बिहारमधील जागावाटपाने भाजपला दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018   
Total Views |



बिहारमधील या जागावाटपावर मुख्यमंत्री नितीशकुमार समाधानी असल्याचे दिसते. रामविलास पासवानही फारशी खळखळ करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. मात्र, उपेंद्र कुशवाहा हे नाराज असल्याचे समजते. ते सध्या भाजप व राष्ट्रीय जनता दल दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते. कुशवाहा यांचा पक्ष लहान असला तरी बिहारच्या जातीय राजकारणात ते लहान का होईना भूमिका बजावू शकतात.


बिहारमध्ये भाजप व मित्रपक्षांमध्ये जागावाटप झाल्याने भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये राज्यातील ४० पैकी २२ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पार्टी व उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाने एकूण १० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर राज्यातील समीकरणे बदलली. जनता दल (यु) ने भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि जनता दलाने भाजपच्या बरोबरीने जागा मागितल्या होत्या. त्यातून एक पेचप्रसंग तयार झाला होता. त्यावर आता भाजपने तोडगा शोधला असून, भाजप व जनता दल (यु) प्रत्येकी १७-१७ जागा लढतील तर रामविलास पासवान यांच्या पक्षाला ५ तर उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला एक जागा देण्यात आली आहे. बिहारमधील या जागावाटपावर मुख्यमंत्री नितीशकुमार समाधानी असल्याचे दिसते. रामविलास पासवानही फारशी खळखळ करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. मात्र, उपेंद्र कुशवाहा हे नाराज असल्याचे समजते. ते सध्या भाजप व राष्ट्रीय जनता दल दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते. कुशवाहा यांचा पक्ष लहान असला तरी बिहारच्या जातीय राजकारणात ते लहान का होईना भूमिका बजावू शकतात. बिहारमध्ये भाजप आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर राज्यातील लढत भाजप आघाडी व काँग्रेस आघाडीत होईल, हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आघाडीत राष्ट्रीय जनता दल, जीतनराम मांझी यांचा पक्ष राहणार आहे. बिहारमध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर काँग्रेसमध्ये परतल्याने पक्षाला थोडा दिलासा मिळाला आहे. या आघाडीत उपेंद्र कुशवाहा यांना ओढण्याचे प्रयत्न तेजस्वी यादव यांच्याकडून सुरू असल्याचे समजते. बिहारमधील या जागावाटपानंतर, भाजप महाराष्ट्रातील जागावाटप पूर्ण करेल, असे समजते. शिवसेना सध्या भाजपच्या विरोधात भूमिका घेत असली तरी शेवटी भाजपसोबत युती होईल, यावर पक्षनेते आश्वस्त असल्याचे समजते. महाराष्ट्रात युती होणे फार गरजेचे असून, त्यात जराही अडचण नसल्याचे भाजप नेत्यांना वाटते. शिवसेनेला तयार करणे फार अवघड काम नाही, असेही भाजपला वाटते.

 

आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील स्थिती

 

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडण्याचा निर्णय घेतला आहे, तर जगनमोहन रेड्डींसोबत भाजपची युती होण्याचे संकेत भाजपमधून दिले जात आहेत. तसे झाल्यास भाजपसाठी ही एक चांगली बाब असेल. तेलंगणातील तेलंगण राष्ट्रीय समिती विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवित असली तरी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सरकार बनविताना, हा पक्ष भाजपसोबत असेल, असे संकेत पक्षाचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांनी दिले आहेत.कर्नाटकातील स्थिती मात्र भाजपला काहीशी प्रतिकूल राहील, असे संकेत राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांनी दिले आहेत. भाजपने शिमोग्याची आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले असले तरी बेल्लारीतील पराभव भाजपसाठी चिंता निर्माण करणारा आहे.

