काळाच्या कसोटीवर फसलेले गठबंधन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2018   
Total Views |

 

 

 
 
 
पाच राज्यांतील निवडणुकांसाठी सर्वच पक्षांचा प्रचार सुरू असला तरी प्रचारात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसते. भाजप विरुद्ध सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे विरोधकांचे स्वप्न या निवडणुकीवेळी तरी स्वप्नच राहणार. कारण कोणताही कार्यक्रम वा धोरणे नाहीत केवळ भाजपला हटविणे या एककलमी कार्यक्रमासाठी विरोधकांची मोट कशी बांधणार? अन लोकसभा निवडणुकांसाठी ‘महागठबंधन’ कसे काय अस्तित्वात येणार?
 

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच जनमत चाचण्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यात सत्तापरिवर्तन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने विरोधक आत्ताच जिंकल्याच्या थाटात वावरू लागले आहेत. तसेच पाच राज्यांत होत असलेला उपांत्य सामना जिंकला की, २०१९ साली ज्या लोकसभा निवडणुका होत आहेत, त्यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव होणार आणि विरोधकांचे सरकार येणार, असे अनेकांना वाटू लागले आहे. पण या जनमत चाचण्या किती विश्वासार्ह असतात, ते वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमधून दिसून आले आहे. त्यामुळे त्यावर विश्वासून आताच ‘जितं मया’ म्हणत आनंदाने उड्या मारण्यात काही अर्थ नाही, हे विरोधकांना कोणी तरी सांगायला हवेराष्ट्रीय लोकशाही आघाडीला हरविण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न गेल्या कित्येक महिन्यांपासून चाललेले असताना त्यामध्ये यश येत नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. पंतप्रधान कोणी व्हायचे यावर विरोधकांमध्ये एकमत होताना दिसत नाही. कोणाला मायावती पंतप्रधान व्हाव्यात, असे वाटते तर कोणाला ममता बॅनर्जी व्हाव्यात, असे वाटते. राहुल गांधी यांनी तर आपणच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहोत, असे म्हटले होते पण आता एकूण रागरंग पाहून त्यांनी दोन पावले माघार घेतल्याचे दिसून येत आहे. तर काही विरोधकांचे म्हणणे, आधी भाजपला हरविणे, हे आमचे प्रमुख ध्येय आहे. ते साध्य झाले की, पंतप्रधान कोण होणार, हा प्रश्न एवढा महत्त्वाचा असणार नाही! हे सर्व पाहता विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्याचेच दिसून येते. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभास सरकारी खर्चाने हजेरी लावलेल्या विविध नेत्यांनी जो ऐक्याचा आव आणला होता, तो केवळ भ्रमाचा भोपळा होता, हे आता ज्या घटना घडत आहेत त्यावरून दिसते.

 

विरोधक एकत्र येणे खूप कठीण असल्याचे प्रत्यंतर बसप सर्वेसर्वा मायावती यांनी राजस्थान आणि मध्य प्रदेशात स्वत:च्या बळावर निवडणूक लढविण्याची जी घोषणा केली आहे त्यावरून दिसून येते. केवळ मायावती यांनीच आपली वेगळी चूल मांडलेली नाही तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आता आपण काँग्रेसची फार काळ वाट पाहू शकत नसल्याचे स्पष्ट करून, युतीसाठी मायावती यांच्या पक्षाशी बोलणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘’काँग्रेसची आम्ही खूप वाट पाहिली, त्या पक्षाने आम्हाला खूप वाट पाहावयास लावली. आणखी किती वाट पाहायची? आता वाट पाहणे बस झाले,” असे सांगून अखिलेश यादव यांनी, “आपण मध्य प्रदेश व छत्तीसगढ निवडणुकीच्या दृष्टीने गोंडवाना गणतंत्र पक्ष आणि आता बसप यांच्याशी बोलणी सुरू करीत आहोत,” असे स्पष्ट केले आहे. या घडामोडी घडल्या असतानाही, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, मायावती यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याचा काँग्रेसच्या निवडणूक भवितव्यावर काही परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे. मायावती आणि त्यापाठोपाठ अखिलेश यादव यांनी काँग्रेसला दोन हात दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असूनही मध्य प्रदेशात आपल्या पक्षाला चांगले भवितव्य आहे, असे राहुल गांधी कशाच्या बळावर म्हणत आहेत? विरोधकांच्या ऐक्याबद्दलचे चित्र अजून खूपच धूसर असताना ‘बहन मायावती’ यांना आपण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदावर बसवू, अशी घोषणा भारतीय लोकदलाचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला यांनी केली आहे. गोहाना येथे आयोजित ‘सम्मान दिवस’ मेळाव्यात बोलताना, “आपला पक्ष काँग्रेस सोडून अन्य विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करील,” असे त्यांनी म्हटले आहे. “मायावती यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी विरोधकांना संघटित करण्याचे कार्य आपण करीत आहोत,” असे त्यांनी म्हटले आहे. येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे. देवीलाल यांचे पुत्र असलेले ओमप्रकाश चौटाला हे तिहार मध्यवर्ती कारागृहातून दोन आठवड्यांच्या पॅरोलवर बाहेर आले असून त्या दरम्यान आयोजित सभेत त्यांनी मायावती यांना पंतप्रधानपदी बसविणार असल्याची घोषणा केली. ओमप्रकाश चौटाला यांनी या आधी, २५ सप्टेंबर २०१४ रोजी जिंदमध्ये आयोजित सभेत भाषण केले होते. त्यानंतर कालच्या रविवारी झालेले त्यांचे पहिलेच जाहीर भाषण होते!

