मै जिंदगी का साथ निभाता चला गया...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018   
Total Views |


 

सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवत प्रगती करणे सोपे नाही. सुदाम तुपे या निवृत्त क्लास वन ऑफिसरचे जगणे म्हणजे याचे उत्तम उदाहरण...

 

पनवेल येथे वास्तव्य असलेल्या सुदाम यांची गेवराईला शेती आहे. राहायला जरी ते गेवराईला नसले तरी, शेतीकडे पोटच्या पोरासारखं सुदाम यांचं लक्ष. १०-१२ एकर असणाऱ्या शेतीमध्ये ते अगदी रमून जातात. आता कुणी म्हणेल की, त्यात काय एवढं? शेतकरी आहेत म्हणून पारंपरिक काम करत असतील, असे वाटते. पण, तसे नाही. या ’तसे नाही’ मध्येच सुदाम यांच्या आयुष्याचा पीळ सुटत जातो. गेवराईतील पिंपळगावच्या शिवाजीराव तुपे आणि रेऊबाई यांना चार मुले. दोन मुली आणि दोन मुलगे. त्यापैकी एक सुदाम. तथाकथित सामाजिक स्तरावर उतरंडीला असलेल्या वंचित समाजातील हे कुटुंब. आर्थिक परिस्थिती म्हणजे अठरा विश्वे दारिद्य्र. सुदाम यांचे वडील शिवाजीराव मोलमजुरी करत. दुसऱ्याच्या शेतात राब राब राबत. अफाट कष्ट, विवंचना यामुळे शिवाजीरावांचा अकाली मृत्यू झाला. त्यावेळी सुदाम केवळ तीन वर्षांचे होते. पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा पूर्ण भार रेऊबाईंवर आला. नशिबाला दोष देत रडण्यापेक्षा त्यांनी परिस्थितीशी नेटाने सामना केला.

 

चार कच्च्या-बच्च्यांच्या मुखात दोन वेळचे अन्न जावे यासाठी तिचे जगणे सुरू होते. हे जगणे म्हणजे कष्टाची कमाल मर्यादा होती. सुदाम यांच्या आयुष्याचा पट उलगडताना रेऊबाईंचे जगणे सांगणे महत्त्वाचे आहे. कारण, गरिबीमध्ये भाकरीची चिंता असताना रेऊबाईंनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. सुदाम यांची शाळा गावापासून सहा किलोमीटर दूर. वाटेत दोन नद्या लागायच्या. पावसा-पाण्याच्या दिवसात त्यामुळे शाळेत जाणे मुश्किल होत असे. त्या कठीण परिस्थितीतही सुदाम चौथी पास झाले. पुढे जायचे, तर त्याहीपुढे शिकायला लागणार. तिथे राहणे, खाणे शिकणे याचा खर्च न परवडण्यासारखा. यातच रेऊबाईंना आणि सुदामला कुणीतरी सांगितले की, रिमांड होममध्ये पोरांना पैसे न देता राहायला, खायला आणि शिकायला मिळतं. रेऊबाईंच्या आशा पल्लवित झाल्या. तिने अधिक चौकशी केली आणि कळले की, तिथे गुन्हेगार पोरंच राहू शकतात. रेऊबाईंनी रिमांड होमचा विषय सोडला. पण, लहानगा सुदाम मात्र म्हणे, “आई, तुला मला शिकवायचं आहे ना? आपल्याकडे पैसे नाय, तर मी गुन्हा करून रिमांड होममध्ये जाऊ का? रिमांड होम म्हणजे काय गं आई.” यावर रेऊबाई काय बोलणार? पण शेवटी गेवराई तालुक्यात बोर्डिंगमध्ये सुदामची व्यवस्था झाली. गोरगरिबांच्या मुलांसाठीचे बोर्डिंग. पण, सुदामला शिकायचे होते. आई दुसऱ्यांच्या शेतात अंग मोडून काम करायची. जराही उसंत घ्यायची नाही. बाजाराच्या दिवशी गवत कापून विकायला न्यायची. या सगळ्या कामात सुदाम तिच्या बरोबर काम करायचे. त्यावेळी त्यांच्या मनात यायचे, आपल्या आईचे स्वत:चे शेत असते तर? या दिवसांत सुदाम यांच्या डोळ्यांसमोर शिक्षण हेच एकमेव ध्येय होते. वॉचमन, लिफ्टमन अशी काम करता करता सुदाम पदवीधर झाले. मात्र, भाकरीच्या चंद्राने इच्छांच्या सूर्याला कधीही उगवू दिले नाही.

 

पदवीधर झाल्यानंतर सुदाम मुंबईला आले. इथेही वॉचमनची नोकरी करू लागले. सरकारी नोकरीचे फॉर्म भरू लागले. महानगरपालिकेमध्ये क्लार्कच्या जागेसाठी त्यांची निवड झाली. आयुष्यात थोडं आर्थिक स्थैर्य आलं. पण, सुदाम त्यानंतर शांत बसले नाहीत. त्यांनी मुख्याधिकाऱ्याची परीक्षा दिली. आयुष्यात कष्ट करण्याची, सहनशीलतेची सवय होतीच. ते मुख्याधिकाऱ्याची परीक्षा पास झाले. क्लास वन ऑफिसर म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी काम केले. औरंगाबाद, लातूर, रायगड, पेण, पनवेल, माथेरान, रत्नागिरी, खोपोली, बदलापूर येथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. प्रश्न घेऊन येणारे लोक त्यांच्या समस्या, त्यांचा त्रास सुदाम जाणून घेत. ते त्यांच्यासाठी नवीन नव्हतंच. प्रत्येकाच्या प्रश्नांतून त्यांना आईचे आणि स्वत:चे कष्ट आठवायचे. कष्टाची लाज नव्हती, खंतही नव्हती. पण, त्या दिवसांत मन मारून जगणे आणि आपण मन मारीत आहोत ही जाणीवही नसणे, हे आठवून त्यांना वाटे की, आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येकाचे प्रश्न आपल्या अखत्यारीत सुटलेच पाहिजेत. दिवस जात होते, पण आईची शेती असावी हे बालपणाचे स्वप्न ते विसरले नव्हते. त्यांनी गावी शेती घेतली. जिथे त्यांची आई मजूर म्हणून मान मोडून काम करायची, तिथे आता ते शेतमालक झाले. यावर त्यांचे म्हणणे आहे की, “आयुष्य सगळे शिकवते. आता एकच ध्येय आहे की, मातंग समाजात ‘आयएस’ या पदावर ७० वर्षांत थेट नियुक्ती झालेली नाही. समाजामधून या पदासाठी उमेदवार तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न करायचे. प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्यांना सहकार्य करण्यात मी नेहमीच पुढे असेन.”

 

मै जिंदगी का साथ निभाता चला गया...’ म्हणत समाजाची साथ निभावणारे असे हे सुदाम तुपे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@