योगक्षेमं वहाम्यहम् …

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018   
Total Views |
 
 
 
श्रीमद्भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अखिल जगतास एक विलक्षण अभिवचन देतात –
 
अनन्याश्चिंतयंतो मां ये जन: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥
 
अर्थात – अनन्यभावाने केवळ माझेच चिंतन आणि उपासना करणाऱ्या नित्ययुक्त अशा भक्तांचा योगक्षेम मीच चालवत असतो.
 
असे तत्त्वज्ञान केवळ वाचून समजत नाही. किंबहुना भगवान श्रीकृष्ण अथवा वेदव्यासांचीदेखील तशी कल्पना नसावी. नव्हतीच. वाचून करता येते ती केवळ चिकित्सा. साखरेची चव गोड आहे हे जसे केवळ वर्णन करुन कळणार नाही, तर त्याकरिता साखर जिभेवरच ठेवावी लागते व त्या अनुभवानंतरच ’साखर गोड आहे’ हे नीट समजतेही व ते इतरत्र छातीठोकपणे सांगताही येते. जनकल्याण रक्तपेढीपुरतं सांगायचं तर ’योगक्षेमं वहाम्यहम्’ हा श्लोक आमच्याकरिता असाच प्रचितीसिद्ध आहे.
 
मला आठवते, आमच्याच निमंत्रणावरुन एक ज्येष्ठ उद्योजक अलिकडेच रक्तपेढी पाहण्यासाठी आले होते. रक्तपेढीची सर्व अद्ययावत प्रयोगशाळा पाहून झाल्यावर ते उस्फ़ूर्तपणे उद्गारले,
 
’कमाल आहे ! सामान्यत: सामाजिक संस्था म्हटले की, ’व्यापक जनहित’ वगैरे आवरणांखाली अशा संस्थांमध्ये तांत्रिक आघाडीवर आनंदीआनंदच असतो, पण तुमची रक्तपेढी मात्र याला खरोखरीच अपवाद आहे.’
 
त्यांचा हा अभिप्राय आम्हाला निश्चितपणे समाधान देणारा होता. त्यात हे उद्योजक त्यांच्या चिकित्सक वृत्तीसाठी ओळखले जातात. त्यामुळे अशा व्यक्तीकडुन आलेला हा अभिप्राय आम्हाला एखाद्या प्रमाणपत्रासारखाच वाटला असल्यास त्यात नवल नव्हते. कदाचित सातत्याने इथे काम केल्यामुळे आमच्या हे लक्षात येत नसेल किंवा लक्षात येऊनही या विषयावर फ़ारशी चर्चा होत नसेल, पण ’येथील तांत्रिक अद्ययावतता’ ही बाहेरच्या व्यक्तीला मात्र चटकन लक्षात येईल अशी गोष्ट आहे. अर्थात, माळरानावर सहजपणे गवताची पैदास व्हावी तशी ही तांत्रिक अद्ययावतता सहज आलेली नसून परिश्रमपूर्वक प्रथम जमिनीची मशागत, नांगरणी, पेरणी, राखण अशा संस्कारांतून बहरलेल्या शेतीप्रमाणे तिची वृद्धी होत गेलेली आहे. रक्तपेढीसारखा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर रक्तपेढीच्या नेतृत्वासह तांत्रिक कर्मचारी-वृंदाची त्यासाठीची मानसिकता आणि दुसरे म्हणजे संसाधने. सुदैवाने रक्तपेढीच्या प्रारंभापासूनच रक्तपेढीचे विश्वस्त मंडळ आणि संचालक तांत्रिक प्रगतीला केवळ पूरक आहेत असे नव्हे तर ते याबाबतीत कमालीचे आग्रही आहेत. अर्थात संस्थेच्या मूळ उद्देश्याशी हे अत्यंत सुसंगत आहे कारण अद्ययावत तंत्रज्ञान हे रक्ताच्या सुरक्षिततेची व गुणवत्तेची खात्री देते. गरजू व्यक्तीस ’रक्तदान हे जीवनदान आहे’ असे खात्रीपूर्वक सांगता येऊ शकते ते यामुळेच. इथला तांत्रिक कर्मचारी-वर्गदेखील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी कायमच तत्पर राहिलेला आहे.
 
