स्टॅन ली नामक 95 वर्षांच्या मुलाचा अकाली मृत्यू!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018   
Total Views |

स्टॅन ली काल गेला. नेमका भारतात बालकदिन साजरा होत असताना त्याचे जाणे हा दुर्दैवी योगायोग. त्याच्या देशात या बालकदिनाचा तसा काही संबंध नाही, मात्र समस्त जगातल्या बालकांशी या बालकाचा कायमचा संबंध आहे आणि आता पार्थिव दृष्टीने जाण्याने तो अधिकच दृढ झाला आहे. या बाळाची अनेक सुपर बाळे आहेत, ती या जगातील मुलांची सोबत कायमच करत राहणार आहेत. वयाने जी मुले आहेत त्यांची अन् वय वाढल्यावरही आपले बालपण कायम ठेवणार्या व्यक्ती ज्या अतिशय दुर्मिळ आहेत त्यांच्याशीही त्याचे संबंध दीर्घकाळ कायम राहणार आहेत.
 
 
सृजनाच्या वाटेवर किती काळ चालता येतं, ते काही सांगता येत नाही. कारण एका विशिष्ट काळाननंतर सृजनात्मकता आटते की काय, असे वाटते. काहीच लोक शरीर थकले आणि मन त्यामुळे खंगल्यावरही निर्मिती करत राहतात. गुलजारांना वयाच्या साठीनंतरही ‘चड्डी पहनके फूल खिला है’ सुचते किंवा अगदी थिल्लर वाटणार्या ‘बिडी जलाईले जिगर पे जिया’ असेही ते लीलया लिहून जातात. कारण सृजनाला अत्यंत आवश्यक असलेली भाबडी, निर्व्याज कोवळीक ते जपून ठेवत असतात.
काळजावर दगडही
ठेवून पाहिलेत पण...
ही कोवळी, हिरवी पाने
फुटतात कुठून कळतच नाही
म. म. देशपांडेंच्या कोळी काहीच जणांच्या अस्तित्वाच्या मातीत जिवंत आणि जातिवंत असतात. स्टॅन लीसारखे, वय वाढले तरीही आपले बालपण कायम ठेवणारे फार विरळा असतात. आता तो काया, वाचा, मन आणि त्याच्या चित्रपट, कॉमिक्स यांच्या माध्यमातून दिसत आणि भेटत राहणार आहे. त्याच्या चित्रपटांत तो कुठेतरी अवचित दिसायचाच. त्याचे हे कॅमिओ चित्रपटांत कधी येतात, यासाठी त्याचे प्रेक्षक वाट बघत असायचे. आपले सुभाष घई जसे त्यांच्या चित्रपटात कुठल्यातरी रिळात दिसायचेच, तसेच स्टॅन लीचेदेखील होते. ‘दी अॅमेझिंग स्पायडरमॅन’ या चित्रपटात, लायब्ररीत लिझार्ड झालेला कर्ट कॉनर्स स्पायडर झालेल्या पीटर पार्करला मारहाण करण्याचा उच्छाद मांडत असतो आणि स्पायडी त्याला खेळवीत असतो. त्या निमित्ताने लायब्ररीची उलथापालथ होत असताना, एक म्हातारा हेडफोन लावून मस्तपैकी संगीत ऐकत असतो... ‘थॉर’मध्ये कुणाला त्याचा हातोडा उचलता येत नाही म्हणून आपल्या गाडीला तो हातोडा बांधून तो ओढून नेत गाडीचीच ऐशीतैशी करून घेत असतो.
 
