साय पांघरून दूध जाई झोपी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2018   
Total Views |
 
आम्हाला खूप पुढे असलेलं, म्हणजे आमच्या आवाक्याच्या बाहेर असलेलं आणि मग खूप मागे पडलेलं, म्हणजे आवाक्यात होतं पण आयुष्य धावत समोर सरकल्यानं मागे पडलेलं अन् आता वास्तव नसलेलं असंच जे काय असतं त्यात रस असतो. त्यासाठी आम्ही हळहळत असतो. त्याला मग आम्ही आमचं संचित समजतो. ते गमावल्याचं आमचं दु:खही फार भर्जरी करतो. आजचं वास्तव हे आमच्या हक्काचं असतं. आमच्या ताब्यात असतं, मात्र आम्हाला त्यात रस नसतो अन् त्याचमुळे त्याचा आनंदही नसतो. बरं, जे काय आम्ही गमावलं असं आम्हाला वाटतं त्यासाठी आम्ही स्वत: कधीच जबाबदार नसतो. त्यासाठी जबाबदार असतीलच कुणी तर ते इतर असतात. आम्ही ते परत मिळविण्यासाठी काहीच करणार नसतो, आम्हाला ते करायचं नसतं, आमच्या ते आवाक्यातलं नसतं. कारण आम्ही ते गमावल्याला जबाबदार नसतो, हे पक्कं ठरलेलं असतं.
 
 
यात मग अनेक सणवार, रीत, परंपरा असेच काहीसे असते. त्यांचे स्वरूप बदललेले असते. आधीसारखे काही राहिले नाही आता, असे म्हणत आम्ही एक दीर्घ उसासा टाकत असतो. आता भुलाबाईचे दिवस आलेले आहेत. या दिवसांत तर ही खंत खूपच मोठ्या प्रमाणात व्यक्त होत असते. कारण गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी हे सारेच आम्ही दणक्यातच साजरे करतो. अगदी जन्माष्टमीदेखील दहीहंडीचे कार्यक्रम करत साजरे करत असतो. त्यात आता भोंडला म्हणजे भुलाबाईची गाणी मात्र जवळपास लुप्त झाली आहेत. ‘सर्च’ केलीत तर ती इंटरनेटवर सापडतात. ती डाऊनलोड करून घेता येतात. मात्र, तो काळ काही डाऊनलोड करता येत नाही. करता आला कधी तर आमच्या ओंजळीत तो मावतही नाही. मग भावलीची ही गाणी जी काय होती त्यांचे संदर्भ आम्ही शोधत राहतो. जगून झालेला भूतकाळ रस्त्यांवरच्या हमखास खड्यांसारखा कधीकधी वाटेत आडवा येतो आणि मग आम्हाला दचके बसतात. भुलाबाईच्या गाण्यात किती वाङ्मयीन श्रीमंती होती, त्यातले अव्यक्ताच्या अवकाशात व्यक्त झालेले खूपकाही आम्हाला कसे कळले, याचे दाखले समीक्षकी थाटात आम्ही देत असतो. अशी आवर्तने येत राहतात आमच्या गप्पांमध्ये आणि या प्रत्येकच आवर्तनाच्या अखेरीस हे आम्ही गमावल्याचा नालायकपणा केलाय्, ही खंत सोनेरी किनारीसारखी असते.
 
 
जुन्या संदुकीत ठेवलेल्या पैठणीचा काळपट पडलेला वर्ख कुरवाळून घ्यावा वाटतो, तसेच आम्ही या गाण्यांच्या आठवणींवरून हात फिरवून घेत असतो. त्याचे विविध अर्थ काढतो.
परवा ‘तभा’तच बातमी होती. अमरावतीत आता सार्वजनिक भुलाबाई मांडण्यात आली आहे. भुलाबाईच्या उत्सवाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी असे करण्यात आल्याचे या नवोत्सवाचे कर्ते सांगत होते. अनेक ठिकाणी भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्धा होते. ज्यांना ही गाणी पाठ आहेत त्या प्रौढ बायकांचे कोण कौतुक होते. संस्कृती टिकवून ठेवण्यासाठीचा हा आटापिटा आहे. बरे, यातही आमचा सारा भर वरवरचे जे काय आहे तेच टिकविण्याचा आहे. आम्हाला सोसते, पेलवते अन् आमचे आधुनिक शहरी जगणे सुरक्षित ठेवून टिकवून ठेवता येते, त्याला आम्ही संस्कृती म्हणतो. आतल्या खोबर्यापेक्षा करवंटीच्याच नक्षी करण्याकडे आमचा कल असतो. आमच्या सार्याच सणांचे व्यापारीकरण झाले आहे. ज्यांना व्यापारी रूप देता आले ते टिकले आहे. बाजाराला मान्य असलेले कायम आहे. बाजाराच्या नियमानुसार फायद्या-तोट्याच्या गणितात जे काय बसते त्यानुसार त्या सणांमध्ये बदल झाले आहेत अन् आम्ही ते संस्कृती म्हणून मान्यही करून टाकले आहे.
 
