‘अशी पुस्तके होती’: विस्मृत पुस्तकांचा खजिना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018   
Total Views |


 


‘अशी पुस्तके होती’ या नव्या पुस्तकात १८५० ते १९४५ या काळात प्रकाशित झालेल्या आणि आता वाचकांच्या स्मृतीआड गेलेल्या मराठी पुस्तकांबद्दल मुकुंद वझे यांनी सविस्तर लिहीलं आहे.


असं म्हणतात की, आज लिहिलेली एखादी चिठ्ठी-चपाटीदेखील भविष्यात एक महत्वाचा दस्तावेज ठरू शकते. लिहीलं गेलेलं एखादं पुस्तक त्याकाळात कदाचित फार दखल पात्र ठरलं नसेलही पण, काळाच्या ओघात विशिष्ट कालखंडाचा उभाछेद म्हणून ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. अशा पुस्तकांचा अभ्यास आपल्यासाठी अनेक अपरिचित दालनं उघडून देऊ शकतो. याच कारणाने याच कुतूहलातून मुकुंद वझे जुन्या पुस्तकांचा अभ्यास करू लागले. यापूर्वी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीतील सदर, ‘प्रवासवर्णनांचा प्रवास’ हे पुस्तक यांच्या माध्यमातून त्यांनी जुन्या काळातील पुस्तकांची फक्त दखल घेतली आहे. ‘अशी पुस्तके होतीया त्यांच्या नव्या पुस्तकात १८५० ते १९४५ या काळात प्रकाशित झालेल्या आणि आता वाचकांच्या स्मृतीआड गेलेल्या मराठी पुस्तकांबद्दल त्यांनी सविस्तर लिहीलं आहे. त्यातून उभा राहणारा १००-१२५ वर्षांपूर्वीचा कालखंड पाहणे, औत्सुक्याचे आहे. या पुस्तकांचा अभ्यास करणं जितकं ज्ञानवर्धक आहे तितकंच रंजकही आहे.

 

तत्कालीन समाजाचा आरसा

 

कुठलाही लिखित मजकूर, मग तो काल्पनिक असो किंवा खरा असो, तो लिहिला जाण्याच्या काळाचा तो आरसा असतो. लेखक जगत असलेल्या भोवतालाचेप्रतिबिंब जाणते-अजाणतेपणी त्यात पडतच असते. पुस्तकात आढावा घेण्यात आलेली मराठी नाटकं ऐतिहासिक, सामाजिक, विनोदी अशा विविधप्रकारांची आहेत. नाटक सामाजिक असेल, तर तत्कालीन परिस्थिती त्यात थेट रेखाटली जाणं स्वाभाविक आहेच पण, ऐतिहासिक नाटक अथवा फार्समधूनदेखील कुटुंबव्यवस्था, तिचा भोवताल यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन दिसतो. समाज मनाच्या कलानेच लेखन करणारे लेखक त्याकाळीही प्रामुख्याने दिसणं स्वाभाविकच होतं पण, अशा विचारांना छेद देणारे अनेक लेखक त्या कर्मठ काळातही होते, हे या पुस्तकाच्यानिमित्ताने आपल्याला कळतं. विशेष म्हणजे सुधारणावादीविचार हे फक्त वैचारिकलेखांमधून आणि विदवत्तापूर्ण ग्रंथांमधूनच मांडले जायचे असं नाही, तर नाटकासारख्या रंजन करणाऱ्या माध्यमांमधूनही मांडले जायचे. पु. ग. सहस्रबुद्धेलिखित ‘वधुसंशोधन’ या ८० वर्षांपूर्वीच्या विनोदी नाटकात उपवर मुलगा व मुलगी यांनी एकमेकांना आधी भेटून मग पसंती कळवावी, अशा मताचे वडील दाखवणं हा काळाच्या पुढचाच विचार म्हणायला हवा. तत्कालीन समाजधारणेला छेद देणाऱ्या फक्त नाटकाचाच नाही, तर कथासंग्रहाचादेखील ‘अशी पुस्तके होती’मध्ये वेध घेतला गेला आहे. कृष्णाबाई मोटे यांच्या ‘अनिरुद्धप्रवाह’ या कथासंग्रहातून स्त्रीमुक्तीचा हुंकार दिसतो. रोमँटिक वातावरणाने भारलेले कॉलेजकुमारही दिसतात. या कथा आधुनिक नवकथेचे जनक मानले गेलेल्या पुरुष लेखकांच्या आधी लिहिल्या गेल्या आहेत हे विशेष. अशा पुस्तकांची आवर्जून दखल घेऊन त्यांना या पुस्तकात स्थान दिल्याने मुकुंद वझे यांचाही त्या काळाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन जाणवतो.

 

विषयांचे वैविध्य

 

