ही मदत की भीक?; काँग्रेस मंत्र्याने खेळाडूंवर क्रीडासाहित्य फेकले

    01-Nov-2018
Total Views |



कर्नाटकात आणखी एका मंत्र्याचा प्रताप


बंगळूरू : कर्नाटकात सत्तेत असलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाय दिवसेंदिवस अधिकच गाळात चालल्याचे दिसत आहे. एकीकडे या आघाडीतील बिघाडी आणि दुसरीकडे सरकारमधील मंत्र्यांचे एकेक प्रताप रोज नव्याने समोर येत आहेत, आणि हे सरकार टीकेचे लक्ष्य बनत आहे. काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्या नव्या प्रतापामुळे या परिस्थितीत आणखी भर पडली आहे.

 

स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे महसूलमंत्री देशपांडे यांनी त्यांच्या मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी खेळाडूंना वाटप करण्यासाठी आणलेले क्रीडा साहित्य त्या खेळाडूंना वाटण्याऐवजी चक्क त्यांच्याकडे फेकून दिले. देशपांडे यांनी थेट मंचावरूनच उभे राहून खाली उभ्या असलेल्या खेळाडूंच्या दिशेने क्रीडा साहित्य भिरकावले. त्याचे झाले असे की, कारवार जिल्ह्यातील देशपांडे यांचा मतदारसंघ असलेल्या हल्याळ येथे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या स्टेडियमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या सत्कार समारंभाचाही कार्यक्रम होता. या खेळाडूंची यादी मोठी होती व सत्कार स्वीकारणाऱ्या अनेक खेळाडूंना गर्दीमधून मंचापर्यंत पोहचण्यास थोडा वेळ लागत होता. दुसरीकडे मंत्री आर. व्ही. देशपांडे यांना पुढील कार्यक्रमासाठी जाण्याची घाई होती. त्यामुळे त्यांनी खेळाडूंना व्यासपीठावर येऊ न देता चक्क खालीच थांबवून त्यांना वाटप करायचे क्रीडासाहित्य खेळाडूंकडे फेकण्यास सुरूवात केली.

 
 
 

देशपांडे यांच्या या कृतीचा व्हिडीओ गुरूवारी समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला तसेच, कर्नाटकसह देशभरातील अनेकांनी या कृतीवर जोरदार टीका केली. मात्र, स्वतः देशपांडे यांनी ही घटना तितकी गंभीर नसल्याचे सांगत काही जण उगीच राईचा पर्वत करण्याच्या मागे लागले असल्याचे स्पष्टीकरण दिले. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे ज्येष्ठ बंधू व सरकारमधील मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी हासन येथे पूरग्रस्तांना मदत म्हणून आणलेले साहित्य व खाद्यपदार्थ इ. पूरग्रस्तांकडे अशाच रीतीने फेकून दिले होते. त्यानंतर आता महसूलमंत्री देशपांडे यांचीही अशाच प्रकारची कृती उघडकीस आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/