यातला दुसरा भाग आहे तो संसाधनांचा. रक्तपेढीसाठी लागणारी बहुतांश उपकरणे ही आयात करावी लागणारी व अत्यंत महागडी. रक्तसुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रक्तप्रक्रिया करायच्या तर त्याकरिता लागणाऱ्या उपकरणांची एकूण किंमत ही काही कोटींच्या घरातली. मग एकीकडे रक्तसुरक्षितता व दुसरीकडे वाजवी प्रक्रियामूल्य यांचा मेळ बसणार कसा ? हा योगक्षेम चालावा कसा ?
 
’योगक्षेमं वहाम्यहम्’ ची प्रचिती येते ती इथे !
रक्तपेढीची प्रयोगशाळा इतरांना दाखवताना जेव्हा ’सर्व रक्ताचे विघटन येथे स्वयंचलित पद्धतीने होते’ असे आम्ही म्हणतो तेव्हा हे स्वयंचलित रक्तविघटक आम्हाला उपलब्ध करुन देणाऱ्या ’इंडोशॉटले’ किंवा ’रेनिशॉ’ सारख्या कंपन्या सहजपणे आठवतात, नॅको (National AIDS Control Organization) सारख्या सरकारी यंत्रणेने दिलेले बहुमोल सहकार्यही आठवते. रक्ततपासणीची स्वयंचलित एलायजा प्रयोगशाळा दाखवताना ’बॅंक ऑफ़ महाराष्ट्र’ आणि ’कॉग्निझंट’चे स्मरण होते. रक्तसाठवणुकीचे शीतागार दाखविताना मिनिलेक, इंटरवेट सारख्या कंपन्या आणि श्री. मणियार, श्रीमती गद्रे यांच्यासारखे दाते नजरेसमोर तरळतात. रक्तघटकांची शीतसाखळी सांभाळून ’सुमो ग्रॅंडी’सारख्या वाहनातून वाहतुक करताना तसेच रक्तदान शिबिरांसाठी कर्मचारी-वर्ग व अन्य साहित्यांची वाहतुक करताना ’रोटरी क्लब, पुणे मेट्रो किंवा ’रोटरी क्लब, गणेशखिंड’चे योगदान विसरता येत नाही. शिबिरांमधून ’रक्तसंकलन निरीक्षक’, सीलर्स किंवा रक्तदात्यासाठी अद्ययावत आरामदायी खुर्च्यांची ने-आण करताना ’ए.आर.ए.आय.’, एच.डी.एफ़.सी., इन्फ़ोसिस अशा कंपन्यांची आठवण होते. रक्तविकिरकासारखी अद्ययावत यंत्रणा सर्वांना अभिमानाने दाखवताना त्यामागे भरभक्कमपणे उभी असलेली ’कॉग्निझंट फ़ौंडेशन’ सारखी संस्था आम्हाला स्पष्टपणे दिसते. किती नावे सांगावीत ?
गेली पस्तीस वर्षे हा ’योगक्षेम’ या ना त्या रुपाने समाजच चालवित आलेला आहे. वर उल्लेख केलेल्या गीतेतील वचनाची आम्हाला येत असलेली प्रचिती ही अशी आहे. असे कितीतरी दाते आज ’जनकल्याण’शी जोडले गेलेले आहेत. त्यात बहुराष्ट्रीय कंपन्या, बॅंका, कारखाने, सामाजिक संस्था आणि कुटुंबे / व्यक्ती अशा सर्वांचा समावेश आहे. सर्वांचा नामोल्लेख करायचा झाल्यास संपूर्ण लेख या नावांतच संपेल, नावे मात्र संपणार नाहीत. यातील कित्येक जण तर रक्तपेढीला सातत्याने मदत करीत आलेले आहेत. एका प्रसिद्ध ऊर्दू काव्यामध्ये म्हटल्यानुसार ’...खुदा बंदे से खुद पुछे, बता तेरी रजा क्या है ?’ अशाही प्रकारचे अनेक अनुभव रक्तपेढीच्या गाठीला जमा आहेत. अर्थात हे काही सहजसाध्य नाही, तर ही स्थिती येण्यासाठी ’खुदी को कर बुलंद इतना...’ ही पूर्व अट असतेच. आम्हालाही ती चुकलेली नाही आणि चुकुही नये. भगवान श्रीकृष्णांनीही भक्तांचा ’योगक्षेम’ चालविण्याचे अभिवचन देताना अट घातली आहेच. ’समाजहितार्थ स्वच्छ भावनेने, निरपेक्ष वृत्तीने व पूर्ण क्षमतेनिशी काम’ हीच ती अट आहे. रक्तपेढीच्या स्थापनेपासूनच या गोष्टी हेच कामाचे मुख्य भांडवल राहिलेले आहे आणि रक्तपेढीच्या संस्थापक मंडळाबरोबरच आजवर जोडलेल्या सर्व रक्तदाते व शिबिरसंयोजकांचेही यात मोलाचे योगदान आहे. कदाचित यामुळेच निरनिराळ्या उपक्रमांसाठी कुणाचा न कुणाचा तरी मदतीचा हात पुढे येतोच आणि संबंधित उपक्रम सक्षमपणे समाजासाठी राबविला जाण्याची काळजी रक्तपेढी व्यवस्थापन नंतर घेते.
 