पुस्तकात आढावा घेण्यात आलेल्या पुस्तकांच्या विषयांचा पट विस्तृत आहे. संगीत नाटकं, फार्स, प्रवासवर्णन, सामाजिक प्रश्न, भारतीय भाषांमधील साहित्यकृतींचे अनुवाद, रोजनिशी, १९०९चा दिवाळी अंक, जुन्या काळातील हिमालयीन गिर्यारोहण अशा विविध विषयांवरील जवळपास ३० प्रकरणं आहेतआमची जात’ या पुस्तकातून आपल्या जातीची क्षत्रिय मुळं शोधण्यासाठी खूप खटाटोप करून माहिती गोळा करणारे त्याची संगतवार मांडणी करणारे जी. बी. नाईक नावाचे लेखक दिसतात. ‘हिंदुस्थानातील दुष्काळ’ आणि ‘दुष्काळ निवारण’ या पुस्तकांमधून विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भेडसावणार्या दुष्काळी स्थितीचा ऊहापोह आणि त्यावर सुचवलेल्या उपाय योजना दिसतात. ते वाचून आजवर त्या उपायांकडे कधीही गांभीर्याने पाहिले गेले नाही आणि १०० वर्षांनंतरही आपल्याला तेच प्रश्न भेडसावत आहेत हे जाणवून मन निराश होतं. ‘पेशवाईच्या सावलीत’ या पुस्तकातून हिशोबासारख्या रूक्ष विषयाला हात घालून ना. गो. चापेकर यांनी पेशवाईच्या काळातील धार्मिक संस्कारांवर होणारे अमापखर्च, तनखे, काम करवून घेण्यासाठी कारकुनाला दिले जाणारे पैसे (लाच!), फक्त ब्राह्मणच नाही, तर इतर समाजातील लोकांनाही मिळणारी दक्षिणा व जेवणावळीचे लाभ यांची ऐतिहासिक महत्त्वाची (आणि आज अतिशयक रंजक वाटणारी) माहिती कशी संपादित केली हेही यात दिसते.

 

साधक-बाधक चर्चा

 

मुकुंद वझे त्या त्या पुस्तकाचा सारांश मांडून थांबत नाहीत. ते त्या पुस्तकाच्या अंतरंगात शिरतात. पुस्तक कोणत्या काळात, कोणत्या परिस्थितीत लिहीलं गेलं, संबंधित लेखकाचं इतर साहित्य कोणतं, हे ते सांगून पार्श्वभूमीही मांडतात. पुस्तकाचं कथानक आणि मांडणी या अनुषंगाने बलस्थानं आणि त्रुटी या दोन्हींची चर्चा करतात. काही ठिकाणी त्या त्या पुस्तकाच्या विषयाशी संबंधित अन्य साहित्य कृतींचे हे संदर्भ देऊन मुद्दे अधिक स्पष्ट करतात. (उदा. ‘शिवाजीला शह’ या नाटकाबद्दल लिहिताना त्यातील संभाजी राजांचे चित्रीकरण आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मधील चित्रीकरण यांच्या संबंधीची तपशीलवार चर्चा.) अशा स्वरूपाच्या विश्लेषणातून त्यांचा व्यासंग दिसून येतो. पुस्तक वाचताना या सर्व खजिन्याचं अप्रूप वाटत राहतंच पण, त्याचबरोबरीने अभ्यासण्यासारख्या अजून किती गोष्टी शिल्लक आहेत याची जाणीव होते. मुकुंद वझे यांची निरीक्षणं सूक्ष्म आणि मार्मिक आहेत. राजकीय प्रभावाप्रमाणेच सांस्कृतिक प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने इंग्रज सरकारने पुरस्कृत केलेले इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद, तत्कालीन अनेक भारतीय लेखकांची इंग्रजांप्रतीची स्वामिनिष्ठा यांच्या संबंधीची वझे यांची निरीक्षणं १९व्या शतकातील शासनव्यवस्था आणि शिक्षित अभिजन यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकतात.

 

ताळेबंद

 

मुकुंद वझे यांना बहुतांश पुस्तकं इंटरनेटवरून (बरीचशी शोधाशोध करून) मिळाल्याचं पुस्तकाच्या प्रस्तावनेतून कळतं. छापील आवृत्त्या संपलेली ही दुर्मिळ पुस्तकं महाजालावर नक्की कुठे मिळू शकतात हे त्या त्या लेखाखाली दिलं असतं, तर बरं झालं असतं. त्याचबरोबर त्या त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ, त्यातील एखादं चित्र हे ही लेखासोबत छापलं असते, तर पुस्तकाला अधिक उठाव आला असता. पुस्तकात काही त्रुटी राहिल्या आहेत. प्रत्येक लेख संदर्भांनी परिपूर्ण आहे खरा पण, ते संदर्भ देण्यामध्ये सुसूत्रता नाही. काही ठिकाणी संदर्भ चालू वाक्यातच कंसामध्ये येतात, काही ठिकाणी तळटीप म्हणून येतात, तर काही ठिकाणी लेखाच्या शेवटी येतात. या शिवाय विरामचिन्हांच्या चुकाही राहून गेल्या आहेत. अशा त्रुटींमुळे काही लेखांना यामुळे लेखाला एकसंधपणा येत नाही. पुढच्या आवृत्तीमध्ये या त्रुटी दुरुस्त केल्यास पुस्तक निर्दोष होण्यास मदत होईल. ‘Books on books (पुस्तकांवरील पुस्तकं)’ हा मराठीत फारसा हाताळला न गेलेला हा साहित्य प्रकार अलीकडे प्रकाशित झालेल्या ‘लीळा पुस्तकांच्या’, ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’, ‘आडवाटेची पुस्तकं’ इ. पुस्तकांमुळे लक्षवेधून घेऊन लागला आहे. ‘अशी पुस्तके होती’ हेही त्या प्रवाहातील महत्त्वाचं नाव ठरावं. दृष्टीआड गेलेल्या सृष्टीत डोकवायचं असेल, आपल्या समाजाच्या धारणा आणि आपल्या पूर्वसुरींचे त्यावरचे भाष्य जाणून घ्यायचं असेल, तर ‘अशी पुस्तके होती’ अवश्य वाचायला हवं.

 
 

पुस्तक : ‘अशी पुस्तके होती’

लेखक : मुकुंद वझे

प्रकाशक : देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.

आवृत्ती : पहिली (८ जानेवारी, २०१८)

पृष्ठसंख्या : २७२

किंमत : ३०० रुपये


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@