जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये
8 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
जळगाव, 23 ऑक्टोबर
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने 8 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळणे. आपआपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात 8 डिसेंबर, रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव जी. ए. सानप यांचे अध्यक्षतेखाली लोक अदालत होणार आहे. या लोक अदालतीसाठी जिल्हा वकिल संघ, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे.
यावेळी मोटार वाहन, ट्रॉफीक चलान, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटलांचे व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे संपुर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जळगाव येथील औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय येथील तडजोड योग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर खटले ठेवण्यात आले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोक अदालतीध्ये राष्ट्रीयकृत बॅका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसुली होवून मिळण्याची शक्यता आहे. वादपूर्व खटल्यामध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दूरध्वनी कार्यालय यांनी थकीत रक्कमेमध्ये सुट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे .