छत्तीसगढ : तिरंगी लढतीचा भाजपाला फायदा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक यावेळी तिरंगी होण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपा, कॉंग्रेस आणि अजित जोगी यांची जनता कॉंग्रेस व बसपाच्या मायावती यांची युती, अशी तिरंगी लढत होणार आहे. या तिरंगी लढतीचा फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्यात 15 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे आणि डॉ. रमणिंसह यांनी मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. यावेळीही भाजपा डॉ. रमणिंसह यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवत असून, राज्यातील ताज्या राजकीय घटनाक्रमामुळे लागोपाठ चौथ्यांदा ते मुख्यमंत्री होतील, याबाबत कुणाच्या मनात शंका राहिली नाही!
 
 
 
अजित जोगी यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत नवा पक्ष स्थापन करणे आणि मायावती यांच्या बसपाने कॉंग्रेसशी आघाडी न करता अजित जोगी यांच्या नव्या पक्षाशी आघाडी करणे या ताज्या घटनाक्रमामुळे, राज्यातील राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. मायावती यांच्या निर्णयाने कॉंग्रेसला मोठा हादरा बसला आहे. बसपा आपल्याशी आघाडी करेल, अशी राज्यातीलच नाही, तर दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांनाही पूर्ण खात्री होती, पण मायावती यांनी शेवटच्या क्षणी अजित जोगी यांच्या पक्षाशी हातमिळवणी करत राज्यातील कॉंग्रेसचा पंजा फ्रॅक्चर केला.
अजित जोगी राज्यातील लोकप्रिय नेते असले, तरी त्यांची प्रतिमा नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. अजित जोगी यांच्याशिवाय छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसजवळ नाव घेण्यासारखा दुसरा कोणताही नेता नव्हता. पण, अजित जोगीच बाहेर पडल्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना आनंद झाला असला, तरी राज्यातील कॉंग्रेसचे भवितव्य मात्र अंधकारमय झाले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांनी छत्तीसगड या नव्या राज्याची स्थापना केल्यानंतर, अजित जोगी यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र, त्यानंतर राज्यात झालेल्या सलग तीन निवडणुकांत ते कॉंग्रेसला सत्तेवर आणू शकले नाहीत. सनदी अधिकारी राहिलेले अजित जोगी आपल्या कामापेक्षा वादग्रस्त घटनांनीच नेहमी चर्चेत राहिले. सनदी अधिकारी असले, तरी जोगी यांची राजकारणात रुची होती. राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पद्धतशीर मोर्चेबांधणी केली होती.
जोगी रायपूरला जिल्हाधिकारी असताना राजीव गांधी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. राजीव गांधी विमान घेऊन रायपूरला आले, तर आपल्याला त्यांची लगेच सूचना मिळाली पाहिजे, अशी व्यवस्था जोगी यांनी करून ठेवली होती. त्यानुसार ते राजीव गांधींसाठी आपल्या घरून चहा-नाश्ता घेऊन जात. 1986 मध्ये कॉंग्रेसला मध्यप्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्यासाठी अनुसूचित जाती-जमातीच्या एका नव्या चेहर्याची गरज होती. त्यानुसार पंतप्रधान राजीव गांधींनी अजित जोगी यांचे नाव निश्चित केले. अजित जोगींच्या घरी स्वत: राजीव गांधींनी दूरध्वनी केला. राजीव गांधींच्या सूचनेप्रमाणे मध्यप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले दिग्विजयिंसह अजित जोगी यांच्या निवासस्थानी रात्रीच पोहोचले आणि दुसर्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत अजित जोगी यांनी भोपाळ येथे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरत राजकारणात प्रवेश केला. आदिवासी म्हणून राजकारणात प्रवेश केलेल्या अजित जोगी यांनी ख्रिश्चन धर्म कधी स्वीकारला, हे कुणाला कधी समजलेच नाही! त्यामुळेच त्यांच्या आदिवासी असण्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. प्रकरण उच्च न्यायालयातही गेले. राजकारणात कुणाशी कसे जुळवून घ्यायचे, यात जोगी हुशार होते. राज्यसभा सदस्य असताना, श्रीमती सोनिया गांधी दर रविवारी ज्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात त्याच चर्चमध्ये अजित जोगी बरोबर पोहोचत असत. याचा चांगला फायदा त्यांनी उचलला.
 
कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांनी 1998 मध्ये एकदा एका विमानप्रवासात, माझ्याबरोबर दोन भावी मुख्यमंत्री प्रवास करत आहेत, असे विधान केले होते. त्यांचा रोख सुभाष यादव आणि अजित जोगी यांच्याकडे होता. त्यांनी छत्तीसगडचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित जोगी यांचा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे त्या वेळी वेगळ्या छत्तीसगड राज्याची घोषणाही झाली नव्हती! पण, छत्तीसगड राज्याची घोषणा झाल्यावर अजित जोगी त्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
सनदी अधिकारी राहिल्यामुळे अजित जोगी यांना सरकारी यंत्रणा कशी काम करते, याचा पूर्ण अनुभव होता. मात्र, आपल्या मनमानी आणि एककल्ली कार्यपद्धतीमुळे अजित जोगी यांनी राजकारणात मित्रांपेक्षा शत्रूंचीच संख्या वाढवली. कॉंग्रेसमध्येही त्यांचे फारसे कुणाशी पटत नव्हते. अजित जोगी यांच्याशी झालेल्या मतभेदामुळेच विद्याचरण शुक्ल यांनी कॉंगेसचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
 
आपल्या मुलाला- अमित जोगी याला- राजकारणात पुढे आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अजित जोगी अडचणीत आले. अमित जोगी याचा सरकारमधील तसेच पक्षाच्या कामातील हस्तक्षेप वाढत होता. ‘छत्तीसगडमधील संजय गांधी!’ अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली होती. याचा परिणाम अजित जोगी यांच्या प्रतिमेवर होत गेला.
2003 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बहुमत मिळू शकले नाही. त्या वेळी अजित जोगी यांनी एका भाजपा आमदाराला दूरध्वनी करत मुख्यमंत्रिपदाचे आमिष दाखवत काही आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याची सूचना केली होती, याची टेप बाहेर येताच मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हा प्रकार आपण श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेवरून केला असल्याची कबुली देत जोगी यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
 
 
 
 
2003 मध्येच मुख्यमंत्री असताना अजित जोगी आणि त्यांचा मुलगा अमित जोगी यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष रामअवतार जग्गी यांच्या हत्येचा आरोप झाला. या प्रकरणात 2007 मध्ये जोगी पिता-पुत्राला तुरुंगातही जावे लागले. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात कॉंग्रेसचे अनेक नेते मारले गेले. या प्रकरणात संशयाची सुईही अजित जोगी यांच्यावर होती. 2014 मध्ये अंतागढ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जोगी यांनी ऐनवेळी माघार घ्यायला लावली. त्याचीही टेप बाहेर आली. त्यावरून मोठे वादळ उठले.
 
 
सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर अजित जोगी एका अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांचा कंबरेखालचा पूर्ण भाग निकामी झाला. त्यामुळे अजित जोगी राजकीयदृष्ट्या संपले, असे अनेकांना वाटले. मात्र, त्यानंतरही जोगी यांनी हार मानली नाही. राजकारणातील त्यांची सक्रियता आणि प्रभाव कमी झाला नाही. आपल्या वागणुकीने जोगी यांनी कॉंग्रेस पक्षातील आपले महत्त्व कमी केले. त्यामुळेच संपुआच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात जोगी यांना फार काही मिळाले नाही.
जोगी यांचे कॉंग्रेसमध्ये आतबाहेर सतत सुरूच होतेच. 2018 मध्ये कॉंग्रेसमध्ये परतण्याचा दृष्टीने अजित जोगी यांनी हालचाली सुरू केल्या. कॉंग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची जोगी यांची मागणी होती. मात्र, ती मान्य न झाल्यामुळे त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत जनता कॉंग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. अजित जोगी-मायावती युतीमुळे कॉंग्रेसचे नुकसान मात्र निश्चित होणार आहे. कारण, अजित जोगी यांच्या पक्षाला जी मते मिळणार ती कॉंग्रेसचीच राहणार आहेत.
 
 
 
90 सदस्यीय छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत 2013 मध्ये भाजपाने 41 टक्के मतांसह 49 जागा जिंकल्या होत्या, तर कॉंग्रेसने 40 टक्के मतांसह 39 जागा मिळवल्या होत्या. त्या वेळी भाजपाला 10 जास्त मिळाल्या असल्या, तरी दोघांच्या मतांमध्ये एक टक्क्याचाच फरक होता. राज्यात त्या वेळी एक जागा बसपाला आणि एक अपक्षाला मिळाली होती. बसपाची मतांची टक्केवारी 4.3 होती. आता बसपाशी हातमिळवणी केल्यामुळे जोगी यांची ताकद वाढली आहे, याचा फटका कॉंग्रेसला बसणार आहे, तिरंगी लढतीत मतविभागणीचा थेट फायदा या वेळी भाजपाला मिळणार आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@