हे पचनी पडे न माझ्या !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2018   
Total Views |
 
 

पंतप्रधान, राष्ट्रपती यांसारख्या देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान व्यक्तींच्या खानपानाची, राहणीमानाचीही साहजिकच विशेष काळजी घेतली जाते. त्यांना कुठल्याही सोयीसुविधा अपुर्‍या पडणार नाहीत, यासाठी शेकडोंचा फौजफाटा त्यांच्या सेवार्थ तैनात असतो. या सर्वोच्च नेत्यांच्या सुरक्षिततेची जितकी डोळ्यात तेल घालून काळजी घेतली जाते, तितकीच त्यांच्या जेवणात वापरणार्‍या तेलाचीही...कारण, इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीला कोणत्याही कारणास्तव आजारपण ओढवलेले देशालाच परवडणारे नसते.

  

जशी परिस्थिती आपल्याकडे तशीच देशाबाहेरही. पंतप्रधान-राष्ट्रपतींच्या सरकारी निवासस्थानातही त्यांच्या पौष्टिक आहाराकडे विशेष लक्ष दिले जातेच. इस्रायलमध्येही पंतप्रधानांच्या निवासस्थानी स्वादिष्ट जेवण बनविणार्‍या महाराजांची फौज तैनात असतेच. पण, इस्रायली पंतप्रधानांच्या पत्नीला कदाचित ते जेवण रुचकर वाटले नसावे. कारण, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या पत्नी सारा नेतान्याहू यांनी एका सरकारी अधिकार्‍याला हाताशी धरून हॉटेलमधून जेवणांच्या ऑर्डरी दिल्या. साहजिकच, त्याचे बिल चिकटवले ते सरकारदरबारी. आपण पंतप्रधानांच्या पत्नी, त्यातच जे खाद्यपदार्थ बाहेरून मागवले ते पंतप्रधान निवासस्थानी....तर आपल्याला कोण विचारतंय, या तोर्‍यात कदाचित सारा यांनी ‘सारासार’ विचार केलाच नाही आणि झाले उलटेच. सारा नेतान्याहूंच्या या हॉटेलच्या बिलांचा आकडा थोडाथोडका नाही, तर तो तब्बल एक लाख डॉलरपर्यंत पोहोचला. मग काय, याची कायदेशीर तक्रार नोंदविण्यात आली आणि हे प्रकरण रीतसर न्यायालयात गेले. विशेष म्हणजे, या प्रकरणात सारा दोषी आढळल्यास त्यांना तब्बल पाच वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. कारण, इस्रायलच्या कायद्यान्वये, घरात महाराज आणि जेवण बनवणारे सरकारी कर्मचारी उपस्थित असताना अशाप्रकारे बाहेरून जेवण मागवून, त्याचे बिलही सरकारी तिजोरीतून वसूल करणे, हा अपराध ठरतो. खरं तर हे प्रकरण जूनमध्येच उघडकीस आले, पण त्याची पहिली सुनावणी नुकतीच करण्यात आली.

 

या पहिल्या सुनावणीत बहुतांशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात फिर्यादी सारा नेतान्याहू यांच्याविरोधातील हा कायदेशीर खटला मागे घेण्याची शक्यता तशी धूसरच. त्यातच पंतप्रधान नेतान्याहूही आपल्या पत्नीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेले दिसले आणि त्यांनी सगळे आरोपही चक्क फेटाळून लावले. या प्रकरणामुळे नेतान्याहू विरोधकांना त्यांच्या विरोधात आयते कोलीत तर मिळालेच आहे, शिवाय यामुळे त्यांच्या प्रतिमेलाही धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. चारवेळा इस्रायलचे पंतप्रधानपद भूषविणारे बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या ५९ वर्षीय पत्नी सारा यांच्याविषयी एका इस्रायली पत्रकाराने २०१७ साली विचित्र टिप्पणी केली होती. बेंजामिन यांच्याशी भांडण झाल्यामुळे साराने त्यांना लाथ मारून गाडीतून बाहेर फेकल्याची अश्लाघ्य टीका त्या पत्रकाराला नंतर चांगलीच महागात पडली. पण, सारा यांच्याविरोधातील ही काही पहिली तक्रार नाही. २०१६ साली जेरूसलेमच्या एका कामगार न्यायालयाने सारा नेतान्याहूंविरोधात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सारा नेतान्याहूंनी घरातील कर्मचार्‍याचा अपमान करून त्याच्यावर संतप्त झाल्याचे न्यायालयाने म्हटले होते. पंतप्रधानांच्याच पत्नीच्या निष्काळजीपणाची साक्ष देणारे आता पुन्हा हे एक नवीन प्रकरण न्यायदानासाठी समोर आले आहे. त्याचा निकाल काय लागतो, ते आगामी काळात कळेलच. पण, अशाप्रकारे सरकारी तिजोरीतील पैसा खानपानावर उधळणे निश्चितच शोभनीय नाही.

 

भारतातही केजरीवालांच्या समोश्यांचा असाच लाखोंचा हिशोब बघून दिल्लीकर जनतेचा संताप झाला होता. पण, कसेबसे त्यांनी ते प्रकरण निभावून नेले म्हणायचे. म्हणजे एकीकडे मनोहर पर्रिकरांसारखा साधी राहणी, सामान्य जीवनशैली जगणारा गोव्याचा मुख्यमंत्री, तर दुसरीकडे स्वत:ची आणि इतरांची जनतेच्या कररूपी पैशातून पोटं भरणारी ही नेतेमंडळी. म्हणजे, जनता उपाशी आणि नेते तुपाशी अशीच ही दयनीय परिस्थिती. पण, आता काळ बदललाय. कुठलाही खर्च फार काळ जनतेपासून लपून राहू शकत नाही. त्यामुळे पचनी पडो अथवा न पडो, नेत्यांनी, त्यांच्या आप्तस्वकीयांनी आपल्या पोटाला जरा आवरावेच; अन्यथा निवडणुकीतही अपचन झाल्याशिवाय राहणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@