कन्फ्युज्ड राहुल गांधी आणि कॉंग्रेस...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून पक्षाचा विकास आणि विस्तार करण्याची नैतिक जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर आहे. मात्र, ते ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू शकतील की नाही, याबाबत शंका वाटते. राहुल गांधी कॉंग्रेस पक्षाचा फायदा करून देण्यासाठी सतत धडपडत असतात, मात्र या धडपडीत ते कॉंग्रेस पक्षाचा फायदा कमी आणि नुकसान जास्त करून देतात! आपल्या कृतीने कॉंग्रेस पक्षाला एक पाऊल पुढे नेत नेहमीच दोन पावले मागे आणतात.
 
 
 
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचार करण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्यावरच आहे. मात्र, आपल्या वागणुकीने आणि बोलण्याने ते पक्षाला सतत अडचणीत आणत असतात. त्यामुळेच राहुल गांधी यांची प्रतिमा कॉंग्रेस पक्षासाठी- ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे! आपण काय बोलत आहोत, आणि कसे वागत आहोत, याचे भान राहुल गांधी यांना राहात नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजिंसह चौहान यांचे पुत्र कार्तिकेयिंसह यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेला मानहानीचा खटला. राजकीय नेत्यांनी एकदुसर्यावर आरोप-प्रत्यारोप करायचे असतात. मात्र, कोणताही आरोप करताना तो अभ्यास करून आणि पूर्ण जबाबदारीने करायचो असतो, म्हणजे मग फजिती होत नाही. मध्यप्रदेशातील झाबुआ येथील प्रचारसभेत भाषण करताना राहुल गांधी यांची जीभ घसरली. पनामा पेपर लीक प्रकरणात मामाजींच्या मुलाचे नाव असल्याचा आरोप- ‘उचलली जीभ लावली टाळूला’ या पद्धतीने राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष कुणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या आरोपांचा रोख, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजिंसह चौहान आणि त्यांचे पुत्र कार्तिकेयिंसह यांच्याकडे होता.
 
मध्यप्रदेशात शिवराजिंसह चौहान ‘मामाजी’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आरोपांचा रोख विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिवराजिंसह चौहान आणि त्यांच्या मुलाची प्रतिमा डागाळण्याचा होता, हे स्पष्ट आहे. पण, झाले भलतेच! शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या मुलावर केलेला आरोप राहुल गांधी यांच्यावरच बुमरँग झाला. मुख्यमंत्री शिवराजिंसह चौहान आणि त्यांच्या मुलावर शिंतोडे उडवण्याच्या प्रयत्नात, आरोपांचे शिंतोडे राहुल गांधी यांच्याच पांढर्याशुभ्र कपड्यांवर उडाले. राहुल गांधी यांचे हसे आणि फजिती झाली ती वेगळीच.
 
 
प्रत्यक्षात राहुल गांधी यांना आरोप, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणिंसह आणि त्यांच्या मुलावर करायचा होता. पण, त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजिंसह यांच्या मुलावर करून टाकला. आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर राहुल गांधी यांनी घूमजाव केले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि अन्य भाजपाशासित राज्यांत इतके घोटाळे आहेत की त्यामुळे मी कन्फ्युज्ड झालो होतो, अशी सारवासारव राहुल गांधी यांनी केली. पण ‘बुंदसे गयी सो हौदसे नही आती’ अशी राहुल गांधी यांची स्थिती झाली.
 
 
लोकांच्या मनात जे होते, त्याची कबुली आपल्या विधानातून राहुल गांधी यांनी दिली. राहुल गांधी जे काही बोलत असतात, ते ऐकून ते कन्फ्युज्ड आहेत, हे आतापर्यंत देशातील लोकांना वाटत होते, त्यावर राहुल गांधी यांनी आपल्या तोंडानेच शिक्कामोर्तब करून टाकले! लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेत भाषण करताना राहुल गांधी यांनी, आपण पप्पू असल्याची कबुली दिलीच होती, आता त्यांनी कन्फ्युज्ड असल्याची कबुलीही देऊन टाकली. कन्फ्युज्ड असल्यामुळेच राफेल सौद्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरताना राहुल गांधी, राफेल विमानाच्या किमती वेगवेगळ्या सांगतात. यातून आपले हसे होते, याचे भानही त्यांना राहात नाही.
जो नेता कन्फ्युज्ड आहे, तो आपल्या पक्षाचे नेतृत्व कसे करणार, हा महत्त्वाचा प्रश्न राहुल गांधी यांना भेडसावत नसला, तरी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भेडसावत आहे. कन्फ्युज्ड राहुल गांधींकडे देशाचे नेतृत्व कसे सोपवायचे, असा प्रश्न देशातील जनतेलाही पडला आहे. मुळात राहुल गांधी कन्फ्युज्ड असले, तरी देशातील जनता कन्फ्युज्ड नाही, तर ती पूर्णपणे भानावर आहे. त्यामुळेच आतापर्यंत देशात जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यातील एकाही निवडणुकीत जनतेने राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला जनादेश दिला नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसला जनादेश मिळण्याची शक्यता नाही.
 