 
‘दी ट्रायल ऑफ दी इनक्रेडिबल हल्क’मध्ये हाच माणूस 1989 साली दिसला होता पहिल्यांदा. तो म्हणे या चित्रपटाचा लेखक होता. ‘एक्समॅन’, ‘स्पाइडरमॅन’ या चित्रपटांत तो दिसतो. त्याचे हे दर्शन केवळ दिखाऊ नसते. चटका लावणार्या विलक्षण गहिर्या प्रसंगात ही स्वारी अवतरते आणि लक्षात राहील असे काही करून जाते. आता हेच बघा ना- ‘डेअरडेव्हिल’मध्ये, वर्तमानपत्र वाचत रस्त्याच्या काठाने उभा असलेला हा माणूस, एका अंध मुलीला कारला धडकण्यापासून वाचवितो. ‘हल्क’ असो की मग ‘एक्समॅन लास्ट स्टँड’ हा ओळखीचा झालेला चेहरा दिसतोच. त्याचे नाव स्टॅन ली!
 
28 डिसेंबर हा त्याचा जन्मदिन. त्याच्या जन्माचे साल लक्षात ठेवायचे नाही. कारण आता त्याला मरण नाही. लोक त्याचे वय मोजत राहिले. त्याचेच एक पात्र आहे, फिल कॉल्सन. भारतीय सृजनात सत्यवान नावाचे पात्र आहे. ते आता पौराणिक आहे. मरणाच्या घरून सत्यवान परत आला होता. अगदी तसेच हे पात्र आहे, फिल कॉल्सन. तो मरणानंतर यमराजाला हुलकावणी देत परत आला आहे. जीवनानंतरचे जीवन म्हणजे फिल. या अमर पात्राला जन्म देणारा हा लेखक स्टॅन ली. तो कसा मरणार? चित्रपट काळे- पांढरे होते तेव्हापासून त्याचा अवतार आहे. जन्मल्यानंतर त्याचे नाव त्याच्या मायबापानी स्टॅन्ली मार्टीन लिबर असे ठेवले. काही महान करून दाखवू नि मगच आपले हे नाव लावू, असा विचार करून पहिल्यांदा कॉमिक्स लिहिले तेव्हा त्याने केवळ स्टॅन ली असे नामकरण करून घेतले. हेच नाव इतके अजरामर झाले की, मग त्याला आपले हे खरे नाव लावण्याची संधीच मिळाली नाही. लिहिता येतं चांगलं म्हणून त्याच्याकडून सुरुवातीला लोकांनी शोकसंदेश लिहून घेतले. मात्र त्यावरच तो थांबला नाही. तो कॉमिक्स लिहायचा, संपादक होता, प्रकाशक होता, त्याने टीव्हीचे शोज् होस्ट केले आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, जगात अत्यंत लाडके असलेल्या मार्व्हल कॉमिक्सचा तो अध्यक्ष होता. स्पाइडरमॅन, हल्क, डॉक्टर स्ट्रेंज, आयर्न मॅन, डेयरडेव्हिल, थॉर, एक्स- मॅन यासारख्या अद्भुत पात्रांना त्याने जन्म दिला.
 
