दो हंसो का जोडा, मध्ये पडला खोडा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



एकेकाळी ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही नेते आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे सदाभाऊंसारखा तळागाळातून आलेला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता तर दुसरीकडे राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.


सध्या देशात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी विरोधकांचं एकचं लक्ष्य आहे आणि ते म्हणजे भाजपला हद्दपार करायचं. यासाठी १ विरुद्ध १० पक्ष उभे राहिले तरी बेहत्तर पण भाजपला सत्तेतून बाहेर खेचायचंच. काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी भाजपचे विचार, कार्यपद्धती ज्यांना पटत होती, त्याच शेट्टींना अचानक त्याचे अजीर्ण झाले आणि त्यांनी महाआघाडीला रामराम ठोकला. यातच सध्या राज्यात गाजतोय तो मुद्दा म्हणजे खा. राजू शेट्टी विरुद्ध कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत. एकेकाळी ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही नेते आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे सदाभाऊंसारखा तळागाळातून आलेला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता तर दुसरीकडे राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. महायुतीतून बाहेर पडल्यानंतर शेट्टी यांनी भाजपवर आरोपांचे सत्रच सुरू केले आणि सातत्याने विरोधाची भूमिका घेतली. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकतीच ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली. केंद्रानेही शेतकरी कल्याणाचे अनेक निर्णय घेतले, परंतु यातच एकेकाळी सरकारला शेतकऱ्यांचे कैवारी मानून महाआघाडीत आलेल्या शेट्टी यांना सरकार अचानक व्हिलनच्या भूमिकेत दिसू लागले. मग जे होणार होते तेच झाले. उड्या मारण्याची सवय असलेल्यांना परके आपले वाटू लागले. अचानक भाजपही त्यांना जातीयवादी पक्ष वाटू लागला आणि राजू शेट्टींनी जातीयवाद्यांना आमचा विरोध असणारच, असे छातीठोकपणे जाहीर करून टाकले. दूध आंदोलन असेल किंवा कापूस सोयाबिनचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नांवरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. यातच समविचारी पक्षाचं तुणतुणं वाजवत त्यांनी भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांनाही सरकारविरोधात सोबत घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, भारिप आणि एमआयएमने एकमेकांशी गट्टी केल्यामुळे शेट्टींवर रिकाम्या हाती परतण्याची पाळी आली. या सर्वांमध्ये शेतकरी आंदोलनाचा आधार घेत त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यातच एमआयएमची आणि भारिपची जमलेली जोडी. त्यामुळे काँग्रेसच्या महाआघाडीसमोर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

 