 
 
बोलताना एखाद्वेळी चूक झाली तर स्लीप ऑफ टंग म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येईल, पण एखादा माणूस बोलताना सातत्याने चुकाच करत असेल, तर त्याच्या आयक्यूबद्दल लोकांना शंका येणे स्वाभाविक आहे. झाबुआच्या सभेत झालेली चूक कमी होती की काय म्हणून, राहुल गांधी यांनी खरगोनच्या सभेत पुन्हा तशीच चूक केली. यावेळी त्यांच्या चुकीची पातळी वाढली. आधी त्यांचा दोन राज्यांतील मुख्यमंत्र्यांमध्ये गोंधळ उडाला, आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामुळे उडाला. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर राष्ट्रपतींचे नाही तर पंतप्रधानांचे भाषण होत असते, एवढे सामान्य ज्ञान पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणार्या राहुल गांधी यांना राहिले नाही.
 
‘‘देश का राष्ट्रपती जाता है, लालकिले पे खडा होता है, और देश को कहता है, भाईयो और बहनो,’’ असे तारे राहुल गांधी यांनी तोडले. राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणायचे होते. पण, त्यांनी राष्ट्रपती असे म्हटले, हे आता या देशातील जनतेने समजून घेतले पाहिजे. पंतप्रधान व्हायची कोणतीच शक्यता नसल्यामुळे राहुल गांधी गोंधळले आहेत, त्यामुळे ते अशा छोट्याछोट्या चुका करत असतात, त्यामुळे जनतेने त्यांना माफ केले पाहिजे. देशातील जनतेलाच काय, पण कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनाही राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे असे वाटत नाही. त्यामुळे अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही तसे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. मात्र, तरीही आपण पंतप्रधान व्हावे, असे राहुल गांधी यांना अधूनमधून वाटत असते.
 
पंतप्रधानपद हे आपल्या घराण्यासाठी राखीव असल्याचा त्यांचा समज झाला असावा. त्यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, त्यांची आजी श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यांचे वडील राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यांची आई श्रीमती सोनिया गांधी अंतरात्म्याचा आवाज आल्यामुळे पंतप्रधान होताहोता राहिल्या. त्यामुळे मीपण पंतप्रधान का होऊ शकणार नाही, असे राहुल गांधी यांना वाटत असते. त्यांना असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यांची त्यात काहीच चूक नाही. कॉंग्रेसचे अध्यक्षपद ज्याप्रमाणे आपल्याला मिळाले, त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधानपदही मिळाले पाहिजे, असे राहुल गांधी यांना वाटत असते.
 
 
पंतप्रधानपद हे भातुकलीच्या खेळातील पद नाही. मुळात जी व्यक्ती छोट्याछोट्या गोष्टींमुळे कन्फ्युज्ड होते, ती पंतप्रधानपदासाठी कशी पात्र राहू शकते? पंतप्रधानपदासाठी खंबीर आणि मानसिकदृष्ट्या स्थिर आणि सक्षम व्यक्तीची गरज असते. जिची चलबिचल होते, ती व्यक्ती एवढे महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद कसे सांभाळू शकेल, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. राहुल गांधी यांना स्वत:च्या भवितव्याची चिंता भेडसावत असली, तरी देशातील जनतेला देशाच्या भवितव्याची चिंता असते. देशाचे नेतृत्व दूरदृष्टीच्या आणि विकासासाठी समर्पित असणार्या नेत्याकडे असले पाहिजे, असे जनतेला वाटत असते, त्यामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने नरेंद्र मोदी यांना स्पष्ट बहुमताचा कौल दिला होता.
2019 मध्येही यापेक्षा वेगळे काही होणार नाही. लाल किल्ल्यावरून भाषण द्यायचे म्हणजे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसल्यामुळे दिवाळीच्या या दिवसात राहुल गांधी यांनी तुघलक रोडवरील आपल्या निवासस्थानी मातीचा किल्ला बांधून आणि त्याला लाल रंग देऊन लाल किल्ल्याचे आपले स्वप्न पूर्ण केले पाहिजे. म्हणजे त्यांचा पुन:पुन्हा गोंधळ उडणार नाही, ते वारंवार कन्फ्युज्ड होणार नाहीत...
 
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@