाळण्यात आलेली प्रथा म्हणून ‘धावलगाणे’ जे ‘आडा’ ‘धवळी’ या नावाने परिचित आहे, ते गायले जाते. हे गीत थेट शिव-पार्वतीशी नाते सांगणारे आहे. तसेच, आपले पीकपाणी व्यवस्थित यावे, निसर्गाचा कोप होऊ नये ही या डोंगरदेवाच्या उपासनेमागची धारणा. या डोंगरदेवाचा उत्सव साधारणतः दिवाळीनंतर साजरा करण्यात येतो. यावेळी ‘वाघ्या’, ‘काट्या’, ‘रान्या देव’, ‘माऊली’ आदी परमेश्वरी अवतारांचे वारे येथील काही वनवासींच्या अंगात येते. या प्रत्येक देवाची खासियत आणि कार्यही फार वेगळे. वाघाने शेळ्या खाल्ल्या, तर वाघ देव नडला म्हणून त्याला उपासना करून शांत केले जाते. ज्या वनवासीच्या अंगात वाघ्याचे वारे येते, तो वनवासी चक्क दोन्ही हातांच्या केवळ बोटांनी जेसीबीसारखा खड्डा खणतो, असे येथील वनवासी लोक सांगतात. वाघ्या देवाला शांत केल्यावर शेळ्या खाण्याचे प्रमाण कमी झाल्याचा येथील वनवासी बांधवांचा अनुभव. वनवासींचा संपूर्ण दिवस हा रानावनातच जातो. त्यामुळे रानातील चलनवलन बिनधोक व्हावे यासाठी रान्या देवाची आराधना केली जाते. माऊलीदेखील अंगात येते. ती अंगात आली की, वनवासी बांधव आपले गार्‍हाणे तिच्यासमोर मांडतात आणि त्याची पूर्तता व्हावी म्हणून तिला काही भोग अर्पण करण्याचे कबूल करतात. डोंगरदेवाचा उत्सव पार पडला की, माऊलीला जे जे कबूल केले आहे, ते ते अर्पण केले जाते. यात मुख्यत्वे प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. ‘‘तुम्ही प्राणीप्रेमी आहात, प्राण्यांना लक्ष्मी मानता मग हत्या का करता?” असे विचारले असता येथील वनवासी अगदी समजुतीच्या स्वरात येऊन सांगतात की, ‘‘हा आम्ही लोक जनावरास देव मानता, पण तोच जनावर जो कष्ट करतो, आम्हाला मदत करता, आम्ही लोक वस्तीचा (गाय-बैल) बळी नाही देता, कोंबड टाकतो,” “का?” असे विचारले असता ते त्यांचे भन्नाट लॉजिक सांगतात. आपल्या पुराणात देवीने अनेक रूपे घेऊन राक्षसांचा संहार केला. आज पशुरूपाने ते राक्षस पुन्हा अवतरले आहेत. त्यामुळे त्यांचा बळी आम्ही देवीला देतो.

 

काट्या देवाची उपासना करताना वनवासींच्या सूक्ष्म विचारांचे दर्शन होते. रानात फिरताना काट्या कुट्यांपासून आपले संरक्षण व्हावे, येणाऱ्या अडचणीतून परमेश्वराने वाट दाखवावी म्हणून येथील वनवासी काट्यादेवाची उपासना करतात. ज्यांच्या अंगात काट्या देव येतो ते वनवासी काट्यांवर झोपून आपले वंदन काट्यादेवाप्रती अर्पण करतात. असे केल्याने तो देव आता आपला झाला, तो आता आपल्याला त्रास देणार नाही, अशी वनवासींची भाबडी समजूत. तसेच, अग्नीदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपली संकट प्रतिकारशक्ती सिद्ध करण्यासाठी येथील वनवासी बांधव पेटता कोळसा, कपूर तोंडात टाकून त्याचे सेवन करतात. तसेच तो तोंडात काही काळ धरून ठेवतात. या व अशा अघोरी प्रथा या वनवासींनी सोडाव्यात व त्याचे शास्त्रीय विवेचन करण्यसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी येथे अनेकदा भेटी दिल्या. मात्र, ते या वनवासींच्या मनात आपले घर करण्यात अपयशी ठरल्याचे येथील शिक्षक काशिनाथ भाऊ (बाबा) गांगुर्डे सांगतात.

 

काही विशिष्ट प्रचलित शब्द (आपले शब्द व वनवासींचे शब्द या क्रमाने )

मीठ-गारा, नाही- नाय, खातात- खावला, जाणे- चालणाव, शाल- साल, भाजी- साक, शिजलेला भात- चोखा, भगर- वरी, शिक्षण - सिक्सन, साप- बाव, वाघ- खड्या, मुलगा (पुत्र)- पोश्या, वृद्ध व्यक्ती- डवर, वृद्ध महिला - डोशी, शर्ट- अंगडी.

