पाचोर्यातील रा.स्व.संघ कार्यकर्त्यांच्या ‘प्रेरणा प्रतिष्ठान’ची अनोखी समाजसेवा : अनेक उपक्रमांचा संकल्प
पाचोरा, 13 नोव्हेंबर
पाचोरा शहर, परिसर आणि तालुक्यातील सर्वच समाज घटकांची आणि सामाजिक, शैक्षणिक, युवा, प्रौढ, ज्येष्ठ संस्था आणि संघटनांंना विविध उपक्रमांसाठीची सभागृहाची गरज विनामूल्य पूर्ण करणारी संस्था आहे, पाचोरा येथील प्रेरणा प्रतिष्ठान...राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या या प्रतिष्ठानतर्फे बालवाडी चालविली जाते. या बालकांना भारतीय संस्कृती व परंपरांचे धडे देत, संस्कार करीत घडविण्याचे कार्यही होत आहे.
प्रेरणा प्रतिष्ठानचे प्रमुख आणि संघ परिवारात बालपणापासून अनेक जबाबदार्या पार पाडणारे सुनील सराफ आणि सहकारी कार्यकर्ते तनमन, प्रसंगी या सेवाकार्याचे धनपूर्वक व्यवस्थापन व काळजी वाहत आहेत.
पाचोर्यातील भडगाव मार्गावरील बाजोरियानगरात मोक्याच्या जागी ही सर्व समाजघटकांना उपयोगात आणण्यासाठी उपयुक्त ठरणारी वास्तू आहे. समाजसेवेच्या भावनेने कार्यरत (स्व.) विश्राम रावजी काळे आणि बा.शं.कुलकर्णी आदी 6-7 कार्यकर्त्यांनी आदर्श शिक्षण प्रसारक संस्था स्थापन केली.
भडगाव मार्गावरील शेतात एका कामापुरत्या वास्तूत कामकाज सुरूही झाले. अर्थात प्रधान आणि पवित्र हेतू होता गरजूंपर्यंत शिक्षणामृत पोहोचवणे. पुढे व्याप वाढत तिचे रूपांतर झाले प्रेरणा प्रतिष्ठानच्या सेवा प्रकल्पात.
1988 मध्ये सध्या सभागृह असलेला सुमारे 4 हजार चौरस फूट आकाराचा भूखंड संस्थेला नगरपालिकेकडून मिळाला. तत्कालीन नपातील निरपेक्ष, समाजकार्याभिमुख सत्तापक्ष आणि या निर्णयाला साथ देणार्या सार्यांना सकारात्मक दृष्टीबद्दल धन्यवाद द्यायलाच हवेत.
1992 च्या सुमारास या जागेवर अंदाजे 1500 चौरस फुटाचे सभागृह अनेक दिलदार, उदार संस्था आणि व्यक्तींच्या योगदानाने झाले. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते (स्व.) नानाजी देशमुख यांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण झाले.
अल्पशिक्षितांच्या आणि ग्रामीण बेरोजगारीवर मात करण्यासाठी सध्या ज्या ‘कौशल्य विकास प्रशिक्षण’ ला शासन, प्रशासन आणि समाजहितैषी विचारवंतांनी स्वीकारले आहे, त्याचा वेगळ्या अर्थाने ‘श्रीगणेशा’ केला. इलेक्ट्रिशियन, टर्नर, कारपेंटर (सुतारकाम), गवंडीकाम, वेल्डिंग (जोडारी) या सप्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे ज्ञानसत्र 7-8 वर्ष उत्तम पद्धतीने देण्यात आले.
या कालावधीत अंदाजे 400 युवकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यात यश आले. हे तरुण सध्या शासकीय, निमशासकीय, खासगी उद्योग व्यवसायात मग्न असून सुखी, संपन्न जीवन जगत आहेत, असे म्हणता येईल.
प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे या सभागृहात भिल्ल विद्यार्थी वसतिगृह सुमारे 4 वर्ष चालविण्यात आले. शिक्षणापासून कोसो दूर, वंचित नव्या पिढीला विनामूल्य सुविधा पुरविणार्या या सेवा कार्याचा भार अनुदानाच्या भरवशावर नव्हे तर लोकसहभागातून उचलण्यात आला. सध्या या सभागृहात बालवाडी चालविली जाते.
या सभागृहाचा उपयोग अखिल भारतीय अध्यात्मिक परिवाराचे पदाधिकारी, सदस्यांना सभा, बैठकी, सत्संग यासाठीही होत असतो. यासह पाचोरा शहर व तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक संस्थांनासुद्धा सभा, प्रशिक्षण, शिबिरे इ. विशेष उपक्रम तसेच जयंती, स्मृतिदिन, वर्षी, उत्तरकार्य-शोकसभा इ. यासाठीही विनामूल्य लाभ मिळतो. वर्षभरात 150 ते 200 दिवस ते उपयोगात आणले जाते.
शांत, सुंदर परिसर, वृक्षराजीमुळे प्रसन्न, आल्हाददायक वातावरण तसेच वाहनतळासाठी परिसरात पुरेशी मोकळी जागा याचा एकूण परिणाम अनेकविध संस्था, संघटनांची मोठी सोय झाली आहे.
भविष्यात अभ्यासू विद्यार्थ्यांना एकाग्र चित्ताने अभ्यास करता यावा, यासाठी या जागी अभ्यासिका सुरू करावी. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी एखादे लहानसे का होईना वाचनालय, ग्रंथालय असावे, असाही कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना सर्व समाजघटकांचे वाढते सहकार्य व सहभाग मिळण्याची आवश्यकता आहे.
कल्याणकारी संकल्प...
सभागृहाजवळच सिद्धिविनायक हे भव्य हॉस्पिटल आणि परिसरात 25 लहान-मोठे दवाखाने आहेत. अनेकविध आजार-विकारग्रस्त आबालवृद्ध रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी उपायकारक रुग्णोपयोगी साहित्य विनामूल्य उपलब्ध करुन देण्याचा तसेच सर्व वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय, ग्रंथालय सेवाही देण्याचाही कार्यकर्त्याचा संकल्प आहे.
हरिजन सेवक संघाचे ‘विचारपूर्वक’ औदार्य
सध्या असलेली ही वास्तू उभी राहण्यासाठी हरिजन सेवक संघाने स्वत:च्या सदस्यांची जमा रक्कम 1 लाख रु. संस्थेला देणगी दिली. रा.स्व.संघाच्या विचारांना विरोध करणार्या काही मान्यवरांनी आरंभी विरोध केला खरा...पण या रुपया रुपयांनी संग्रहित देणगीचा प्रामाणिक व पारदर्शी उपयोग, विनियोग करणार्या समूहाचा, कार्यकर्त्यांचा विचार करीत आणि निकष लावत अखेर ही रक्कम या संस्थेला पवित्र दान म्हणून देण्यात आली.
तत्त्व आणि व्यवहारात मानवी हिताचे सूत्र अंमलात आणणार्या या संस्थेचे आणि तिच्या सदस्यांचेही कौतुक केले जाते, ते योग्यच म्हणता येईल. भविष्यात रुग्णोपयोगी साहित्य पुरवठा केंद्र, सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सुजाण, जबाबदार नागरिक घडविण्यासाठी वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी एखादे लहानसे का होईना वाचनालय, ग्रंथालय सुरु करण्याचाही ‘प्रेरणा प्रतिष्ठान’ चा कृतसंकल्प आहे.