जखमींसाठीचा देवदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2018   
Total Views |


 
शिक्षणापासून ते स्वच्छतेपर्यंत विविध समाजकाऱ्यांमध्ये अग्रेसर सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतो. असाच एक अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेची तातडीने सेवा पुरवून जीवनदान देणारा माणूस म्हणजे संजय कोठारी. 
 

बाधाएँ आती हैं तो आएँ

घिरें प्रलय की घोर घटाएँ

पावों के निचे अंगारे

सिर पर बरसें यदि ज्वालाएँ

निज हाथों में हसते-हसते

आग लगाकर जलना होगा

कदम मिलाकर चलना होगा

 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे एखाद्या कामाचं व्रत अंगीकारणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कितीही संकटं आली, कितीही अडथळे आले तरी तो डगमगता कामा नये. कारण, अडथळे हे येतच असतात, संकटे येतच असतात, त्यांच्यावर मात करायची असते आणि पुढे जायचं असतं. तन-मन-धन लावून काम करायचं असतं. या सगळ्यांवर मात करून जो पुढे जातो, तो काहीतरी जगावेगळं आणि सर्वश्रेष्ठ करत असतो. अशा प्रकारच्या कामाचं व्रत अंगीकारणाऱ्या, समाजसेवेचा व समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या महनीय व्यक्ती आपल्या देशात खूप आहेत. मात्र, एखाद्या जखमीला, अपघातग्रस्तांना जीवदान देणारा कधीही सर्वश्रेष्ठच ठरत असतो. असंच एक व्यक्तिमत्त्व, ज्याने आतापर्यंत शेकडो अपघातग्रस्तांना यमदूताच्या तावडीतून सोडून जीवदान दिलंय, ते म्हणजे संजय कोठारी.

 

 
 

“हॅलो, संजू शेठ बोलतायत का? अमुक ठिकाणी अपघात झालाय... लवकर या,” असा फोन आला की, हातात असेल ते काम सोडायचं आणि आपली रुग्णवाहिका घेऊन त्या ठिकाणी पोहोचायचं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या जखमींना उचलून रुग्णवाहिकेत घालायचं आणि उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जायचं. फक्त दवाखान्यापर्यंत पोहोचवणंच नाही, तर त्या जखमींच्या उपचारासाठी जातीने लक्ष घालणं, पेशंट बेशुद्ध असेल तर त्याच्या नातेवाईकांना सांगणं, ओळख पटत नसेल तर ओळख पटविण्यासाठी जीवाचं रान करणं, जखमींना जीवदान देण्यासाठी एवढा सगळा आटापिटा करणारा हा अवलिया हे सगळं काम कोणत्याही स्वार्थाशिवाय करतोय. यामागे त्यांचा एकच हेतू, तो म्हणजे एखाद्याच्या जीवाचा तुकडा किंवा घरावरील छत्र हरवू नये.

 

 
 

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी असलेले संजय कोठारी हे व्यावसायिक आहेत. जामखेड शहरात गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांचा विविध क्षेत्रात व्यवसाय आहे. मात्र, संजयजी यांचा ओढा व्यावसायिकतेकडे कमी आणि समाजसेवेकडेच जास्त आहे. जामखेड परिसरातील लोक त्यांना ‘संजूशेठ’ याच नावाने ओळखतात. जामखेड तालुक्यातील कोणतेही क्षेत्र असो, त्यात त्यांचे योगदान नाही, असे सापडणारच नाही. संजयजी हे जामखेडमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत. या कालावधीत हजारो शेकडो जखमींसाठी ते ‘देवदूत’ म्हणूनच धावून आले आहेत. अनेकांचे संसार, घरे उद्ध्वस्त होताना त्यांनी वाचवली आहेत. हजारो अनाथ-वंचितांना मदत केली आहे. संजयजी हे सर्व काम त्यांच्या ‘कोठारी प्रतिष्ठान’अंतर्गत करत असतात. प्रतिष्ठानची स्वतःची अत्याधुनिक रुग्णवाहिका आहे, जी २४ तास गरजूंसाठी मोफत उपलब्ध असते.

 

 
 

जामखेड तालुक्यात उन्हाळ्यामध्ये नागरिकांसाठी पाणपोई, मोकाट जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश वाटप, बेवारस मृतदेहाच्या अंत्यविधीचा संपूर्ण खर्च करणे, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे, दिवाळीनिमित्त कैद्यांना व गोरगरिबांना मिठाई वाटप करणे, भारुडाद्वारे एड्स जनजागृती करणे, थंडीच्या दिवसात वृद्धांना स्वेटर व कपड्यांचे वाटप करणे, अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचाराविरुद्ध सतत संघर्ष करणे, तंटामुक्तीसाठी काम करणे, देहदान, रक्तदान अशा विविध क्षेत्रांत त्यांचे अविरत कार्य चालू आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय ते गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून जातात. घरात आर्थिक सुबत्ता असताना, उद्योगांचा डोलारा असताना संजयजींनी हे समाजसेवेचे व्रत हाती घेतले. त्यांच्या याच कामाची दाखल घेत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मात्र, “आपण पुरस्कार-प्रसिद्धीसाठी काम करत नसून समाजसेवेची आवड आहे म्हणून काम करत आलोय आणि इथून पुढेही मी करत राहीन,” असे ते आवर्जून नमूद करतात.

 

 
 

संजयजींच्या कामात त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच कामाचा वसा घेऊन त्यांचा मुलगा तेजस कोठारी देखील समाजसेवेत अग्रेसर असतो. जामखेड युथ क्लबच्या माध्यमातून तोदेखील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कामे करत आहे. संजयजी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना म्हणाले की, “व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीने यातून वेळीच सावरण्याची गरज आहे. व्यसनामुळे व थिल्लरपणामुळे अपघातांना आमंत्रण मिळते. कारण, आजपर्यंत मी जेवढ्या जखमींच्या मदतीला धावून गेलो आहे, त्यापैकी ७० टक्के अपघात हे व्यसनामुळे झालेले आढळतात. पिणारा पितो, मारणारा मारतो; मात्र ती व्यक्ती गेल्याने त्याच्यामागे त्याच्या कुटुंबीयांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे व एक आदर्श युवक म्हणून समोर यावे.” संजयजींच्या या समाजहितैषी कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 

@@AUTHORINFO_V1@@