त्याचा जन्म न्यू यॉर्कचा. त्याचे आई-वडील मूळचे रोमानियाचे यहुदी. परिस्थिती अत्यंत बेताची. त्याचा एक लहान भाऊ होता लॅरी. अत्यंत लहान वयातही त्याची इच्छा हीच की, अफाट असे काहीतरी लिहिले पाहिजे. मार्क ट्वेन त्याचे आवडते लेखक आणि रॉबीनहूडचे रोल करणारा एरॉन फ्लिन हा त्याचा आवडता अभिनेता.
काकाने त्याला त्याच्या आवडत्या जगतात नेले. वयाच्या सोळाव्या वर्षी 1939 साली त्याला टाईमली कॉमिक्समध्ये सहायकाची नोकरी मिळाली. तेव्हा हातानेच सारे काम करावे लागे. चित्रकारांनी काढलेली चित्रे साफ करायची आणि मुद्रितशोधन करायचे. मग त्याला त्यात वाक्य भरण्याची बढती मिळाली. मग त्याला आर्मीत काम मिळाले. तिथेही मॅन्युअल्स लिहायचे, प्रशिक्षणाच्या चित्रपटांच्या पटकथा लिहायच्या, युद्धकाळात आर्मीसाठी स्लोगन लिहायचे.
या काळात स्टेन लीने आपली पात्रं इज्जाद केली होती. आतावरच्या कॉमिक्सच्या पात्रांपेक्षा यांची पात्रं वेगळी होती. त्यांच्याकडे अचाट शक्ती होत्या, दिङ्मूढ व्हावे असे कारनामे ते करायचे, मात्र त्यांचे सामान्यपणही स्टेन लीने कायम ठेवले होते. ली चे हे सुपर हिरो चुका करायचे, सामान्य जीवनात ते अशक्त होते, त्यांना मर्यादा होत्या. ते राग करायचे, द्वेषही करायचे... टाईमली पब्लिशर्सनी ली याला पुन्हा बोलावले आणि मग ‘फंटास्टिक फोर’चा जन्म झाला. हल्क, आयर्न मॅन, डेयरडेव्हिल, झेव्हियर्स आले आणि मग मार्व्हल कॉमिक्सचा अवतार झाला. 1961 आणि नंतरचा काळ केवळ आणि केवळ स्टॅन लीचा होता.
तुम्ही कुठल्याही देशात राहणारे असोत, तुमची भाषा, संस्कृती, भौगोलिक पर्यावरण आणि समस्या काहीही असोत, तुम्ही स्टॅन लीला टाळून पुढे जाऊच शकत नाही. आजच्या काळातील बच्चेकंपनीला तर स्टॅन ली नावाचे दैवत आहेच. कारण त्याने आता आपल्याला दिसत असलेला अन् विराट रूप दाखविणारा स्टॅन ली, त्याच्या बालवयातच पाहिला होता. त्यानुसार तो घडविला होता. भारतात मार्व्हल कॉमिक्स महाग आहेत. त्यातही मुलं वाचतच नाहीत. वाचत असतीलही तरीही मग त्यांचे पालक त्यांच्या हातात एका मार्व्हलच्या किमतीत गठ्ठाच्या गठ्ठा भारतीय कॉमिक्स देऊन मोकळे होतात. मात्र, मार्व्हलच्या चित्रपटांत तो आणि त्याची पात्रं भेटत राहतात. तो केवळ पात्रांचाच जन्मदाता अन् पालक झाला नाही तर त्याने, मार्व्हल ही कंपनी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आली तेव्हा तिला बाहेर काढले. त्याच्या या पात्रांच्या जन्मकथा त्यावेळच्या अमेरिकेच्या सामाजिक स्थितीतून आल्या आहेत. त्यामुळे त्याने त्याच्या पात्रांमधून मुलांमध्ये आत्मविश्वास पेरला. अत्यंत सामान्य स्थितीतली ही त्याची पात्रं बघता बघता सुपर हिरो व्हायची आणि अचाट कामगिरी करून दाखवायची. त्याने त्यांच्या माध्यमातून मूल्यांची पेरणीही केली. हळूच कळतं की, त्याच्या नायकांची ताकद त्यांच्यातलं सामान्यपण, चांगुलपणा हेच आहे. स्टॅन लीबद्दल बर्याच फॅन थिअरीच आहेत. त्यापैकी एक म्हणजे तो ‘वॉचर’ आहे. सार्या सृष्टीवर नजर ठेवून असणारा. नोंद घेणारा. कुणाला वाटतं की, ली हा या सृष्टीतली सर्वोच्च शक्ती आहे. भारतीय मुलांना मात्र वाटतं की, ली हा ब्रह्मदेव आहे. तो स्वत:च निर्माण केलेल्या जगात फिरायला आला आहे. म्हणून त्याने लिहिलेले चित्रपट बघताना रसिक त्याच्या कॅमिओज्ची वाट बघतात. तो क्षण निसटू नये म्हणून पडद्यावर डोळे गाडून ठेवतात. तो दिसला की प्रेक्षागृहात हशा आणि टाळ्याच...! आता देहाने तो गेला आहे, तरीही कॅप्टन मार्व्हल आणि एवेंजर्स-फोरमध्ये शेवटचं का होईना, पण दर्शन देईलच की!
@@AUTHORINFO_V1@@