मनपाच्या स्थायी समितीसभापतीची होणार मंगळवारी निवडमहिला व बालकल्याण सभापतीही ठरणार

    27-Oct-2018
Total Views |
 
 
 

मनपाच्या स्थायी समिती
सभापतीची होणार मंगळवारी निवड
महिला व बालकल्याण सभापतीही ठरणार



जळगाव, २६ ऑक्टोबर
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती निवडीसाठी मंगळवार, ३० ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडीच्या कार्यक्रमानुसार २४ ते २६ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे गरजेचे होते. यानुसार आज नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जितेंद्र भगवान मराठे यांनी स्थायी तर नगरसेविका मंगला चौधरी यांनी महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्र दाखल करताना भाजपाचे नगरसेवक हजर होते.
 
जितेंद्र मराठे यांच्या पहिल्या नामनिर्देशन पत्राला सूचक गटनेते भगत बालाणी व अनुमोदक सदाशिव ढेकळे तर दुसर्या नामनिर्देशन पत्राला सूचक चेतन सनकत तर अनुमोदक सुनील खडके आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापतीसाठी मंगला चौधरी यांच्या दोन्ही नामनिर्देशन पत्राना सूचक म्हणून रेश्मा भोळे तर अनुमोदक म्हणून सरिता नेरकर आहेत. याप्रसंगी महापौर सीमा भाळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, भाजपा गटनेते भगत बालाणींसह भाजपा नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. दरम्यान, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने आपला उमेदवार न दिल्याने जितेंद्र मराठे व मंगला चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. स्थायी, महिला व बालकल्याण समिती सभेत भाजपाचे प्राबल्य असल्याने त्यांचाच सभापती होणे निश्चित आहे. परंतु, विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेने आपला सभापतीपदासाठी उमेदवार न देता एकप्रकारे माघार घेतलेली दिसत आहे.