मिठी नदीतून जलवाहतूक, हे माझे स्वप्न !

    15-Nov-2018
Total Views |

 


 
 

आयडिया ऑफ न्यू इंडियामध्ये नितीन गडकरी यांचे उद्गार

 

मुंबई : मुंबईचा समुद्र आणि मिठी नदी स्वच्छ व्हावे हे आव्हान आहे. मी त्यासाठी पैसे द्यायला तयार आहे. मुंबईचा समुद्र मॉरीशससारखा स्वच्छ व्हायला हवा, त्यासाठी जनआंदोलन व्हायला हवे. मिठी नदीतून जलवाहतूक सुरू व्हावी व नदीतून निर्मल पाणी वहावे हे माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, नौकानयन आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

 

हिंदू नववर्ष स्वागत समितीद्वारा आयोजित द आयडिया ऑफ न्यू इंडियाया कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईतील माटुंगा येथे वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये झालेल्या या कार्यक्रमात उद्योजक श्रीराम दांडेकर, पत्रकार भारतकुमार राऊत, शिक्षण प्रसारक मंडळीचे कार्यवाह सुरेश देवळे, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्याध्यक्ष भूषण मर्दे, उपाध्यक्ष वीरभद्र दुलानी, कार्यवाह रमेश देवळे आदी उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी देशातील पायाभूत सुविधा, रोजगार, उद्योग यांच्या विकासाबाबत अनेक मुद्द्यांवर उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या देशात विचारशून्यात ही मोठी समस्या राष्ट्रनिर्माण करणारा १०० वर्षांचा विचार करतो. आपण राष्ट्रवादी विचारांचे आहोत. हा देश सर्वसंपन्न व्हावा, शक्तिशाली ऐश्वर्यसंपन्न व्हावा, हे आपली सगळ्यांचे स्वप्न आहे. यु कॅन डोनेट आईज, कान्ट डोनेट व्हिजनहे त्यांनी नमूद केले. आपण परफेक्टआहोत, असे कोणीही म्हणू शकत नाही. मीही नाही. माझेच विचार योग्य असे मी मनात नाही. आपण सारे येथे मंथन करण्यासाठी जमलो असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

 

गडकरी पुढे म्हणाले की, आपल्याकडे लोकसंख्या मोठी आहे. ती एक समस्याही आहे. मुंबईतील उड्डाणपूल केले तेव्हा वाटले होते, वाहतूक समस्या सुटेल. पण गाड्या इतक्या वाढल्यात की समस्या कायम असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली ते मुंबई द्रुतगती मार्गाचे काम सुरू असून १ लाख कोटी रूपयांचे हे काम आहे. यातून हा पल्ला १२ तासात गाठता येणार असून हा संपूर्ण कॉंक्रीटचा रस्ता असेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, हा रस्ता वनवासी भागातून जात असल्याने या भागात विकास पोहोचेल, असाही दावा त्यांनी केला. तसेच अशा आणखी १२ द्रुतगती मार्गांचे काम सरकारतर्फे सुरू असल्याचे सांगत काश्मीरमध्ये कारगिल भागात जे बोगदे होतात आहेत, त्यामुळे सीमेवर पोहोचणे वेगात शक्य होईल, असे ते म्हणाले. भारतातून थेट मानस सरोवर जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरू असून येत्या जानेवारीपर्यंत त्याचे उद्घाटन होईल, या मार्गाचे आता केवळ तीस किमीचे काम बाकी असल्याची महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. मुंबई-गोवा महामार्गाच्या नवीन रस्त्याचे उदघाटन पुढील वर्षी होणार असल्याचे सांगत आतापेक्षा अर्ध्यावेळात गोवा गाठता येणार असल्याचे गडकरी म्हणाले.

 

महामार्गांसह जलवाहतूक व हवाई वाहतूक या क्षेत्रात सरकार करत असलेल्या विकासकामांचीही गडकरी यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच, मुंबई व लगतच्या परिसरातील पायाभूत प्रकल्पाबाबत त्यांनी भाष्य केले. ठाणे-विरार जलमार्ग विकसित करण्यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या विमानतळाजवळ वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा मनोदय सांगत जलमार्गाने या विमानतळावर कुठूनही जात येईल, असा दावा त्यांनी केला. गंगा शुद्धिकरणाबाबत बोलताना गंगा नदी हा आपल्या सर्वांच्याच आस्थेचा विषय असून गंगेत सर्व ठिकाणी घाण पाणी सोडणे थांबवले असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, शुद्धीसाठी नवीन तंत्रज्ञान आणले असल्याचे सांगत मार्च अखेरपर्यंत ८० टक्के गंगा स्वच्छ होईल व त्यानंतर पुढील वर्षी गंगा १०० टक्के स्वच्छ होईल, असाही दावा गडकरी यांनी यावेळी केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/