 

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रचार जोरदार चालू असल्याचे दिसून येत आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांची नुकतीच मध्य प्रदेशातील इंदूर येथे जाहीर सभा झाली. त्या सभेत बोलताना, “भाजपकडे गेल्या साडेचार वर्षांमध्ये काय केले?, याचा हिशोब मागणार्‍या राहुल गांधी यांनी, त्यांच्या चार पिढ्यांनी देशासाठी काय केले? याचा हिशोब द्यावा,” अशी मागणी अमित शाह यांनी केली. “राहुल गांधी यांनी आपल्या डोळ्यांवर इटालियन चष्मा चढविला असल्याने त्यांना सर्जिकल स्ट्राईकचे महत्त्व दिसून येत नाही,” अशी टीका त्यांनी केली. “काँग्रेसने घुसखोरी होऊ दिली, आधी घुसखोरीला विरोध करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आता घुसखोरांच्या बाजूने बोलू लागल्या आहेत पण भाजप एकूण एक घुसखोरांना देशाबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही,” असे अमित शाह यांनी स्पष्ट केलेपाच राज्यांतील निवडणुकांसाठी सर्वच पक्षांचा प्रचार सुरू असला तरी प्रचारात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. भाजप विरुद्ध सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे विरोधकांचे स्वप्न या निवडणुकीच्या दरम्यान तरी स्वप्नच राहणार, असे दिसून येऊ लागले आहे. कोणताही कार्यक्रम नाही, धोरणे नाहीत केवळ भाजपला सत्तेवरून हटविणे या एककलमी कार्यक्रमासाठी विरोधकांची मोट कशी बांधली जाणार? मग लोकसभा निवडणुकांसाठी ‘महागठबंधन’ कसे काय अस्तित्वात येणार?

 

केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांनी, गठबंधनाचा विचार याआधीही मांडण्यात आला होता, त्या दिशेने पावले टाकण्यात आली होती, पण हे सर्व प्रयोग फसले असल्याचे जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे. चंद्रशेखर... विश्वनाथ प्रतापसिंह... चरणसिंह... इंद्रकुमार गुजराल आणि देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली असे प्रयोग करण्यात आले. त्यांच्या कारकिर्दीत धोरणांची हत्या झाली आणि ती सरकारे काही महिनेच टिकली. हे सर्व पाहता ‘महागठबंधना’ चे जे प्रयोग करण्यात आले, त्यातील अपयश देशाने अनुभवले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे असे कोणतेही गठबंधन यशस्वी होणार नसल्याचेच त्यांनी लक्षात आणून दिले. भाजपला सत्तेवरून हटविण्याचा जंगजंग प्रयत्न विरोधक आगामी काळात करणार, हे उघड आहे पण त्यात विरोधक यशस्वी होणार का? आधी त्यांचे गठबंधन तरी अस्तित्वात येते का आणि आले तर ते किती काळ टिकणार हा खरा प्रश्न आहे. भाजपला हरविणे ही त्यानंतरची ‘दूर की बात’ आहे!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@