उठसूट दिसेल त्याला आव्हान देण्याचं काम सध्या शेट्टी करत आहेत. यातून त्यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी सदाभाऊदेखील सुटले नाहीत. नोटाबंदीवरूनही सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्यात मतभेद झाले होते. सदाभाऊंनी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं तर जिल्हा मध्यवर्ती बँकांवर लादलेले निर्बंध शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहेत, असं सांगत राजू शेट्टी यांनी नोटाबंदीला विरोध केला होता. त्यानंतर शिवस्मारकाचे भूमिपूजन असेल किंवा वैयक्तिक वाद संघटनात्मक पातळीवर नेल्याचा मुद्दा असेल, या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा वाढत गेला. त्यानंतर सदाभाऊंनीदेखील आपण कोणाचे गुलाम बनून राहणार नसल्याचे जाहीर केले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात राजू शेट्टी यांनी आमदारकी, खासदारकी मिळवली होती. त्यांच्या वाटचालीत ऊस उत्पादकांचा जितका वाटा आहे, तितकाच संघटनेतील कार्यकर्त्यांचाही आहे. या कार्यकर्त्यांच्या यादीतून सदाभाऊ खोत यांना वगळता येणार नाही. संघटनेच्या ऊस परिषदेबरोबरच निवडणूक आणि अन्य मेळाव्यांमध्ये खोत यांच्याकडून सत्ताधारी आणि कारखानदारांवर डागली जाणारी तोफ आणि रोखठोक आरोप ऊस उत्पादकांना भावत होते. त्यावेळच्या सभांमधून त्यांच्या भाषणाला मिळणाऱ्या प्रतिसादातून ते स्पष्ट दिसत असे. आक्रमक वक्तृत्व शैली हा सदाभाऊंचा युनिक सेलिंग पॉईंट होता. आपल्याला मंत्रिपद मिळाल्यामुळेच आता संघटनेचे अध्यक्षपदही आपल्या हातून जाते की काय या भीतीने आपल्याविरोधात रान उठविण्याचं काम केलं जात आहे, अशी बोचरी टीकादेखील सदाभाऊंनी केली होती. मात्र, दोन्ही नेत्यांतील दुरावा इतका वाढत गेला की कालांतराने राजू शेट्टींकडून सदाभाऊंनाच संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यामुळेच आता शेट्टी विरुद्ध खोत असे समीकरण तयार झाले असून खोत यांनीदेखील निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. शेट्टी यांचा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यातील आहे. ऊसकरी शेतकरी हे संघटनेचे मोठे पाठबळ आहे. ज्या कारखानदारांविरोधात जाऊन शेट्टी यांनी शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला, त्याच कारखानदारांसोबत जाण्याच्या शेट्टींच्या पावित्र्यावर खोत यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आदेश दिल्यास आपण हातकणंगलेमधून शेट्टींविरोधात निवडणूक लढवायला तयार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. यापूर्वीही भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी सदाभाऊ खोत यांना माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची संधी दिली होती. त्यानंतर खोत यांनीदेखील जोरदार टक्कर देत मोहिते-पाटलांचा गड हादरवला होता. मात्र, अवघ्या २५ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. परंतु, आता पुन्हा एकदा सदाभाऊ लोकसभेसाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यावेळी त्यांचा विरोधक हा वेगळा असणार आहे. खा. राजू शेट्टी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातच रोखण्यासाठी खोत यांनी ‘गाव तेथे रयत संघटना’ हे टार्गेट ठेवत मोहिमेची आखणी नव्हे, कामालाच सुरुवात केली आहे. हातकणंगले मतदारसंघाबरोबरच संघटनेने उस्मानाबाद, माढा आणि ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

 

चार लोकसभा आणि २० विधानसभा मतदारसंघ हे लक्ष्य ठेवत संघटनेने मशागतीला सुरुवात केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. शिरोळ हा शेट्टी यांचा बालेकिल्ला. त्याच किल्ल्याला सुरूंग लावण्याचा खोत यांनी निर्धार केला आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून या तालुक्यात सतत मेळाव्यांचे आयोजन, कार्यक्रम, भेटीगाठीच्या माध्यमातून खोत यांनी आपला संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील ५४ गावांमध्येही संघटनेच्या शाखा काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर हातकणंगले व नंतर शाहूवाडी तालुक्यातील सर्व गावांत संघटनेच्या शाखा स्थापन करण्यासही सुरुवात झाली आहे. हातकणंगले तालुक्यात शेट्टी यांच्याविरोधात लढण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी अथवा काँग्रेसकडे सद्यस्थितीला एकही प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे भाजपच्या ताकदीवर खोत हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांचीही जोरदार तयारी सुरू असून भाजपकडूनही खोत यांच्याच नावाला पसंती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्वाभिमानी संघटनेच्या तुलनेत रयत संघटनेची ताकद कमी आहे. शेट्टी यांनी महायुतीची साथ सोडल्यामुळे ते भाजपविरोधातही रान उठवून महाआघाडीच्या जोरावर अधिक प्रबळ होण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढणे हे सदाभाऊंपुढील मोठे आव्हान असणार आहे. सदाभाऊ हे नक्कीच कच्च्या गुरूचे चेले नाहीत. त्यामुळे येत्या काळात राजू शेट्टी यांच्यासमोर सदाभाऊदेखील तितकेच मोठे आव्हान उभे करण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@