 

सुरगाणा तालुक्याची एकूण लोकसंख्या पाड्यानुसार गणली तर साधारणत: दीड लाख इतकी. तसेच यात एकूण १५८ खेडी आणि ६०च्या आसपास ग्रामपंचायती. सुरगाणा व दिंडोरी भागाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, येथील तरुण वर्ग शिक्षित आहे. अशिक्षित केवळ ज्येष्ठ नागरिक आहेत. किमान पदवीधर ते कमाल शासकीय अधिकारी असा स्तर येथे सहज आढळतो. येथील वाय. पी. धूम हे पोलीस उपाधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. राऊत हे तर आयएएस आहेत. थविल बंधुभगिनी प्रांताधिकारी व तहसीलदार आहेत. येथे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयदेखील आहे. तेथून अनेकविध तरुण शिक्षण घेत आहेत. सुरगाणा व दिंडोरी तालुक्यात २३०च्या आसपास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. तेथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग उत्तम चालतात आणि त्याची पटसंख्यादेखील उत्तम आहे. याशिवाय विविध संस्थांच्या आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळादेखील येथे आपले ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. पळसण येथे पहिली ते बारावीपर्यंत तर, भोरमाळ येथे पहिली ते दहावीपर्यंत आणि माण येथे पहिली ते बारावीपर्यंत शाळा व महाविद्यालये आहेत. या वनवासी बांधवांच्या काटकपणाचे गूढ हे त्यांच्या खाद्यपदार्थांत दडले आहे, हे आपल्याला येथील पाहुणचार घेतल्यावर लागलीच कळते. येथील खाद्यपदार्थांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील पाककृतींमध्ये मसाल्यांचा अजिबात वापर केला जात नाही. केवळ नावापुरते तेल, हळद, मीठ आणि हिरवी मिरची या जिन्नसांचा वापर करून पदार्थ शिजविले जातात. रानभाज्यांचा आणि ताज्या भाज्यांचा वापर सर्वाधिक. शहरी वातावरणासारखे शीतकपाटात भाज्या साठवून ठेवल्या जात नाहीत, तर लागतील तशी भाजी थेट शेतातून खुडून आणली जाते. नैसर्गिक साधनांचा जास्तीत जास्त वापर पक्वान्न बनविताना केला जातो. त्यामुळे नैसर्गिक जीवनसत्त्व येथील वनवासींच्या शरीर आणि आत्मिक शुद्धतेसाठी मोलाची भूमिका बजावताना दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसांत सरबतात वापरला जाणारा सब्जा येथे मोठ्या प्रमणात दिसून येतो. त्याचा ठेचा हा तर येथील पाहुणचाराचा मूळ गाभा. त्याची लज्जत जर इथे येऊन अनुभवली नाही तर, सुरगाणा व दिंडोरी दौरा अपूर्ण राहिला, असे समजावे. सो कोल्ड ग्रीन सलाड वगैरे येथे नाही, पण येथे आहे ते म्हणजे वाळूक म्हणजेच काकडी. येथील काकडी ही सामान्य बाजारातील काकडीसारखी नाही, तर दुधीभोपळ्यासारखी मोठी. पाण्याचा बहुतांश अंश यात आढळतो आणि तिची चवही नक्कीच ब्रह्मानंद टाळीची अनुभूती देणारी. याशिवाय कठूळमध्ये म्हणजे कडधान्यांमध्ये येथे उडीद, नागली, तूर यांवर विशेष भर दिला जातो. ‘लॉस्ट रेसिपी’ म्हणून जिचा उल्लेख करावा लागेल, अशी वाळूकची भाकरी येथे दिवाळीचा गोड पदार्थ म्हणून केली जाते. केळीच्या पानात वाफाळून करण्यात येणारी ही भाकरी मधुमेहाच्या रुग्णालाही भुलविल्याशिवाय राहत नाही. आपल्या घरात बनविल्या जाणाऱ्या चटण्या म्हणजे खुरसणी, मोहरी यांचे उत्पादन येथे घेतले जाते. तसेच भगरीचे उत्पादनदेखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आपल्या उपवासाची आणि नैमित्तिक जेवणाची लज्जत वाढविण्यात सुरगाणा तालुक्याचा मोठा वाटा आहे.

