छत्तीसगढमधील बिलासपूर येथे झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. नोटबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर त्यानिमित्ताने राहुल गांधी आणि काही काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका केली होती. पंतप्रधानांनी या टीकेला आज जाहीरपणे प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्या सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे अनेक बोगस कंपन्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळेच आज मायलेकांना जामिनावर बाहेर राहण्याची वेळ आली आहे.” असे मोदींनी यावेळी म्हटले आहे.
“नोटबंदीआधी देशातील जनतेचा पैसा हा कुणाच्या बिछान्याखाली असायचा, कुणाच्या थैल्यांमध्ये असायचा तर कुणाच्या कपाटात असायचा. नोटबंदीमुळे हा सगळा पैसा बाहेर काढावा लागला. आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने हा पैसा लोकांच्या भल्यासाठी खर्च करत आहोत. काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीचे पंतप्रधान म्हणायचे की दिल्लीतून एक रुपया दिला तर शेवटच्या माणसापर्यंत फक्त १५ पैसे पोहोचतात. मग तो कुठला पंजा होता, जो ८५ पैशांवर डल्ला मारायचा? कुठला पंजा १ रुपयाचे १५ पैसे बनवायचा? असा सवाल मोदींनी केला. तसेच ते ८५ पैसे आता बाहेर आले आहेत. असेही मोदी म्हणाले.
“ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भ्रष्टाचाराशिवाय ज्यांनी काही केलेले नाही. ते आज आमच्यावर टीका करत आहेत. “कधी ‘स्वच्छ भारत’ योजनेची खिल्ली उडवतात तर कधी आमच्या पर्यटन धोरणावर टीका करतात. पण कोणी कितीही टीका केली तरी जनतेचा आशीर्वाद हा आम्हालाच लाभाणार आहे. आम्हाला विकासाच्या वाटेने जायचे आहे.” असे पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/