गणेशोत्सव सार्वजनिक झाल्यावर संदल कुठे होता? मातीचा- पार्थिव गणेश करून त्याची पूजा करायची आणि अंगणातल्या औदुंबराच्या खाली पाण्यात त्याचे विसर्जन करायचे... यात अवाढव्य मूर्ती आणि सुपार्यांपासून केळींपर्यंत कशाकशाच्या मूर्तींची तजवीज कुठे होती? सहाशे वर्षांपूर्वीच्या दिवाळीत फटाके कुठे होते? बाजाराला हवे तसे बदल आम्ही त्यात केले. आता भुलाबाईचा हा उत्सव बाजाराच्या गणितात बसला नाही. त्याचे व्यापारीकरण करता आले नाही. बाजार आमच्या आयुष्याला गती देतो, दुर्गतीदेखील करतो आणि ती स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे पर्यायदेखील नसतो. त्यातही स्थानिक बाजाराच्या क्षीण प्रभावानुसार भुलाबाईच्या मातीच्या मूर्ती, हा दुकानदारी प्रकार कायम राहिला. त्यात कार्पोरेट विश्वाने दखल घ्यावी असे काहीच नव्हते. भुलाबाईच्या गाण्यांना मार्केट नव्हते. त्यामुळे ती लोप पावली.
 
आता अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात भुलजा-भुलाई मंदिर महाराष्ट्रातील एकमेव आहे! कुरवाडे कुटुंबाकडे या मंदिराची देखभाल आहे. तुकारामआप्पा कुरवाडे यांच्यापासून ते सीतारामआप्पा कुरवाडे यांच्या परंपरेतून आता ज्ञानदेव उपाख्य नानाआप्पा कुरवाडे आणि नातू विश्वास कुरवाडे अशा सहा पिढ्यांची भुलाबाई पूजा हे कुटुंब करीत आलं आहे. हे मंदिर 300 वर्षांपेक्षा अधिक पुरातन आहे, असा एक संदर्भ लक्षात आला. मग तो आमच्या वार्ताहराला सांगितला आणि तशी बातमी करवून घेतली.
 
 
मग विचार आला की, भुलाबाईचे हे एकच मंदिर का झाले? त्याच्या आवृत्ती का नाही निघाल्या? साईबाबा अन् गजानन महाराजांचीही मंदिरे सर्वदूर कुठेकुठे झालीत, मग भुलाबाईची मंदिरे का नाही झाली? एकतर हे दैवत नाही. पार्वती आणि शंकराचे रूप असल्याचे अधिष्ठान त्याला दिले असले, तरीही भुलाबाईचे व्रत नाही. ती काही पावत नाही िंकवा कोपतही नाही. ती माहेराला आलेली लेक आहे. तिच्या सासरच्या जगण्याची गार्हाणी ती घालते. फार काही मागत नाही, पण तिचं सांगून झालं की तिचं मन हलकं होतं आणि मग ती निघून जाते. तिच्या मंदिरांनी बाजारी चलनवलन निर्माण होण्याचे काही कारण नाही.
भुलाबाईचे दिवस सरले आहेत, कारण इतर सर्वच सणांसारखा हा सणही शेती-मातीशी निगडित आहे. या काळात खरिपाची सुगी आलेली असते. नव्हाळीचं सारंच घरात आलेलं असतं. या कृषी-लक्ष्मीची पूजा करून इतरांना वाटून मग त्याचा उपयोग सुरू करण्याच्या अनेक परंपरा देशात विविध रूपात आहेत. घरच्या लेकीचा-सुनांचाही त्यात वाटा असतो. कारण शेती ही स्त्रियांनीच सुरू केली. घरच्या लेकींना सुगीतला वाटा देण्याची ही परंपरा आहे... आता शेती-माती आणि गावगाडा सारेच बदलले आहे. गावांची कॉस्मॅटिक सर्जरी करून त्यांना शहरांचे रूप देण्यात आले आहे. मातीशी आमचा संबंधच राहिला नाही. आम्ही मातीच्या मूर्तींची पूजा करतो, थेट मातीची पूजा नाही करत. शेती होते आताही, मात्र सुगी येत नाही. मधल्या काळात मुली होऊच नये, असे प्रयत्न केले गेले. स्त्रीजीवनातही खूपसारे बदल झाले. ती स्वयंभू झाली. शिकली आणि आर्थिकदृष्ट्या बर्यापैकी स्वयंपूर्ण झाली. त्यामुळे ‘कारल्याची भाजी कर व सूनबाई’ अशी चलाखी करता येत नाही तिच्यासोबत. कुटुंबव्यवस्थाही बदलली आहे. एकल पालकत्व आले आहे. एकत्र कुटुंब पद्धती तर कधीचीच संपली आहे. मुलं परदेशात असतात. शेतकर्याची मुलं आता जमीन विकून नोकर्या विकत घेतात. त्यामुळे ‘लेकी भुलाबाई पाटल्या लेवून जाय’ असे म्हणण्याची इच्छा आणि परिस्थिती नसतेच शेतकर्याची अन् ‘कसी लेवू दादा, घरी नंदाजावा’ असे म्हणायला, म्हणजे हेवा करायलाही घरी नंदा-जावा नसतात. आमचे गावजीवन आणि भावजीवन बदलले आहे. मुली सासरी जातात आजही, मात्र त्या सासुरवाशीण नसतात. त्यामुळेदेखील या गाण्यांचे सगळेच संदर्भ नामशेष झाले आहेत. जे अप्रस्तुत ठरते ते लोप पावते. ते टिकवून ठेवायचे असेल, तर आमच्या ग्रामसंस्कृतीची पुनर्स्थापना करावी लागेल.

‘साय पांघरून दूध जाई झोपी,
शांत होवो आपाधापी अशी माझी...’
शहरीपणाच्या दुधावर साय पांघरून आम्ही झोपलो आहोत. उगाच खंत व्यक्त करण्याचाही शहाजोगपणा का करायचा?
@@AUTHORINFO_V1@@