 

 
 

या दोन्ही तालुक्यांत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजवणी होताना दिसते. त्यामुळे येथे कुपोषण नाही. तसेच वीजदेखील उपलब्ध आहे. रस्ते स्वच्छ आणि पूर्णतः डांबरी. पाणीही भरपूर, पण खडकाळ जमीन असल्याने जलसंधारण तसे कमीच. त्यामुळे काही भागात उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हा परिसर घाटमाथ्यावर असल्याने वृत्तपत्र पोहोचत नाही. सुरगाणा या तालुक्याच्या शहरात वृत्तपत्र येते, मात्र पाड्यापर्यंत नाही. तसेच मोबाईल रेंजची समस्या मोठी. त्यामुळे येथील वनवासी बाहेरच्या जगाशी म्हणावा तितका साध्यर्म साधून नाही. मात्र, मुले शाळेत जातात, त्यामुळे घरात चर्चा होते. नाशिक येथील संत जनार्दन स्वामी ट्रस्टच्या माध्यमातून आणि माधवगिरी महाराज यांच्या प्रयत्नातून येथील मोहमाळ येथे आश्रम विकसित होत आहे. हा आश्रम येथील भक्तिसाधनेची अनुभूती आपल्याला ठाई ठाई देताना दिसतो.

 

वनवासी कल्याण आश्रमाने फुलविले नवचैतन्य

 

सुरगाणा तालुक्यातील गुही येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रकल्पाने वनवासी बांधवांच्या जीवनात नवचैतन्य फुलविले आहे. गुही येथील या प्रकल्पाची मुहूर्तमेढ जिल्हा संघचालक डॉ. मधुकर आचार्य यांच्या भीष्म प्रयत्नांतून रोवली गेली. १९८५ मध्ये अतिदुर्गम भागाचा विकास करणे, हा एकाच ध्यास घेऊन सुरगाणा तालुक्यात डॉ. आचार्य यांनी शोधमोहीम सुरू केली. तेव्हा त्यांना गुही हे ठिकाण सापडले. येथे जाण्यासाठी त्यावेळी तीन वेळा नदी पार करावी लागत असे आणि तिथे कम्युनिस्टांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात होता. त्या काळातील मतदानाचा विचार केला, तर किमान ९५ टक्के मतदान हे कम्युनिस्टांना होत असे, तर केवळ ५ टक्के मतदान हे इतर पक्षांना होत असे. अशा वातावरणात डॉ. आचार्य तेथे पोहोचले. ‘‘तुम्ही संघवाले. तुम्ही येथे कशाला आलात?, ”अशा शब्दांत त्यांचे स्वागत झाले. त्यावेळी महत्प्रयासाने डॉ. आचार्यांनी त्यांचे मन जिंकले. याकामी त्यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाचा मोठा फायदा झाला. दुपारी २ पर्यंत दवाखाना, नंतर पाड्यांवर जाणे, चर्चा करणे, वनवासी कल्याणाचा हेतू समजून सांगणे अशी तारेवरची कसरत डॉक्टरांनी करावयास सुरुवात केली. यावेळी स्वतः कम्युनिस्ट असणारे माळकरी असणारे नवसू सहारे बाबा त्यांच्या संपर्कात आले. त्यांना संघ विचार व वनवासी कल्याणचा हेतू भावला. त्यांनी डॉ. आचार्यांना खूप साथ दिली. सहारेबाबा म्हणजे आधुनिक काळात वाल्याचे वाल्मिकी झालेले व्यक्तिमत्त्व. त्यांना चिमण नावाचा मुलगा आहे. त्याची कथा मोठी विलक्षण आहे. तेव्हा तो शाळेत जात होता. घरी जागरणाचा कार्यक्रम असल्याने तो गावी घरी आला होता व त्याला शाळेत जायचे नव्हते, कारण त्याने शिक्षकांच्या कानशिलात लगावली असल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्या दिवशी नवसू सहारे यांना भीमराव या त्यांच्या मित्राने समजावले व चिमणला पुणे येथे संघ शिक्षा वर्गासाठी धाडले. तेथून आल्यावर चिमणमध्ये कमालीचा बदल झालेला गुहीवासीयांनी पाहिला. त्याचा प्रभाव गुहीवासीयांवरही पडला व त्यांचा संघ कार्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर परशराम सहारे यांनी जे स्वतः कम्युनिस्ट होते, त्यांनी आपल्या घरातील जागा कल्याण आश्रमाला दिली आणि अशा प्रकारे तेथे वनवासी कल्याण आश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

 