 

हत्या एका पत्रकाराची

 

एक लहानशी घटना साऱ्या देशाला किती अडचणीची ठरू शकते, जगात त्या देशाची किती नाचक्की होत असते, याचा अनुभव सौदी अरेबिया सध्या घेत आहे. इस्लामिक जगाची अघोषित राजधानी मानला जाणारा हा देश, जमाल खाशोगी या पत्रकाराच्या हत्येने अडचणीत आला आहे. खाशोगीने सौदी अरेबियाच्या शाही परिवाराविरुद्ध युद्ध छेडले होते. अमेरिकेच्या ’वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकासाठी काम करणाऱ्या खाशोगीच्या लिखाणाने शाही परिवार संतापला होता आणि शाही परिवाराचा युवराज प्रिन्स सलमानने आपल्या १५ मारेकऱ्यांचा चमू पाठवून खाशोगीची हत्या करविली. या प्रकरणात आता नवीनवी माहिती समोर येत आहे. खाशोगीला आपल्या प्रेयसीसोबत विवाहबद्ध व्हावयाचे होते. त्यासाठी त्याला काही दस्तावेज हवे होते. ते मिळविण्यासाठी तो टर्कीमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात गेला. खाशोगी दूतावातास शिरताच, त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर सौदी अरेबियाच्या शाही परिवाराने पाठविलेले होते. खाशोगीच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. त्याचा मृतदेहाचा पुरावा कुणाच्याही हाती लागू नये म्हणून काही रसायनांचा वापर करून ते वितळविण्यात आले.

 

नवा चमू

 

खाशोगीच्या हत्येची बातमी जगभर पसरली. अमेरिकेसह काही देशांनी चौकशीची मागणी सुरू केली. या चौकशीत आपण अडचणीत येऊ, याची कल्पना आल्यानंतर प्रिन्स सलमानने पुन्हा दोघा तज्ज्ञांना टर्कीत पाठविले. खाशोगीच्या हत्येचे कोणतेही पुरावे सौदी अरेबियाच्या वकिलातीत राहणार नाहीत याची खात्री करून घेण्याची जबाबदारी या दोघा अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. त्यांनी सौदी दूतावासाला भेट दिली. खाशोगीच्या हत्येचे कोणतेही पुरावे नाहीत, याची खात्री करून घेतली आणि त्यानंतर दूतावासाची दारे चौकशीसाठी टर्की पोलिसांना उघडण्यात आलीत. मात्र, तरीही खाशोगीच्या हत्येचे काही पुरावे टर्की पोलिसांना सापडले आहेत. खाशोगीच्या देहाचे तुकडे करण्यात आल्यानंतर त्यांची विल्हेवाट अन्यत्र लावली गेल्यास ती बाब उघडकीस येऊ शकते याचा विचार करून, हायड्रोफ्लुरिक अॅसिडमध्ये ते विरघळविण्यात आले. या अॅसिडचे अंश वकिलातीतील विहिरीत व सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये सापडले. म्हणजे सांडपाण्याचे विश्लेषण करून खाशोगीच्या हत्येचा तपास केला जात आहे आणि हा सारा तपास वकिलातीच्या आत केला जात आहे, हे विशेष. भारतीय चौकशी संस्थांनी बोध घ्यावा, असे हे प्रकरण आहे. टर्की पोलीस या प्रकरणात किती परिश्रम करीत आहेत, याचा हा पुरावा आहे. या घटनेने सौदी अरेबियाची जगभर नाचक्की झाली, ती वेगळीच.

 

विरोध मावळला

 

खाशोगीच्या हत्येनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र, सौदी अरेबिया हा अमेरिकेचा एक विश्वासू मित्र राहिला असल्याने, नंतर त्यांनी कारवाईचा विचार सोडून दिला, असे सांगितले जाते. पण, आता खाशोगीच्या हत्येचे पुरावे बाहेर आल्यानंतर ट्रम्प यांचे विरोधक या प्रकरणी त्यांनी कठोर भूमिका घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@