मी रक्तपेढीत रुजू झाल्यानंतर काही महिन्यांतच घडलेली एक घटना मला आठवते. एका कॉर्पोरेट संस्थेकडुन ’रक्तदात्यांसाठी आरामदायी खुर्च्या’ खरेदी करण्यासाठी आम्हाला मोठी मदत मिळाली होती. संबंधित कंपनीमध्ये धन्यवाद देण्याच्या निमित्ताने आम्ही भेटायला गेलो होतो. ’नजिकच्या एका कार्यक्रमात ही मदत औपचारिकरित्या आपण द्यावी आणि रक्तपेढीच्या वतीने सन्मानही स्वीकारावा’ अशी विनंती आम्ही या कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र यावर त्यांनी ताबडतोब उत्तर दिले, ’तुमच्या रक्तपेढीबाबत जी काही माहिती आम्हाला घ्यायची होती ती प्रस्तावादरम्यान आम्ही घेतली आहेच, आता जाहीर कार्यक्रम वगैरे तर राहुच द्या, पण अमुक एक गोष्ट आम्ही दिली, असा उल्लेखही कुठे केला नाही तरी चालेल. खरोखरीच आमची काहीच अपेक्षा नाही.’ एवढे बोलुनच ते थांबले नाहीत तर त्याप्रमाणे त्यांच्या कंपनीचा उल्लेख कुठेही होणार नाही, असे वचनच त्यांनी आमच्याकडुन घेतले. कॉर्पोरेटमध्ये राहुनही दानासंबंधी असलेला इतका स्वच्छ दृष्टिकोन – भलेही तो धोरणात्मक असेल - आम्हाला सुखवूनही गेला आणि शिकवूनही गेला. शिवाय हा अपवादात्मक अनुभव आहे, असेही नाही. यानंतरही कमी-अधिक फ़रकाने असे अनुभव अनेक दात्यांच्या बाबतीत आम्हाला आले आहेत.
 
आज रक्तपेढीची अद्ययावतता बघताना आणि इतरांनाही ती दाखवत असताना त्या मागे उभ्या असलेल्या अशा असंख्य दात्यांचा क्षणभरही विसर पडणार नाही, याची पुरेपूर काळजी आम्ही आमच्या परीने घेत असतोच. रक्तपेढीची ओळख सादरीकरणांतून अनेक ठिकाणी करुन देत असतानाही अशा दात्यांचा आम्ही गौरवाने उल्लेख करायला कधीही विसरत नाही. याखेरीज मिळालेल्या दानाचे उत्तरदायित्वही (accountability) आजवर रक्तपेढी कसोशीने पाळत आलेली आहे. समाजाकरिता समाजानेच दिलेलं दान हे पुरेपूर वापरलं जाईल, त्याची योग्य ती काळजी घेऊन ते दीर्घकाळ उपयोगात राहील, संबंधित दात्यांना त्याबद्दलची माहिती वेळोवेळी कळवली जाईल या सर्व बाबींवर रक्तपेढी व्यवस्थापनाचा कायमच कटाक्ष असतो.
 
’हे समाजाचे काम आहे आणि म्हणूनच ते चालण्याची जबाबदारीही समाजच घेत आहे’ असेच जनकल्याण रक्तपेढीचे स्वरूप होते, आहे आणि पुढेही ते राहील. ज्या हेतुने हे काम सुरु झाले तो हेतु अबाधित आणि अविचल ठेवणे हे आमचे दायित्व आहे. हा हेतु जोवर अविचल आहे, तोवर समाजरुपी भगवंत हा योगक्षेम सक्षमपणे चालवील यात आम्हाला मुळीच शंका वाटत नाही.
 
 
 
 
महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@