१९८५ मध्ये आरोग्य सेवा करताना डॉ. आचार्यांना तेथे शिक्षणाचे मागासलेपण दिसून आले. त्यामुळे त्यांनी इयत्ता आठवीचा माध्यमिक वर्ग सुरू केला. येथे प्रथम माध्यमिक शाळा सुरू झाली. गावात पहिली ते सातवीपर्यंतची शिक्षणाची सोय होती. त्यामुळे गरज ओळखून आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला. तसेच, या भागात पाऊस जास्त पडूनही जलसंधारण होत नसल्याने वनवासी कल्याण आश्रमाने जलसंधारणाचे विविध प्रकल्प राबविले. असे असूनही आजमितीस कम्युनिस्टांचा प्रभाव येथे जाणवतो. मात्र, पूर्वीसारख्या अडचणी येथे येत नाहीत. येथील जमिनीचा पोत हा जलसंधारणासाठी उपयुक्त नाही, हे जाणून डॉ. आचार्यांनी येथे विविध शासकीय विभागांशी चर्चा करून विशिष्ट प्रकारची माती आणून येथे जलसंधारण करण्यास चालना दिली. तसेच, मिशनरींच्या माध्यमातून धर्मांतरण केले जात असल्याची बाबही वनवासी बांधवांशी चर्चा करताना समोर आली. धर्मांतरणाच्या दोन पद्धती वापरल्या जातात. १) शासन कुठे कमी पडले आहे, ते जाणून वनवासींची आवश्यक गरज भागविली जाते व त्या माध्यमातून धर्मांतरण केले जाते. २) मिशनरी आपल्या विविध कॉन्व्हेंट शाळातून काही विद्यार्थी या भागात सुटीच्या काळात घेऊन येतात. त्यांना येथील वनवासींच्या घरी राहावयास लावतात व त्या विद्यार्थ्यांच्या राहणीमानाचा बोलण्याचा प्रभाव येथील वनवासींवर पडून तुमचीही मुले अशी होतील, जेव्हा तुम्ही ख्रिस्ती व्हाल, असे सांगून धर्मांतरण घडवून आणतात. याशिवाय चमत्कारी पाणी वगैरेंचे आमिष दाखवूनदेखील धर्मांतरणाचे सर्रास प्रयत्न केले जातात. डॉ. आचार्यांनी येथे आरोग्य सुविधांबाबत जनजागृती करताना येथील बुवाबाजीला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध घातला. पूर्वी सर्पदंश झाला की, नदी ओलांडू नये, असा मानणारा वनवासी आज वैद्यकीय उपचारांना प्राधान्य देताना दिसतो. आता येथील बाबाबुवाच त्यांच्याकडे येणाऱ्यांना डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देतात, हे विशेष.


 
 

डॉ. आचार्यांच्या माध्यमातून आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून येथील वनवासींना बांबूच्या वस्तू बनविण्याचे आगरतळा येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून पापड उद्योग, फलोत्पादन उद्योग, मधुमक्षिका पालन असे अनेकविध उद्योग सुरू करण्यात आले आहेत. आजमितीस वनवासी कल्याण आश्रम संस्थेची पहिली ते सातवी ही आश्रमशाळा व आठवी ते दहावी ही माध्यमिक शाळा येथे कार्यरत आहे. आश्रमशाळेत १४७ मुले व १३३ मुली असे एकूण ३५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. उर्वरित विद्यार्थी अनिवासी आहेत. एकूण १७ कर्मचारी, त्यात ७ शिक्षक, १ मुख्याध्यापक, १ अधीक्षक, ४ स्वयंपाकी, २ कामाठी, १ स्त्री अधीक्षिका येथे कार्यरत आहेत. रोज सकाळी ५.३० वाजता येथील विद्यार्थ्यांचा दिनक्रम सुरू होतो. संस्थेचे काही विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस उपनिरीक्षक, सरपंच, पंचायत समिती सदस्य झाले आहेत. त्यात प्रामुख्याने संजय पवार, शांतीलाल सोम भोये, भारती काळूराम गावित, हिरा मनिराम गावित, अशोक थोरात, सुरेश नारायण चौधरी, विजय धागडे या विद्यार्थ्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तसेच, उत्तम स्मरणशक्ती आणि काटक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी खोखो, कबड्डी, नेमबाजी, लंगडी, क्रिकेट, दोरउडी अशा खेळांत नैपुण्य प्राप्त केले आहे. कौशल राऊत, रेणुका गायकवाड, कल्पना गवळी, धीरज भोये या विद्यार्थ्यांनी तिरंदाजीमध्ये विभागीय पातळीवर आपला झेंडा रोवला आहे.

 

विविध पद्धतीची समृद्ध जीवनशैली असणारे वनवासी बांधव हे आपल्याच विश्वात रमणारे असले तरी ते भवतालाशी आपली नाळ जोडून आहेत. शिक्षणाचे महत्त्व जाणून आहेत. आपल्या अंगभूत गुणांना वाव देणारा कोणी भेटल्यास त्याचे ते सोने करतात. असा हा सोन्यासारखा वनवासी माणूस आपले माणूसपण आजही टिकवून आहे. त्याचे असणे हेच खरेतर आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. अविरत श्रमणे आणि जिणे हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे. अशा या ‘आदि’ वास असणाऱ्या आद्य बांधवांस शतशः नमन!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@